तांबे हा आपल्या भारतीय संस्कृतीत नेहमीच महत्त्वाचा धातू मानला जातो. शतकानुशतकं आयुर्वेदात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. परंतु हा फायदा केवळ सामान्य तापमानाचे किंवा कोमट पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवून पिल्यास मिळतो. गरम पाणी मात्र कधीही तांब्याच्या भांड्यातून पिऊ नये, असे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे. यामागे अनेक वैज्ञानिक व आरोग्याशी संबंधित कारणेही सांगितली जातात.
तांब्याच्या भांड्यात उकळते किंवा खूप गरम पाणी घातले की त्याची रासायनिक प्रतिक्रिया जलद होते. त्यामुळे पाण्यात तांब्याचे कण किंवा तांब्याची अधिक मात्रा मिसळण्याची शक्यता वाढते. शरीराला तांबे आवश्यक असला तरी त्याचे अति सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरते. या प्रक्रियेला कॉपर टॉक्सिसिटी असे म्हटले जाते. तांब्याचे प्रमाण वाढले की पोटदुखी, मळमळ, उलट्या, अतिसार, चक्कर येणे, तोंडात धातूचा स्वाद येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
गरम पाण्यात तांब्याचे कण अधिक प्रमाणात मिसळले तर यकृतावरही ताण येतो. तांबे शरीरात साठू लागल्यास लिव्हरच्या पेशींवर परिणाम होतो आणि दीर्घकाळ असे पाणी पिल्यास यकृतविकार होण्याची शक्यता वाढते. काही संशोधनांनुसार जास्त तांबे शरीरात गेल्यास मूत्रपिंडांवरही दुष्परिणाम दिसू शकतात. यामुळे शरीरातील खनिज संतुलन बिघडते आणि पचनसंस्थेलाही त्रास होऊ शकतो.
तांब्याचे भांडे फक्त कोमट किंवा सामान्य पाण्यासाठी उपयुक्त आहे, कारण अशा पाण्यात तांब्याची योग्य मात्रा मिसळते आणि शरीराला त्याचा नैसर्गिक फायदा मिळतो. गरम पाण्यामुळे धातूचा पृष्ठभाग झपाट्याने प्रभावित होतो आणि त्यातून होणारे घातक रसायनांचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे आयुर्वेदातही गरम पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवू नये, असे स्पष्ट नमूद केले आहे.
गरम पाणी पिण्यासाठी नेहमी स्टील, काच किंवा मातीची भांडी वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते. यामुळे धातूचे मिश्रण किंवा रासायनिक प्रतिक्रिया टाळता येतात. तांब्याचे पाणी प्यायचे असल्यास रात्री पाणी भरून सकाळी कोमट स्वरूपात सेवन करणे योग्य आहे. शरीरातील विषारी घटक कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यासाठी तांब्याच्या पाण्याचा हा प्रकार खूप उपयुक्त ठरतो