आरोग्य

त्रस्त करणारी कंबरदुखी

Arun Patil

हल्‍ली बर्‍याच लोकांना पाठदुखीचा त्रास होताना आपण पाहतो. त्यांना इतक्या मरणप्राय वेदना होत असतात की, ते काम करणे सोडाच, पण आपल्या पायावर उभेसुद्धा राहू शकत नाहीत. त्यामुळेच त्यांना पलंगावर झोपून राहण्यापलीकडे दुसरा इलाज नसतो. कंबरेपासून सुरू झालेल्या या वेदना थेट खाली पावलापर्यंत जाणवत असतात. यालाच लोक साधारणतः 'सायटिका' म्हणतात. पण हा रोग नाही.

पाठीच्या मणक्याच्या खालील भागातली एक किंवा जास्त नसा जर दबल्या गेल्या असतील तर पाठदुखी चे दुखणे उद्भवते. यात प्रामुख्याने मांडीच्या नसांचा समावेश होतो. या दुखण्याशी दोन हात कसे करता येतील, याचा विचार आपण करूया.

मांडीच्या नसा दुखावण्याची कारणे :

मणक्याची झीज : वाढत्या वयानुसार पाठीच्या मणक्याची झीज होणे, नैसर्गिक आहे, पण काही लोकांमध्ये मणक्यांतून जाणार्‍या नसा दबल्या जातात आणि दुखणे सुरू होेते.

पाठीच्या कण्याची झीज : काही रुग्णांमध्ये पाठीच्या कण्याची झीज होऊन त्याची पोकळी कमी होते. वाढत्या वयामुळे हा प्रकार होऊ शकतो. कणाच झीजल्यामुळे त्यातील पोकळी कमी होऊन मांडीच्या नसेवर त्याचा दाब पडतो.

मणक्यात गॅप पडणे : स्लीप डिस्क नावाने हा प्रकार आपल्याला ऐकिवात आहे. कंबरदुखी हे स्लीप डिस्कचे लक्षण असू शकते.

नितंबाच्या स्नायूंचे दुखणे : नितंबाच्या खालच्या बाजूचे स्नायूदेखील मांडीच्या नसा दबवतात. त्यामुळेही नितंबांचे दुखणे आणि सायटिका असे त्रास होऊन कळा येऊ शकतात.

औषधांचा वापर : अनेकदा आपण विविध छोट्या-मोठ्या दुखण्यांसाठी औषधांच्या दुकानातून औषधे घेत असतो. सायटिकाच्या वेदना शमवण्यासाठीही औषधांच्या दुकानात अनेक औषधे मिळतात. ती घेऊन आपण वेदना कमी करू शकतो. पण रक्‍तदाब, मधुमेह किंवा हृदयविकार यांसारखे कोणतेही रोग असतील तर मात्र स्वतःच औषधे न घेता डॉक्टरांशी सल्लामसलत करणेच योग्य. सायटिकाच्या या वेदना कमी करण्यासाठी अनेक प्रकारची औषधे असली तरी, वरीलपैकी कोणत्याही रोगाच्या रुग्णांनी स्वतःच गोळ्या घेऊन प्रयोग करणे कधीतरी चुकीचे ठरू शकते.

शस्त्रक्रिया : शरीराच्या कोणत्याही भागाची शस्त्रक्रिया करणे, हे फार मोठे पाऊल असते. कोणत्याही रोगात हे पाऊल उचलण्याआधी दोन तज्ज्ञांची तरी मते विचारात घ्यावीत. शस्त्रक्रिया करण्याइतपत दुखणे आहे का, शस्त्रक्रियेची कितपत गरज आहे यासाठी योग्य निदान होणे फार गरजेचे आहे. शस्त्रक्रिया करण्याने दुखणे पूर्णपणे बरे होणार आहे का, या सगळ्यांचा सांगोपांग विचार होणे गरजेचे आहे. योग्य निदान, सल्ला आणि विचारमंथन केल्याशिवाय शस्त्रक्रिया करणे, कधीकधी अयोग्य तर ठरतेच मात्र गुंतागुंत वाढवूही शकते.

शारीरिक व्यायाम : विशिष्ट शारीरिक व्यायाम वेदना कमी करू शकते. सायटिकाच्या वेदना जर जास्त नसतील तर केवळ शारीरिक व्यायामानेसुद्धा तुमचा प्रश्‍न सुटू शकतो. वेदनांची तीव्रता जाणून घेऊन तुम्हाला तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व्यायाम करता येतो. पलंगावर झोपण्याने दुखणे बळावण्याची शक्यता असल्याने ते टाळणे आवश्यक असते. या दुखण्यातून काहीसा आराम पडेल तेव्हा तुम्ही नेहमीच्या कामांना सुरुवात करा. रोजच्या कामामुळे होणार्‍या हालचाली नसा मोकळ्या करण्यास हातभार लावतात. तुम्ही आरामच करत राहिलात तर या नसा पुन्हा आखडण्याचा धोका टाळता येत नाही.

अ‍ॅक्युपंक्चर : उपचाराची ही पद्धती तुम्हाला सायटिकाच्या वेदनांपासून मुक्‍त करू शकते. अनेक रोगांवर ही उपचार पद्धती वापरली जाते. मांडीच्या दबलेल्या दुखावलेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी अ‍ॅक्युपंक्चर प्रभावी उपचार ठरू शकतो. आपल्या शरीराचा प्रत्येक भार एकमेकांशी जोडला गेलेला असतो. अ‍ॅक्युपंक्चर तज्ज्ञाला शरीरशास्त्राची माहिती असल्याने, उपचारपद्धतीत टोचल्या जाणार्‍या सुया नेमक्या कोणत्या जागेवर टोचायच्या, याचे ज्ञान असते. त्यामुळे सायटिकाच्या कळा तो कमी करू शकतो.

योगासने : योग या व्यायामप्रकाराची उपयोगिता आणि त्याची लोकप्रियता कोणीही नाकारू शकत नाही. हा एक सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे. दररोज योगा करणार्‍या माणसाला निरोगी आयुष्य लाभते. सायटिकाच्या या दुखण्यावर या व्यायामाचा फायदा होतो. योगामध्ये शरीराला ताण देणारी अनेक आसने केली जातात. एखाद्या अवयवाचे दुखणे, त्याला ताण देऊन बरे होणारे असेल तर ते बरे होऊ शकते. सायटिकाचे दुखणे शारीरिक असल्याने, योगासने आराम मिळवून देऊ शकतात. त्यामुळे सकाळच्या वेळेत योगाभ्यास केल्याचे फायदे होऊ शकतात.

डॉ. भारत लुणावत

SCROLL FOR NEXT