नवी दिल्ली : भारत सध्या जगाची 'मधुमेहाची राजधानी'च बनलेला आहे. देशात सातत्याने मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या आहाराबाबत विशेष काळजी घ्यावी लागत असते जेणेकरून रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहील.
नवरात्रीचे उपवास असोत किंवा रमजानचे, खजूर किंवा सुक्या मेव्याचे सेवन हटकून केले जात असते. मात्र, मधुमेहाच्या रुग्णांनी अशा सुक्या मेव्यापासून दूरच राहणे हितावह ठरते. खजुरामध्ये नैसर्गिक शर्करेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी खजुराचे सेवन करणे टाळावे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. खजुराप्रमाणेच बेदाण्यांमध्येही शर्करा अधिक असते. बेदाण्यांच्या सेवनाने रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी व्हाईट ब्रंडचेही सेवन करू नये. तसेच ज्या खाद्यपदार्थांमध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असते त्यांचे सेवन टाळावे.
फळे आरोग्यासाठीही गुणकारी असली तरी काही फळांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक असते. त्यामध्येच चिकूचाही समावेश आहे. चिकू अतिशय गोड असतात व त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही अधिक असतो. मधुमेहाच्या रुग्णांनी बटाट्याचे सेवनही मर्यादित प्रमाणात करणे गरजेचे असते. बटाट्यांमध्य कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते. तसेच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही अधिक असतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो.