डॉ. प्राजक्ता पाटील
गर्भावस्थेची माहिती मिळताच महिलांना दैनंदिन वैद्यकीय निर्णय घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी एक्स-रेसारख्या नेहमीच्या तपासणीची शिफारस केली गेल्यास त्यातील किरणोत्सर्गाचा (रेडिएशन) गर्भातील बाळावर परिणाम होईल का, अशी भीती अनेकींना वाटते.
वास्तविक, गरोदरपणात एक्स-रे अजिबात काढता येत नाही, असा कोणताही नियम नाही. कोणतीही तपासणी करायची की नाही, हे अनेक घटकांवर अवलंबून असते. यामध्ये तपासणीचा प्रकार, शरीराचा कोणता भाग तपासला जात आहे, किरणोत्सर्गाचे प्रमाण किती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मातेच्या आरोग्यासाठी ही तपासणी किती आवश्यक आहे, या बाबी विचारात घेतल्या जातात.
वैद्यकीयदृष्ट्या तपासणी आवश्यक असल्यास अचूक आणि वेळेवर निदान होण्याचे फायदे आणि संभाव्य धोके यांची तुलना करून वैद्यकीय पथक निर्णय घेते. गर्भवती महिलांना एक्स-रेचा सल्ला दिल्यास घाबरून न जाता तपासणीपूर्वी आपण गरोदर आहोत किंवा असण्याची शक्यता आहे, याची माहिती डॉक्टरांना आणि रेडिओलॉजी पथकाला देणे आवश्यक आहे.
शरीराच्या कोणत्या भागाचा एक्स-रे काढायचा आहे, यावर किरणोत्सर्गाचा प्रभाव अवलंबून असतो. छाती, हात, पाय किंवा डोके यांचा एक्स-रे आणि पोट किंवा कंबर या भागाचा एक्स-रे यामध्ये मोठा फरक असतो. पोटाच्या किंवा कंबरेच्या भागातील तपासणीसाठी गर्भाची स्थिती आणि तपासणीची गरज यावर बारकाईने विचार केला जातो. अशावेळी रेडिएशन नसलेल्या सोनोग्राफी (अल्ट्रासाऊंड) पर्यायांचा विचार केला जातो. आवश्यकतेनुसार सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेऊन ही तपासणी केली जाते. गर्भवती असल्याची कल्पना नसताना नकळत एक्स-रे काढल्यास घाबरून न जाता डॉक्टरांना त्याची तारीख आणि प्रकार सांगावा, जेणेकरून ते योग्य मार्गदर्शन करू शकतात. प्रत्येक तपासणी पद्धतीतून वेगवेगळी माहिती मिळते. त्यामुळे रुग्णाची गरज ओळखून योग्य चाचणी निवडणे महत्त्वाचे ठरते. मातेच्या आजाराचे निदान वेळेवर न होणे, हेदेखील धोकादायक ठरू शकते.