नाशिक : सतीश डोंगरे
मधुमेहाची राजधानी म्हणून पुढे आलेल्या भारतात, मधुमेहाबाबतचे दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एका सर्वेक्षणातून आलेल्या माहितीनुसार, राज्यात ३९ टक्के किशोरवयीन मुलींना मधुमेहाचा धाेका असून, यात ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील भावी पीढीच मधुमेहाच्या विळख्यात सापडत असल्याने अधिक सतर्क राहण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (World Diabetes Day)
राज्यातील १६ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलींमधील मधुमेहाची पातळी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. यात १ हजार ५२० मुली सहभागी झाल्या. या मुलींपैकी दोन टक्के मुलींना पूर्व उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे आणि १२.७ टक्के कमी एचडीएलने त्रस्त असल्याचे आढळून आले. तसेच ३९ टक्के किशोरवयीन मुली या पूर्व मधुमेहाच्या स्थितीत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले. दरम्यान, महाराष्ट्रात मधुमेहींची संख्या सातत्याने वाढत असून, एका आकडेवारीत महाराष्ट्रात १२ लाखांपेक्षा अधिक मधुमेह ग्रस्तांची संख्या आहे. तर २०२३ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार राज्यातील सुमारे ११ लाख ९४ हजार लोकांना मधुमेह असल्याचे माहिती नव्हते. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नॉन कम्युनिकेबल डिजिज या प्रोग्रॅममुळे त्यांना मधुमेह असल्याचे ज्ञात झाले. आरोग्य विभागाच्या मते, महिलांमध्ये पुर्वीच्या तुलनेत आरोग्याबाबतची जागरूकता वाढली असून, नियमित आरोग्य चाचणी केली जात असल्याने, मधुमेहाचे महिलांमधील वाढते प्रमाण सातत्याने समोर येत आहे.
मधुमेह आणि बिघडलेल्या ग्लुकोजचा स्तर ज्येष्ठांमध्ये अधिक आढळतो. भारतातील ९.३ टक्के ज्येष्ठांना मधुमेहाची लागण झाली आहे. वृद्धत्व, लठ्ठपणा, वाढलेला रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल यामुळे हे प्रमाण वाढतच आहे. या ९.३ टक्क्यांपैकी ४५.८ टक्के लोकांना त्यांच्या मधुमेहाविषयीची माहिती होती. ३६.१ टक्के लोक उपचार घेत होते. त्यातील १५.७ टक्के लोकांचे मधुमेहावर नियंत्रण होते.
मधुमेहाबाबत भारत जगाची तर लातूर महाराष्ट्राची राजधानी आहे. एका सर्वेक्षणानुसार लातूर जिल्ह्यात मधुमेहींचे प्रमाण सर्वाधिक आहे. लातूरमधील काही नागरिकांचे रक्ताचे नमुने सर्वेक्षणासाठी नमुने घेतले असता, त्यातील १७ टक्के नमुने मधुमेही असल्याचे निष्पन्न झाले. जास्त वजन, व्यायामांचा अभाव यामुळे येथील नागरिकांना मधुमेहाची लागण होत असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणाअंती काढण्यात आला.
मुंबईतील महिला मॉडर्न लाइफस्टाइल जगत असल्याने, त्यांना हार्मोनल बदलाची समस्या उद्भवत आहे. पीसीओडीच्या समस्येनंतर वजन वाढत असल्याने, त्याचा परिणाम गर्भधारणेवर होत आहे. त्यामुळे गर्भधारणेसाठी उपचार घ्यावे लागत असून, त्यातून गरोदरपणात मधुमेहाचा धोका अधिक वाढत आहे. मागील दहा वर्षात पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे.