आरोग्य

जाणून घेऊया थॅलेसेमिया आणि हिमोफिलिया आजाराविषयी…

दीपक दि. भांदिगरे

डॉ. संतोष काळे

थॅलेसेमिया हा  रक्‍ताशी संबंधित असलेला अनुवंशिक आजार आहे. हा आजार झाल्यानंतर हिमोग्लोबीन तयार होण्याचे प्रमाण खूपच संथ होते. तीव्र रक्‍तपांढरीबरोबरच पाणथरी सुजते व मोठी होते.

या आजाराचे निदान रक्‍त तपासणीनेच होऊ शकते. थॅलेसेमियाचे मेजर, मीडियम व मायनर असे तीन उपप्रकार आहेत. हा आजार रक्‍तद्रव्यातल्या एका जनुकीय दोषांमुळे होतो. थॅलेसेमियाग्रस्त मूल जन्मल्यानंतर दोन महिन्यांतच आजारी दिसते.

बाळाची वाढ होत नाही, भूक लागत नाही, मधूनमधून ताप, संसर्ग होत राहतात. चेहरा थोडासा कपाळाला फुगीर दिसतो. मुलाची पाणथरी आणि यकृत वाढल्यामुळे पोट पुढे येते. पण तरीही मूल जगते आणि मोठे होते.

सततच्या तीव्र अ‍ॅनिमियामुळे या व्यक्‍तींना इतर अनेक आजार होत राहतात. हा आजार बरा होत नाही. या आजारावर उपचार म्हणजे शरीरात वारंवार रक्‍त भरण्याची गरज लागते. असा आजार असलेले मूल होऊ नये म्हणून काही लग्ने टाळावी लागतात.

हिमोफिलिया हासुद्धा अनुवंशिक आजार आहे. या आजारात रक्‍त गोठवण्यासाठी आवश्यक असलेला फॅक्टर 8 हा घटक नसतो. स्त्रिया या आजाराच्या वाहक आहेत. पण आजार पुरुषांमध्ये निर्माण होतो.

यातला मुख्य दोष म्हणजे रक्‍त न गोठल्यामुळे रक्‍तस्रावाची प्रवृत्ती तयार होते. यामुळे छोट्या जखमेतूनही खूप काळ रक्‍तस्राव सुरू राहतो. तसेच आतल्या आतही रक्‍तस्राव होऊन सांध्यात, पोटात रक्‍त साकळते. फॅक्टर 8 हा इंजेक्शनच्या स्वरूपात मिळतो. ते वेळोवेळी देत रहावे लागते. पण हा आजार कायमचा बरा होत नाही.

SCROLL FOR NEXT