डॉ. संतोष काळे
पल्मोनोलॉजी आणि स्लीप मेडिसिनमधील वरिष्ठ सल्लागार डॉ. अंकित भाटिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर याचे वर्णन केले. दोन वेगवेगळे टॉयलेट क्लीनर मिसळल्यानंतर एका महिलेची प्रकृती अचानक बिघडली. क्लीनर मिसळताच तिला श्वास घेण्यास त्रास झाला आणि ती जमिनीवर कोसळली. तिचे फुफ्फुस विषारी वायूने भरले होते. डॉक्टरांनी रिअॅक्टिव्ह एअरवे डिसफंक्शन सिंड्रोम असे याचे निदान केले. हे अचानक रासायनिक अभिक्रियेमुळे होणार्या अचानक दम्याच्या झटक्यासारखेच आहे.
दोन टॉयलेट क्लीनर एकत्र का वापरू नयेत, यामागे ठोस वैज्ञानिक कारण आहे. अनेक क्लीनरमध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते. काहींमध्ये ब्लीच म्हणजेच सोडियम हायपोक्लोराईट, तर काहींमध्ये अमोनिया असतो. हे घटक स्वतंत्रपणे वापरले असता स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरतात. मात्र हेच पदार्थ एकत्र मिसळले गेले तर त्यातून अत्यंत विषारी वायू तयार होतात. हे वायू श्वसनमार्गातून शरीरात गेल्यास तीव्र श्वसनविकार, फुफ्फुसांचे नुकसान आणि काही वेळा जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. दमा किंवा अॅलर्जी असलेल्या व्यक्तींना याचा धोका अधिक असतो.
विशेषतः आम्लयुक्त क्लीनर आणि ब्लीच एकत्र आल्यास क्लोरीन वायू तयार होतो. हा वायू जमिनीच्या पातळीवर साचतो. टॉयलेट साफ करताना वाकून काम केल्यामुळे तो थेट श्वासावाटे फुफ्फुसांत जातो. बाथरूममध्ये योग्य हवेशीर व्यवस्था नसेल तर हा वायू दाट होऊन संपूर्ण घरात पसरू शकतो. अशा वेळी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव प्राणी यांच्यासाठीही धोका निर्माण होतो. क्षणात चक्कर येऊन बेशुद्धी येऊ शकते.
यापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. टॉयलेट साफ करताना नेहमी एकाच प्रकारचा क्लीनर वापरावा. कधीही दोन वेगवेगळे टॉयलेट क्लीनर एकत्र मिसळू नयेत. वापरण्यापूर्वी बाटलीवरील माहिती नीट वाचावी. एखाद्या क्लीनरमध्ये ब्लीच असल्यास दुसर्यामध्ये आम्ल नसावे, याची खात्री करावी. स्वच्छता करताना खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवून योग्य हवेशीर वातावरण ठेवावे. हातमोजे, मास्क घालूनच टॉयलेट साफ करावे. शक्यतो वाकून खोल श्वास घेणे टाळावे. चुकून दोन क्लीनर एकत्र आल्याने धूर किंवा वायू जाणवू लागल्यास तत्काळ त्या जागेतून बाहेर पडून मोकळ्या हवेत जावे. श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व जीव वाचवावा.