Neck Pain Treatment | मानदुखीवर वेळीच उपचार का गरजेचे? 
आरोग्य

Neck Pain Treatment | मानदुखीवर वेळीच उपचार का गरजेचे?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संतोष काळे

मानेत होणारी वेदना ही केवळ थकव्यामुळे उद्भवते असे नव्हे, तर काही वेळा ती मणक्यातील संसर्ग किंवा गाठीसारख्या गंभीर विकारांचेही निदर्शक असू शकते. त्यामुळे या वेदनेकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. दीर्घकाळ चुकीच्या स्थितीत बसणे आणि पडद्यांचा अतिरेकी वापर यांमुळे मज्जासंस्थेशी संबंधित समस्या उद्भवतात, ज्यासाठी वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते.

बहुतांश व्यक्तींना केव्हा ना केव्हा मानदुखीचा त्रास होतोच. एकाच स्थितीत दीर्घकाळ बसून राहिल्यास ही वेदना अधिकच तीव्र होते. अनेकदा चुकीच्या पद्धतीने बसण्याच्या सवयीमुळे तसेच मानसिक ताणतणावामुळेही मानदुखी सुरू होऊ शकते. मात्र अशी वेदना थोड्याच वेळात किंवा विश्रांती घेतल्यावर कमी होत असेल, तर त्याविषयी फारशी चिंता करण्याचे कारण नाही. एका आरोग्यविषयक अभ्यासानुसार, जे लोक दिवसातून सहा तासांहून अधिक काळ एकाच स्थितीत बसून राहतात, त्यांना मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. संगणक अथवा भ्रमणध्वनीचा वापर करत संपूर्ण दिवस बसून राहिल्यास हा धोका आणखी वाढू शकतो.

मानदुखीमागे दडलेले गंभीर विकार

एका वैद्यकीय संशोधनानुसार, सर्व्हायकल रॅडिक्युलोपॅथी, सर्व्हायकल मायलोपॅथी, संसर्ग, गाठ यांसारख्या गंभीर आजारांमध्येही मानदुखी होऊ शकते.

यासंदर्भात मानदुखीसह ताप येणे, कोणत्याही कारणाशिवाय वजन घटणे, सातत्याने डोकेदुखी होणे, अन्न गिळताना त्रास होणे, मुत्राशय किंवा आतड्यांच्या नियंत्रणात बदल जाणवणे, अशा स्वरूपाची काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण त्यामागे संसर्ग, दाहजन्य विकार किंवा मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर समस्या असू शकते.

अपघात किंवा पडल्यामुळे मणक्यास फ्रॅक्चर किंवा गंभीर इजा झाल्यासही अशीच लक्षणे दिसून येतात.

मणक्यातील संसर्ग : वारंवार ताप आणि वेदना जाणवत असल्यास मणक्यात संसर्ग झाल्याची शक्यता असते. यावर प्रतिजैविक अथवा बुरशीविरोधी औषधांच्या सहाय्याने उपचार करता येतो.

मणक्यातील गाठ अथवा कर्करोग : यामध्ये कंबर किंवा मानेत वेदना होणे, रात्री वेदना वाढणे, हातापायांत अशक्तपणा वा बधिरता जाणवणे अशी लक्षणे दिसतात. क्वचित प्रसंगी हा कर्करोगही असू शकतो, ज्यावर शस्त्रक्रिया, किरणोपचार किंवा रसायनोपचाराची मदत घेतली जाते.

मेनिन्जायटिस : मेंदू व मेरुरज्जूला आवरण देणार्‍या पटलांना सूज येणे म्हणजे मस्तिष्कावरणदाह. यामध्ये मान ताठरणे, उलट्या होणे, तीव्र ताप येणे अशी लक्षणे दिसतात. यावर प्रतिजैविक, विषाणूविरोधी किंवा बुरशीविरोधी औषधांच्या सहाय्याने नियंत्रण मिळवता येते.

मानदुखी टाळण्यासाठी मान दीर्घकाळ खाली झुकवून ठेवू नये. दीर्घकाळ वाहन चालवणे टाळावे. मानसिक ताण कमी करण्याचा आणि वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. बसताना मणका व मान सरळ ठेवावी. कामाच्या वेळी पडदा डोळ्यांच्या पातळीवर ठेवावा. अतिशय उंच किंवा कठीण उशी वापरणे टाळावे. नियमितपणे व्यायाम करावा. जड वस्तू उचलताना दोन्ही खांद्यांवर समसमान भार ठेवावा. मान सतत एकाच दिशेने वळवून ठेवू नये.

दीर्घकाळ स्टिरॉइड्स घेणार्‍या, ऑस्टियोपोरोसिसने ग्रस्त असलेल्या तसेच पूर्वी कर्करोग झालेल्या व्यक्तींसाठी मानदुखी अधिक धोकादायक ठरू शकते. हातापायांतील बधिरता किंवा अशक्तपणा झपाट्याने वाढत असल्यास, सतत वेदनेमुळे कार्यक्षमता घटल्यास किंवा चालण्या-फिरण्यात अडचण येत असल्यास मणक्याच्या शस्त्रक्रियेचा विचार करावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT