बी 6 जीवनसत्त्व 
आरोग्य

Vitamin B6 | शरीरासाठी बी 6 जीवनसत्त्व का आहे गरजेचे? जाणून घ्या सविस्तर

ही लक्षणे कमी होतात

पुढारी वृत्तसेवा
डॉ. मनोज कुंभार

शरीराच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. बी 6 जीवनसत्त्वही (Vitamin B6) त्यापैकीच एक. बी 6 हे जीवनसत्त्व पायरिडॉक्साईन नावाने ओळखले जाते. बी कॉम्प्लेक्स या जीवनसत्त्वाचा हा एक भाग असतो. बी 12 या जीवनसत्त्वाचाही तो एक भाग असल्यामुळे गर्भवती महिलांना त्यांच्या गर्भाच्या वाढीसाठी गरजेचे असते. त्याशिवाय बी 6 जीवनसत्त्वामुळे हृदयविकार दूर ठेवतो आणि मेंदूच्या विकासास मदत होते. या जीवनसत्त्वामुळे खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होते.

तसेच, आहारातील चरबी, प्रथिने यांचे पचन होण्यासही मदत करते. केस, त्वचा, यकृत आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही बी जीवनसत्त्व अत्यंत महत्त्वाचे असते. बी जीवनसत्त्वांच्या आठ घटकांपैकी पायरिडॉक्साईन हा एक महत्त्वाचा घटक आहे. पायरोडॉक्सल 5 फॉस्फेट -पीएलपी हे व्हिटॅमिन बी 6 चे मुख्य रूप आणि कोएन्झाइम आहे. हे पीएलपी शंभरहून अधिक एन्झाईम्सना त्यांच्या कामात मदत करते. व्हिटॅमिन बी 6 प्रतिकारशक्ती कायम राखण्यासही मदत करते. अलीकडील अभ्यासात असेही आढळून आले आहे की, व्हिटॅमिन बी 6 कर्करोगाचा धोका कमी करण्यासही महत्त्वाचे ठरते.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार्‍या मज्जासंस्थेचे कार्य नीट चालावे, यासाठी हे जीवनसत्त्व गरजेचे असते. त्यामुळे संधिवातासारखे आजार दूर राहू शकतात. विविध प्रकारे होणारे संसर्ग टाळण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती काम करत असते. बी 6 हे जीवनसत्त्व त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे रोग आपल्यापासून दूर राहतात. या जीवनसत्त्वामुळे आहारातील पोषक मूल्यांचे योग्य प्रकारे शरीरावश्यक ऊर्जेत रूपांतर केले जाते.

बर्‍याच स्त्रियांना मासिक पाळी येण्यापूर्वी ओटीपोटात दुखणे, कंबर दुखणे आदी त्रास जाणवतात. ही लक्षणे कमी करण्यामध्ये बी 6 जीवनसत्त्व फायदेशीर ठरते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मानसिक अस्वस्थता येऊ शकते. हार्मोन्स आणि त्याची पातळी यांच्यातील तोल यामुळे सांभाळला जातो. हार्मोन्सचा असमतोल मानसिक अस्वस्थता आणणारा असतो. बी 6 जीवनसत्त्वामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. कारण त्वचेच्या विविध आजारांशी सामना करण्यात बी 6 जीवनसत्त्व उपयोगी पडते. इसब, कोंडा, मुरुम, केस गळणे आणि कोरडी त्वचा तसेच सोरायसिस आणि मेलानोमासारख्या त्वचारोगात या जीवनसत्त्वाचा फायदा जास्त होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT