डॉ. भारत लुणावत
हवामान बदलले की सर्दी, खोकला, घसा बसणे, ताप यांचा उपद्रवही वाढतो आणि लक्षणेही जाणवू लागतात. यामागे विषाणूंच्या प्रादुर्भावाबरोबरच आपल्या प्रतिकारशक्तीची स्थितीही तितकीच महत्त्वाची असते.
संशोधनांमधून सिद्ध झाले आहे की, शरीरातील काही खनिज द्रव्यांची कमतरता ही अशा संसर्गांना निमंत्रण देते. यामध्ये झिंक हे अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. शरीरात तो फार अल्प प्रमाणात असतो; परंतु त्याची उपस्थिती शेकडो एन्झाईम्सच्या क्रियेसाठी आवश्यक असते. प्रतिकारशक्ती वाढवणे, जखम लवकर भरून काढणे, शरीरातील पेशींची वाढ व पुनर्बांधणी, हॉर्मोन्सचे संतुलन राखणे, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करणे यासाठी झिंक महत्त्वाचे ठरते.
शास्त्रीय संशोधनांनुसार, झिंक शरीरातील व्हायरल रेप्लिकेशन म्हणजेच विषाणूंची संख्या वाढण्याची प्रक्रिया थांबवतो. विशेषतः सामान्य सर्दीसाठी जबाबदार असणार्या रायनो व्हायरससारख्या विषाणूवर झिंक परिणामकारक ठरते. झिंक हे टी-सेल्स आणि इतर रोगप्रतिकारक पेशींना सक्रिय ठेवत असल्याने संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. झिंकमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे घशातील सूज, शिंका, नाक वाहणे यासारखी लक्षणे कमी होतात.
शरीरात झिंकची कमतरता असल्यास बालकांची वाढही खुंटू शकते. अंडी, मासे (सार्डीन, सॅल्मन), मटण, चिकन, दूध, दही, चीज, भोपळ्याच्या बिया, तीळ, बदाम, अक्रोड, राजमा, हरभरा, मूग, गहू, ज्वारी, बाजरी, पालक, मेथी, हरभरा शेंगा यांच्या सेवनातून शरीराची झिंकची गरज पूर्ण करता येते. वनस्पती स्रोतांतील झिंकचं शोषण थोडं कमी प्रमाणात होतं म्हणून शाकाहारी व्यक्तींनी याचं नियमित सेवन करणं महत्त्वाचं ठरतं.
सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शनच्या सुरुवातीच्या 24 तासांत झिंकच्या गोळ्या घेतल्यास फायदेशीर ठरते; मात्र अतिप्रमाणात झिंक घेतल्यास उलटी, मळमळ, डोकेदुखी, तोंडात धातूसारखा स्वाद जाणवणे यासारखे साईड इफेक्टस् होऊ शकतात. हवामान बदल, प्रदूषण आणि विषाणूंनी भरलेल्या वातावरणात झिंक हे आपल्या आहारातले एक संरक्षक कवच ठरू शकतं.