Gallstones during pregnancy | गरोदरपणात पित्ताशयातील खड्यांचा धोका का वाढतो? 
आरोग्य

Gallstones during pregnancy | गरोदरपणात पित्ताशयातील खड्यांचा धोका का वाढतो?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. गौरांगी वैद्य

एका अंदाजानुसार, गरोदरपणात साधारणतः 8 ते 12 टक्के महिलांमध्ये पित्ताशयातील खडे (गॉलस्टोन) निर्माण होण्याची शक्यता असते.

तज्ज्ञांच्या मते, या समस्येमागे दोन मुख्य संप्रेरके (हार्मोन) कारणीभूत असतात. एस्ट्रोजन या संप्रेरकाची पातळी वाढल्यामुळे पित्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. तसेच प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक पित्ताशयाचे स्नायू शिथिल करते, ज्यामुळे पित्त पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही. जेव्हा पित्त दीर्घकाळ पित्ताशयात साठून राहते, तेव्हा कोलेस्ट्रॉलचे लहान कण एकत्र येऊन खड्याचे रूप घेतात. वाढत्या गर्भाशयामुळे पित्ताशयावर पडणारा दबाव ही समस्या अधिक गंभीर करतो.

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक पुढच्या गर्भधारणेसह हा धोका वाढत जातो. पहिल्या गरोदरपणात झालेला परिणाम दुसर्‍या किंवा तिसर्‍या वेळेस अधिक संचित होतो. ज्या महिलांनी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा गर्भधारणा केली आहे, त्यांच्यात पित्ताशयातील खडे होण्याचा धोका सर्वाधिक असतो. हा सामान्य पोटदुखीचा त्रास आहे की, पित्ताशयातील खडा, हे काही विशिष्ट लक्षणांवरून ओळखता येते. पोटाच्या वरच्या उजव्या भागात अचानक तीव्र वेदना होणे हे याचे प्रमुख लक्षण आहे. हे दुखणे खांद्यापर्यंत किंवा पाठीच्या उजव्या बाजूला पसरू शकते. विशेषतः तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर एक ते दोन तासांनी या वेदना सुरू होतात. यासोबतच मळमळणे, उलट्या होणे, पोट फुगणे आणि कधीकधी हलका ताप येणे अशी लक्षणे दिसून येतात.

दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात गंभीर समस्या

जर खडा पित्तनलिकेत अडकला, तर त्यामुळे कावीळ, तीव्र ताप किंवा पॅनक्रियाटायटिस (स्वादुपिंडाची सूज) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. हे आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक असून, काही वेळा यामुळे मुदतपूर्व प्रसूती (प्री-मॅच्युअर डिलिव्हरी) होण्याचा धोका असतो.

प्रतिबंधात्मक उपाय

गर्भावस्थेत पित्ताशयाचे आरोग्य जपण्यासाठी तेलकट, मसालेदार आणि जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक आहे. आहारात पालेभाज्या, कडधान्ये आणि तृणधान्यांचा समावेश करावा. दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आणि एकाच वेळी जास्त जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या अंतराने अल्प आहार घेणे फायदेशीर ठरते. लठ्ठपणामुळे खडे होण्याचा धोका वाढत असल्याने वजनावर नियंत्रण ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गर्भावस्थेत होणारे बदल नैसर्गिक असले तरी, आहारातील शिस्त आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला यामुळे पित्ताशयासारख्या समस्यांपासून बचाव करता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT