सतत थकल्यासारखं का वाटतं? pudhari photo
आरोग्य

सतत थकल्यासारखं का वाटतं? जाणून घ्या काही सामान्य कारणं

सतत थकव्याचा अनुभव घेणार्‍या व्यक्तींची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे

पुढारी वृत्तसेवा
डॉ. संतोष काळे

अंगमेहनत न करणार्‍या; परंतु तरीही सतत थकव्याचा अनुभव घेणार्‍या व्यक्तींची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. या थकव्यामागची नेमकी कारणं त्यांच्या लक्षात येत नाहीत; पण ती समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची त्यांची इच्छा असते. त्यांच्यासाठी...

गेल्या पाच-सात वर्षांत अशा तक्रारी करणार्‍यांची संख्या तब्बल 25 टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय जे तक्रार करत नाहीत; पण थकव्याचा अनुभव घेतात, त्यांची संख्या तर याहून कितीतरी जास्त असावी. सततचा थकवा हा केवळ एक शारीरिक समस्या नाही, तर तो मानसिक आरोग्यही सुस्थितीत नसल्याचे द्योतक आहे.

तज्ज्ञांच्या निरीक्षणांनुसार सतत थकव्यामागे काही सामान्य कारणं दिसून येतात.

1. चहा, कॉफी, थंड पेयं, दारू, सिगारेट, तंबाखू यासारख्या गोष्टींचे सेवन शरीराला तात्पुरते ताजेतवाने ठेवणारे वाटत असले, तरी अंतिमतः ते शरीराला अशक्त करतं. मोबाईलचे व्यसन शरीराला विश्रांतीपासून दूर नेतं.

2. अनियमित आहार वेळा, नाश्ता न करणे, जंक फूड किंवा फास्ट फूडवर अवलंबून राहणे यामुळे शरीरात पोषणतत्त्वांचा अभाव निर्माण होतो. यामुळेही सतत थकवा जाणवतो. सबब दररोज समतोल, पोषणमूल्यांनी भरलेला आहार घेणं आवश्यक आहे.

3. अ‍ॅनेमिया, हायपोथायरॉइडिझम, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्लीप अ‍ॅप्नीया यासारख्या आजारांमुळे सतत थकवा येतो. अशावेळी योग्य तपासणी करून उपचार सुरू करणं महत्त्वाचं आहे.

4. शरीरासाठी दररोज 7-8 तासांची शांत झोप आवश्यक असते. उशिरा झोपणं, शिफ्ट ड्युटी, टीव्ही किंवा मोबाईलवर वेळ घालवणं यामुळे झोपेचा ताळमेळ बिघडतो. परिणामी, ऐन सकाळीही आपल्याला थकल्यासारखं वाटत राहतं. यावर उपाय म्हणजे नियमित झोपेचं वेळापत्रक तयार करा आणि त्याचे काटेकोर पालन करा. रात्री लवकर झोपा आणि पहाटे लवकर उठून व्यायाम करा.

5. सततची स्पर्धा, मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य यामुळे शरीर आणि मन थकून जातं. मानसिक आजारांसाठी योग्य सल्ला आणि उपचार घेतल्यास उत्साह परत मिळवता येतो. मानसोपचारतज्ज्ञांकडे जायचे नसेल, तर किमान दररोज अर्धा तास ध्यानधारणा करावी. सुरुवातीला दहा मिनिटे, पंधरा मिनिटे असे करत रोज 30 मिनिटे ध्यान केल्यास थकव्याची समस्या कायमची संपुष्टात येऊ शकते. याशिवाय, अपुरं पाणी प्यायल्यामुळे थकवा आणि निरुत्साह वाटू शकतो. याखेरीज जड अन्नाचं सेवनही शरीराला सुस्त बनवतं.

या सर्वांचा विचार करून, जीवनशैलीत आवश्यक बदल करा. व्यसनांपासून दूर राहा, नियमित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, मानसिक स्वास्थ्य सांभाळा आणि पुरेसे पाणी प्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT