बदलत्या काळात धकाधकीच्या जीवनात आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. शारीरिक समस्यांबरोबरच मानसिक व्याधींचे प्रमाणही वाढू लागले आहे. या शारीरिक आणि मानसिक व्याधींवर योगासने आणि प्राणायाम हा एक हुकमी उपचार ठरतो आहे.
भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या; पण अध्यात्म, योग, संगीत व आयुर्वेद या चिरंतर काळापर्यंत जगाला मार्गदर्शक ठरू शकतील अशा चार गोष्टी भारताने दिल्या. योग साधनेची परंपरा आपल्या देशात किती हजार वर्षांपासून आहे, हे ठामपणाने सांगता येणार नाही; पण योग ही आपली संस्कृती आहे. योगविज्ञानामध्ये जगण्याचा शास्त्रीय विचार केला आहे. ते जगण्याचे शास्त्र आहे. विशिष्ट पद्धतीने जगलो, तर त्याचा काय परिणाम होतो, याचा विचार योगामध्ये होतो. चिंतायुक्त आणि चिंतामुक्त, सकारात्मक जगण्यातील फरक योगशास्त्रात समजतो. म्हणूनच योग हा जगण्याचा हा एक शास्त्रीय मार्ग आहे. योग म्हणजे जागरूकता. जो मनुष्य योग करतो, त्याचा नियमित सराव करतो त्याच्यामध्ये जागरूकता येते.
योगासनांमुळे शरीराबरोबरच मानसिक आरोग्यही सुधारत असते, हे अनेकांना ठाऊक नसते; पण ती एक अनुभूती आहे. आरोग्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले की, दैनंदिन जीवनात अस्वस्थता निर्माण होते. आरोग्याच्या सततच्या तक्रारींना माणूस वैतागून जातो. त्यामुळेच आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने आणि प्राणायाम नियमित रूपात करणे आवश्यक आहे.
योगविद्येनुसार आचरण करण्याची सुरुवात स्वतःपासून, स्वतःच्या मनापासून झाली पाहिजे. आज आसन व प्राणायाम या दोन पायर्यांसंबंधी काही प्रमाणावर माहिती लोकांना आहे. सामान्यतः योग शिक्षणाचे जे वर्ग चालतात ते या दोन पायर्यांचाच अभ्यास करून घेतात. योगासने ही सांधे, स्नायू व मज्जा या तिन्हीस कार्यक्षम करतात. शरीर सुद़ृढ होते. लवचिक होते. अनावश्यक चरबी झडून जाते. योगासनांमुळे अनेक अंतस्रावी ग्रंथी कार्यक्षम होतात. डायबेटिस, ब्लड प्रेशरसारखे दुर्धर आजार ही योगासनांच्या नियमित अभ्यासाने नियंत्रणात येतात. योगशास्त्र तर असे सांगते की, असलेल्या व्याधी तर योगासनांच्या अभ्यासाने दूर होतातच; पण नियमित योगासने करणारा साधक सहजपणे सर्व व्याधींपासून मुक्त राहतो.
सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम मानला जातो. प्रत्यक्षात नमस्काराच्या वेगवेगळ्या स्थिती ही निरनिराळी आसनेच आहेत. प्राणायाम हा श्वासाचा व्यायाम आहे. श्वसनमार्गाची शुद्धी, फुफ्फुसांची ताकद वाढणे, आवाज गोड होणे हे परिणाम लगेच दिसतात; पण मानवी शरीरातील अनेक आंतरिक शक्ती या प्राणायाम केल्याने हळूहळू जागृतही होतात. योगासने आणि प्राणायामामुळे मनावर आलेला ताण दूर होतो. पाश्चिमात्य संशोधकांनाही शरीर आणि मनावरील ताण दूर करण्यात योगासने आणि प्राणायाम अत्यंत उपयुक्त ठरतात असे आढळून आले आहे.
आजच्या ताणतणावाच्या आणि प्रचंड स्पर्धेच्या काळात क्षुल्लक गोष्टींवरूनही चिडचिड होणे, राग आटोक्यात न राहणे, अशा तक्रारी अनेकांकडून ऐकू येतात. आयुष्यातील अडचणींचा परिणाम म्हणून अशा तक्रारी निर्माण होतात. योगासने आणि प्राणायामामुळे मनःशांती मिळते. अकारण होणारी चिडचिड थांबते. त्याचा परिणाम आपोआपच मानसिक आरोग्यावर होतो. योगासने आणि प्राणायामामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. सद़ृढ आणि निरोगी आयुष्य जगण्याचा प्रभावी मंत्र म्हणून योगाकडे पाहिले पाहिजे.