पावसाळा म्हटले की ढगांनी आच्छादलेले आभाळ, सोसाट्याचा वारा, पडणारा पाऊस, त्यामुळे आलेला गारठा, कुंद झालेली हवा या सर्व गोष्टी सुरू होतात व सर्व वातावरण 'दमा' या व्याधीच्या रुग्णांना शत्रूप्रमाणे असते. अर्थात, त्याचे कारणही तसेच आहे. कारण, या अशा प्रकारच्या वातावरणाची सुरुवात झाली रे झाली की, दमेकरी रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. श्वास कष्टाने घ्यावा लागतो. क्वचित खोकला व न सुटणारा किंवा लवकर न सुटणारा कफ आदी गोष्टींमुळे जीवाची घुसमट होऊन असे रुग्ण अगदी हैराण होऊन जातात.
व्यावहारिक दृष्टीने एक जन्मत: धापेचा त्रास असणारे, दोन कालांतराने विशिष्ट प्रकारची द्रव्याची अॅलर्जी उत्पन्न होऊन विशिष्ट काळीच धापेचा त्रास जाणवणारे. प्रथम सर्दी होऊन नंतर घसा धरणे. खोकला नंतर बडके पडणे. श्वास (धाप) असे चक्र असणारे. आम्लपित्ताचा म्हणजेच छातीत जळजळ, मळमळ, उलटी, उलटीवाटे असव पित्त पडणे हा त्रास झाल्यावर धाप लागणारे. कष्टाची कामे केल्यानंतर, प्रवासानंतर धाप लागणारे.
फुप्फुसतील ब्राँकायटीस, टी. बी. आदी व्याधीमुळे दमा उत्पन्न झालेले तर क्वचित हृदयाची दुर्बलता, रक्ताची कमतरता, किडनीचे विकार यामुळे परिणामस्वरूप श्वासविकार उत्पन्न झालेले. मानसिक ताणतणाव झाल्यानंतरही धाप वाढणारे अशा विविध प्रकारचे रोगी आढळून येतात.
आयुर्वेदीय शास्त्रानुसार शरीरातील प्राण व उदान हे वायू तसेच क्लेशदायक व अवलंबक कफ यांचा प्रकोप घडल्याने श्वास (धापेचा) विकार उत्पन्न होतो.
वरीलपैकी कोणत्याही कारण प्रकारांनी जरी धाप लागत असली तरी दम्याच्या विकारात प्रत्यक्ष धाप लागली असतानाची अवस्था आणि धाप नसताना परंतु दोन अॅटॅकमधील अवस्था अशा दोन अवस्था आढळतात.
या अवस्थेत कष्टाने जास्त लवकर लवकर, घूँ, घूँ असा आवाज करीत धाप सुरू असते. ज्याच्या परिणामी पुरेशी हवा आत न गेल्याने घुसमटल्याप्रमाणे जाणीव होते. काही सूचेनासे होते. कपाळावर, गळ्यावर, छातीवर घाम येऊ लागतो. मधूनच खोकल्याची उबळ येते. बोलताना त्रास होतो. झोप येत नाही. उंच तक्यावर दोन्ही हात आडवे ठेवून डोके टेकवून बसल्यावरच थोडी विश्रांती मिळते. या अवस्थेत रुग्ण अत्यंत हैराण होतो. बदलणारी हवा, वारा, विशिष्ट थंड पदार्थांचे सेवन आदींमुळे ही वेगावस्था येत असते.
दम्याचा वेग असताना जो धापेचा त्रास झालेला असतो, त्याच्या परिणामी छातीत, पाठ, मान व पोटाचे स्नायू दुखणे, थोड्या श्रमाने, जास्त जेवल्याने दम लागल्यासारखे होणे, छातीत थोडी घरघर वाटणे, कोरडा किंवा बडके पडणारा खोकला, तसेच सर्दी ही लक्षणे जाणवत असतात. याच्या जोडीला सर्वांगात थकवा वाटणे, थोड्या कष्टाने गळून जाणे, निरूत्साह ही लक्षणेही जाणवतात.
श्वास किंवा दमा धाप लागणार्या रुग्णांकडून बर्याच वेळा डॉक्टर दमा पूर्ण बरा होईल का हो, असा प्रश्न विचारला जातो. आयुर्वेदीय शास्त्राने मुलत: या विकारास 'याप्य' म्हणजे तात्पुरत्या काळापुरता बरा होणारा असे सांगितले आहे. त्यामुळे काही काळ उपचारांनी बरा झाला असला तरी शेवटी विशिष्ट पथ्ये कायम सांभाळल्यास तो पूर्ण बरा होणारा म्हणण्यापेक्षा 'आटोक्यात राहणारा' विकार आहे असे आढळते.
काही काळ आयुर्वेदीय उपचार घेऊन नंतर प्रकृतीनुसार रुग्णाला सांगितलेली पथ्ये सांभाळल्यामुळे गेल्या काही वर्षांत पुन्हा दम्याचा त्रास न झालेले रुग्णही आहेत. त्यामुळे एकदा बरा झालेला हा दमा वैद्यांच्या मार्गदर्शनाने पथ्ये सांभाळून कायमचा दूर ठेवणे रुग्णाच्या हाती असते, असे म्हणावे लागते. पथ्ये सांभाळून म्हटले की, लोकांच्यात बरेच पदार्थ खायचे बंद करणे, असा गैरसमज असल्याचे आढळते.
वास्तविक 'पथ्यम इति हितम' या व्याख्याप्रमाणे पथ्य या संकल्पनेमध्ये विशिष्ट शरीर क्रियाकर्मे करणे, विशिष्ट शरीर क्रियाक न करणे या चार महत्त्वाच्या गोष्टीही येतात व या चारही गोष्टींचे पालन पथ्यपालन असते, म्हणून पथ्य या गोष्टीबद्दल भय न बाळगता ते सांभाळून दमा आटोक्यात ठेवावा.
(पूर्वार्ध)