Meal Timing Importance | जेवणापेक्षा वेळ महत्त्वाची का? File Photo
आरोग्य

Meal Timing Importance | जेवणापेक्षा वेळ महत्त्वाची का?

पुढारी वृत्तसेवा

मंजिरी फडके

पूर्वीपासून रात्री लवकर जेवावे, असे सांगितले गेले आहे. अनेक जण तर सूर्यास्तापूर्वीच जेवावे असे सांगताना आपण पाहिले आहेत. आता आधुनिक आरोग्यशास्त्रातही हीच बाब सांगितली जात आहे. तुमच्या जेवणाच्या ताटापेक्षा आणि त्यातील पदार्थांच्या पौष्टिकतेपेक्षाही तुमच्या जेवणाची वेळ अधिक महत्त्वाची आहे.

जेव्हा आपण उशिरा जेवतो, तेव्हा शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता 40 ते 50 टक्क्यांनी कमी होते, ज्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया मंदावते. रात्रीच्या वेळी शरीरातील मेलाटोनिन हे झोपेचे संप्रेरक वाढते, जे पचन प्रक्रियेत अडथळा आणू शकते. जेव्हा शरीराने स्वतःची अंतर्गत दुरुस्ती आणि विषमुक्त (डेटॉक्स) होण्याचे काम करायला हवे, तेव्हा शरीर अन्न पचवण्यात गुंतलेले असते. यामुळेच 8 तासांची झोप घेऊनही सकाळी उठल्यावर अनेकदा जडपणा, अपचन किंवा थकवा जाणवतो.

सूर्यास्तानंतर इन्सुलिनची कार्यक्षमता नैसर्गिकरीत्या कमी होत असल्याने, उशिरा केलेले जेवण शरीरात चरबी साठवण्यास मदत करते. संशोधनानुसार, जे लोक रात्री 7 वाजण्यापूर्वी जेवतात त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण रात्रीच्या वेळी 15 टक्क्यांनी कमी राहते आणि त्यांची इन्सुलिन संवेदनशीलता अधिक चांगली असते. लवकर जेवल्यामुळे रात्री उशिरा अस्वस्थ वाटणे किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होणे टाळता येते. रात्री 7 वाजता जेवल्यास साखरेची पातळी स्थिर राहते, तर रात्री साडेनऊनंतर जेवल्यास साखरेचे प्रमाण वाढते आणि शरीराच्या दुरुस्तीची प्रक्रिया मंदावते.

विशेषतः, मधुमेह (डायबिटीज), फॅटी लिव्हर किंवा साखरेचा त्रास असलेल्या लोकांसाठी लवकर जेवणे हा एक रामबाण उपाय आहे. उशिरा जेवल्यामुळे अशा रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी 30 ते 50 टक्क्यांनी वाढू शकते. सातत्याने उशिरा जेवल्यामुळे हृदयरोग आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पचन सुधारण्यासाठी, उत्तम झोपेसाठी आणि दीर्घकालीन आरोग्यासाठी रात्रीचे जेवण लवकरात लवकर उरकणे हाच सुद़ृढ जीवनशैलीचा मंत्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT