आरोग्य

डॉक्टरांपासून काही लपवू नका अन्यथा..!

दीपक दि. भांदिगरे

डॉ. सुनीलकुमार जाधव

डॉक्टरांकडे गेल्यावर बहुतेकदा रुग्ण आपल्या आजाराविषयी योग्य माहिती देत नाहीत. कारण लाज, संकोच किंवा भीती. या कारणामुळे डॉक्टरांपासून आजाराची योग्य माहिती देत नाहीत. खोटे सांगितल्यावर डॉक्टर कदाचित कडू औषधे, इंजेक्शन घ्यावे लागणार नाहीत. असा लोकांचा समज असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

या अभ्यासानुसार 50 टक्के रुग्ण आपल्या त्रासाविषयी डॉक्टरांना प्रामाणिकपणे माहिती देत नाहीत. परिणामी, आजार वेगळाच असल्याने केलेल्या उपचारांचा फायदा होत नाही. मात्र डॉक्टरांना योग्य माहिती न देऊन आपल्याच शरीरावर अन्याय करत असल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही. त्याचा थेट परिणाम आजाराचे निदान आणि औषधयोजनेवर होतो.

तज्ज्ञांच्या मते, रुग्णाने खोटे सांगण्याऐवजी डॉक्टरांना प्रत्येक समस्या खुलेपणाने सांगावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेणे जीवघेणे ठरू शकते. खोटे बोलून रुग्ण स्वतःचेच नुकसान करून घेतात. रुग्णांनी आपल्या आजाराचा संपूर्ण इतिहास स्पष्टपणे डॉक्टरांना सांगितला पाहिजे.

आजाराविषयी योग्य वेळी माहिती दिल्यास लवकर बरे वाटते. रुग्णाने खोटे सांगितल्यास आजाराच्या स्थितीबाबत माहिती कळत नाही. उपचारात दिरंगाई किंवा टाळाटाळ आणि योग्य वेळी औषधे न घेतल्यास रुग्णालाच त्याचा परिणाम भोगावा लागतो.

डॉक्टरांनी रुग्णाला परत बोलावल्यास रुग्णाने पुन्हा गेले पाहिजे. कारण अनेकदा गरजेनुसार औषधांचा डोस कमी करावा लागतो. त्यासाठी योग्य पाठपुरावा करणे गरजेचे होते. एखाद्या औषधाचा शरीराला फायदा होत असेल, ते बदलू नये.

खोटे बोलण्याचे कारण

डॉक्टरांशी खोटे बोलण्याचे किंवा आजाराचे लक्षण लपवून ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. आहारातील अनियमितता, धूम्रपान आणि दारू पिण्याची सवय, लैंगिक आजार, चुकीच्या सवयी, मुलांना स्तनपान न देण्यासारख्या काही गोष्टी सांगितल्यास डॉक्टरांकडून चार शब्द ऐकून घ्यावे लागतील.

काही वेळा लाज वाटते म्हणूनही रुग्ण डॉक्टरांना खरी माहिती देत नाहीत. काही वेळा औषधांचा कोर्स पूर्ण केल्याची खोटीच माहिती रुग्ण देतात, त्यामुळेही डॉक्टर रागावू शकतात.

अनेकदा रुग्णांच्या लक्षात राहत नाही म्हणूनही आजाराची लक्षणे किंवा माहिती देऊ शकत नाहीत; आणि मग डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणतात. काही लोकांना संपूर्ण माहिती देणे महत्त्वाचे वाटत नाही. शिवाय जर अधिक तपासण्या, चाचण्या केल्यास कर्करोग किंवा ब्रेन ट्यूमरसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

हल्ली लोक इंटरनेटवरून स्वतःच माहिती घेतात आणि स्वतःच औषधोपचार सुरू करतात. त्याविषयी अर्थातच डॉक्टरांना कल्पना दिली जात नाही. मात्र ही गोष्ट नक्कीच घातक ठरू शकते. वेळ काढून डॉक्टरांना व्यवस्थित माहिती दिली पाहिजे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे संपूर्ण घेतली पाहिजेत.

डॉक्टर प्रत्येकाच्या आजारपणाविषयी गुप्‍तता बाळगत असतात, त्यामुळे आपल्या त्रासाविषयी त्यांना मोकळेपणाने सांगावे. उपचार महागडे वाटले तर त्याला पर्याय शोधावा. मात्र इंटरनेटवरील माहितीवर विसंबून राहू नये.  एका अभ्यासानुसार 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण आपल्या डॉक्टरांना प्रामाणिकपणे सर्व माहिती देत नाहीत. आपणही अशी लपवाछपवी करत असू, तर ही सवय बदलून टाका.

रुग्ण कोणती माहिती लपवतात?

अनेकदा रुग्ण ते घेत असलेल्या जीवनसत्त्वांच्या गोळ्या, मद्यपान, धूम्रपान, स्वतःच्या मनाने घेतलेली औषधे, घरगुती उपचार याविषयी माहिती देत नाहीत तसेच आहार-विहार, लैंगिक आचार, व्यायाम, आजार यांच्याविषयी डॉक्टरांशी खोटे बोलणे हानिकारक असू शकते.

डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषधांच्या दुकानातून खोकल्यासाठी, कफासाठी सिरप, गोळ्या घेत असाल आणि ते डॉक्टरांना सांगितले नाही, तर जीवासाठी धोका पत्करत आहात. अँटासिड, मल्टिव्हिटामीन, वेदनाशामक औषधे गरजेपेक्षा अधिक काळ घेतल्यास हृदय, किडनी यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचवू शकते.

अनेकदा डॉक्टरांनी विचारल्यानंतरही धूम्रपानासारख्या व्यसनांची माहिती देत नाहीत. वास्तविक, धूम्रपान हे कर्करोग आणि हृदयरोग यांचे कारण होऊ शकते. दिवसभरात पाच वेळा सिगरेट प्यायल्यास रक्‍ताची गुठळी होणे आणि पॅरालिसिस होण्याचा धोका असतो. त्याशिवाय नैराश्यावर घेतल्या जाणार्‍या गोळ्यांचे सेवन केल्याने रक्‍तदाब वाढतो.

SCROLL FOR NEXT