आरोग्य

ओळखा सोरायसिसची लक्षणे

Shambhuraj Pachindre

स्वतःची काळजी अशी घ्या : त्वचा कोरडी पडू देऊ नका. त्यावर सातत्याने मॉश्चरायझर लावावे. आहाराकडेही दुर्लक्ष न करता योग्य काळजी घ्यावी. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. मद्यपान त्वरित बंदच करावे, कारण सोरायसिससाठी ते धोकादायक ठरू शकते. जरी हा दर्शनी रोग असला तरीही आपली मानसिकता सकारात्मक ठेवावी.

सोरायसिस हा एकप्रकारचा त्वचाविकार आहे. त्याचे स्वरूप विचित्र दिसते. हा आजार जगभरात आढळून येतो. त्वचारोग असल्याने सौंदर्यद़ृष्ट्या विचार करता त्वचा खराब दिसते. मात्र, या आजाराचा परिणाम शारीरिक होतोच, पण सामाजिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिकद़ृष्ट्याही व्यक्तीवर त्याचा प्रभाव होताना दिसतो. खेदाची बाब ही की जगभरात सोरायसिसच्या रुग्णांना भेदभाव आणि अपमानाला सामोरे जावे लागते. मुळातच हा रोग कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. त्याची लक्षणेही व्यक्तीप्रमाणे वेगवेगळी असू शकतात. अर्थात, त्वचेवर लाल रंगाचे कोरडे चट्टे पडणे हे सर्वसामान्य लक्षण पहायला मिळते. सोरायसिसची लक्षणे ओळखून त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे.

सोरायसिस या त्वचारोगाची लक्षणे ओळखा : सोरायसिस हा विकार कोणत्याही वयात होऊ शकतो तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध लक्षणे दिसून येतात. त्वचेला खाज येते, लाल रंगाचे चट्टे पडतात. काही वेळा त्वचेला भेगा पडतात, खाज येत असल्याने खाजवल्यास त्यातून रक्त येते. सोरायसिस हातांचे कोपरे, गुडघे यांच्यावर होताना दिसतो. या आजारात डोक्याच्या त्वचेवर कोंड्यासारखे पांढरा थर जमा होतो. त्यामुळेही खाज येते. खूप गंभीर प्रकरणात हात आणि पाय यांच्या नखांनाही सोरायसिस होऊ शकतो. थोडक्यात सोरायसिसची लक्षणे प्रत्येक व्यक्तीगणिक वेगवेगळी असू शकतात.

सोरायसिसची कारणे : सोरायसिस का होतो किंवा नेमका कशामुळे होतो याची ठोस कारणे अजूनही स्पष्ट झालेली नाहीत; परंतु याविषयी अभ्यास केले गेले. त्यानुसार प्रतिकारक्षमतेशी निगडित हा आजार आहे. साध्या सोप्या भाषेत समजून घ्यायचे तर ज्या पेशी आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी बाहेरील घटकांशी जसे विषाणू, जीवाणू आदींशी लढतात त्या सोरायसिस पीडित त्वचेच्या चांगल्या पेशींवरही हल्ला करतात. त्यामुळे त्वचेवर एक जाड थर तयार होऊ लागतो. ज्या व्यक्तींना सोरायसिस झाला आहे त्यांनी त्वचेला जखम होणे, इजा होणे, संसर्ग होणे, एखादा कीटक चावणे, थंडी, सनबर्न या सर्वांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करावा. तसेच तणाव न येऊ देण्याकडे लक्ष द्यावे. ज्या व्यक्ती खूप जास्त धूम्रपान तसेच मद्यपान करतात त्यांना विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे.

योग्य उपचार घ्यावे : सोरायसिसचे निदान योग्य वेळी झाल्यास त्यावर उत्तम पद्धतीने उपचार करता येतात. सोरायसिसवर योग्य वेळी उपचार न झाल्यास तो शरीरभर पसरू शकतो. सोरायसिसबाबत एक गोष्ट होऊ शकते की हा आजार पूर्ण बरा झाला असे वाटू शकते, मात्र भविष्यात परतही त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उपचार घेतल्यानंतर बरे वाटू लागल्यावर उपचार बंद करू नयेत. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे सुरू ठेवावीत आणि त्यांनी सांगितल्यावरच बंद करावीत. सोरायसिसवर उपचार म्हणून पोटात घेण्याची औषधे दिली जातातच, शिवाय त्वचेवर लावण्यासाठी मलमही दिले जाते. अनेकदा औषधांचा दुष्परिणामही होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत. रुग्णाच्या रोगाच्या स्थितीनुसार त्यावर उपचार केले जातात. रोगाची परिस्थिती गंभीर असेल तर फोटो लाईट थेरेपीही दिली जाते. तसेच प्रगत उपचारांमध्ये बायोलॉजिक्स थेरेपी दिली जाते. त्यामुळे रूग्णाचे आयुष्य थोडे सुकर होऊ शकते.

  • त्वचारोगांपैकी एक रोग म्हणजे सोरायसिस. जगभरात सोरायसिसचा विकार होण्याचे प्रमाण मोठे आहे. तब्बल 125 अब्जहून अधिक लोकांना सोरायसिसची समस्या भेडसावते आहे. त्याचे स्वरूप व्यक्तीच्या शारीरिक रूपावर प्रभाव टाकतेच; परंतु सामाजिक, मानसिक, भावनिक तसेच आर्थिक रूपाने प्रभावित करते. भारतासह 31 देशांमध्ये सोरायसिसचे रुग्ण आढळतात. या रुणांच्या र्वेक्षणानंतर एक खेदजनक गोष्ट समोर आली ती म्हणजे या रुग्णांसमवेत केला जाणारा भेदभाव. जगभरात सोरायसिसच्या या रुग्णांना भेदभाव आणि अपमानाचा सामना करावा लागतो.

    – डॉ. मनोज शिंगाडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT