डॉ. संजू सिदाराद्दी
हिवाळ्यात वाढत्या थंडीबरोबरच लहान मुलांना सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजार होण्याचे प्रमाण वाढते. वातावरणातील तापमानात झालेला बदल आणि कमी झालेली प्रतिकारशक्ती यामुळे मुलांना फ्लूचा त्रास लवकर होतो. त्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला मुलांचे फ्लूचे लसीकरण करणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरते.
आता हिवाळ्याची चाहूल लागली असून पालकांनी आपल्या मुलांची नियमित वैद्यकीय तपासणी करून त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यात फ्लू लसीकरण मुलांसाठी महत्त्वाचे असून ते वगळू नये. हिवाळ्यात बहुतेकदा मुलांना नाक वाहणे, खोकला व ताप येणे, घसा खवखवणे आणि थकवा अशा समस्या आढळून येतात. हे सामान्य असले, तरी लहान मुलांमध्ये हे बर्याचदा गंभीर गुंतागुंतीचे ठरू शकते. कारण, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णतः विकसित झालेली नसते. शिवाय, हंगामी इन्फ्लूएंझा किंवा फ्लू हा शाळा आणि खेळाच्या मैदानांतून सहज पसरतो. त्यामुळे उच्चदाब, अंगदुखी आणि कधीकधी न्यूमोनिया किंवा ब्राँकायटिस, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. काही मुलांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते.
फ्लू लस हे मुलांना संसर्गांपासून वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. पाच वर्षांखालील मुले आणि दमा किंवा मधुमेह यासारख्या पूर्व-अस्तित्वातील आजार असलेल्यांना फ्लूशी संबंधित गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. लसीकरण केवळ मुलाला निरोगी ठेवत नाही, तर कुटुंबातील सदस्यांना आणि वर्गमित्रांना विषाणू पसरण्यापासूनदेखील प्रतिबंधित करते. बरेच पालक लसीकरणाच्या फायद्यांकडे दुर्लक्ष करतात आणि गैरसमजुतींमुळे लसीकरण करत नाहीत. ही लस सुरक्षित असून अपवादात्मक हात दुखणे किंवा थोडा ताप यासारख्या सौम्य प्रतिक्रिया दिसून येतात आणि त्यानंतर दोन दिवसांतच मुलांना बरे वाटू लागते. म्हणूनच हिवाळा सुरू होण्यापूर्वीच मुलांना फ्लू लसीकरण करून सुरक्षित ठेवता येईल.
लसीकरणाव्यतिरिक्त पालकांनी मुलांना वैयक्तिक स्वच्छता राखण्यास, नियमित हात धुण्यास, आजारी लोकांशी संपर्क टाळणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांनी समृद्ध असा पूरक आहार घेण्यास प्रोत्साहित करावे. लहान मुलांना किमान 7 ते 8 तास पुरेशी झोप मिळावी तसेच मुलांच्या शारीरिक हालचालींना पालकांनी प्रोत्साहन द्यावे. हिवाळ्यात मुलांना उबदार कपडे घालावेत. त्यांना पाणी, सूप, लिंबूपाणी देऊन हायड्रेटेड ठेवावे आणि संसर्ग टाळण्यासाठी खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात अथवा रुमाल ठेवण्याची सवय लावावी.