हल्लीच्या तरुणाईमध्ये बांधेसूद शरीराचे फॅड दिसून येते. त्याकरिता व्यायामावर अधिक भर दिला जाऊन जिमला जाणे, वजन उचलणे आदी माध्यमातून शरीराला योग्य आकारात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याचे जसे फायदे आहेत, तसेच अतिव्यायाम केल्याने आरोग्यावर दुष्परिणामही होऊ शकतात. पुरुषांनी वजनं उचलण्याचा आणि कार्डिओचा अतिव्यायाम केला तर शरीराचं तापमान वाढतं.
शरीराचं तापमान वाढल्यामुळे शुक्राणूंच्या वाढीवर आणि दर्जावर परिणाम होतो. परिणामी वंध्यत्वाच्या तक्रारी वाढू शकतात. महिलांनी नाजूक बांधा मिळवण्यासाठी अति ताण देणारा व्यायाम आणि त्याच्या जोडीला डाएट अंगीकारला तर त्यांच्या शरीरातील चरबी प्रमाणापेक्षा कमी होते. त्यामुळे शरीरातील एस्ट्रोजेनची पातळी कमी होते. परिणामी, ऑलिगोमेनोर्हिया आणि अॅमेनोर्हिया होऊ शकतो. पुरुषांनी अतिव्यायाम आणि अतिशारीरिक हालचाली टाळल्या पाहिजेत; परंतु त्याचवेळी बैठी जीवनशैली देखील निवडू नये.
स्पर्धात्मक युगात खेळाडू विजय मिळविण्यासाठी कुठल्याही मार्गाचा वापर करण्यास तयार होतात. यासाठी अनेक खेळाडू डोपिंगला बळी पडतात. स्टेरॉईड्स, स्टिम्युलंट्स, नार्कोटिक्स, डायुरेटिक्स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा प्रकारे क्रीडा क्षेत्रात डोपिंग केले जाते. स्टेरॉईड हे इंजेक्शन आणि कॅप्सूलच्या स्वरूपात घेतले जाते आणि काहीवेळा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषध म्हणूनही वापरले जाऊ शकते; परंतु बॉडी बनवण्यासाठी युवकांना स्टेरॉईडकडे आकर्षित केले जात आहे.
अॅनाबॉलिक स्टेरॉईडचा जितका लवकर परिणाम दिसून येईल, तितक्या लवकर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्याचा वारंवार वापर केल्याने पुरुष हार्मोन्स आणि प्रजनन यावर प्रतिकूल परिणाम होतो. परिणामी पुरुष नपुंसकदेखील होऊ शकतो. स्टेरॉईडच्या इंजेक्शनामुळे महिलांच्या चेहर्यावर केस येणे, तर युवकांची हाडे ठिसूळ होणे, किडनीवर परिणाम होणे, त्यांची जननेंद्रीये कमजोर होण्यासारखे घातक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच व्यायामासाठी स्टेरॉईडचा वापर करू नये.
या गोष्टींचे पालन करावे.
* शरीरावर अतिरिक्त ताण निर्माण करणारे व्यायामप्रकार करू नका.
* अतिरिक्त वजन उचलू नका. शरीराला झेपेल इतकेच वजन उचला. तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या सल्ल्याने व्यायाम करा.
* आपल्या तब्येतीनुसार व्यायामाचे कोणते प्रकार उपयुक्त ठरतील याची माहिती करून घ्या.
* कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास किंवा दुखणे असेल, तर त्याची कल्पना प्रशिक्षकांना द्या.
* वैद्यकीय उपचार सुरू असतील, तर याची माहिती प्रशिक्षकांना द्या.
* व्यक्तीनुसार आणि त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार व्यायामाची निवड करावी. एखादी व्यक्ती करत असलेला व्यायाम दुसर्या व्यक्तीला जमेलच असे नाही.
डॉ. रितू हिंदुजा