Constant Hunger After Eating | पोटभर जेवल्यानंतरही भूक लागतेय? 
आरोग्य

Constant Hunger After Eating | पोटभर जेवल्यानंतरही भूक लागतेय?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. भारत लुणावत

अनेकदा पुरेसे जेवण करूनही थोड्याच वेळात पुन्हा भूक लागल्याची जाणीव होते. याचे मुख्य कारण तुमची इच्छाशक्ती नसून तुमच्या आहारातील चुकीची निवड असू शकते.

काही पदार्थ वरवर आरोग्यदायी वाटत असले तरी, ते शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढवतात किंवा कमी करतात. यामुळे भूक अधिक तीव्र होते. हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट भरल्याची भावना निर्माण होण्याऐवजी शरीरात ‘इन्सुलिन स्पाईक्स’, संप्रेरकांचे असंतुलन आणि ऊर्जेची पातळी अचानक कमी होणे असे प्रकार घडतात. परिणामी, शरीर वारंवार अन्नाची मागणी करू लागते. अन्नातून खरी तृप्ती मिळवण्यासाठी फायबर, प्रोटिन आणि हेल्दी फॅट यांचे योग्य संतुलन असणे अत्यंत आवश्यक आहे. हे संतुलन बिघडते, तेव्हा शरीराला लवकर पुन्हा भूक लागते.

फळांचा रस हे आरोग्यासाठी उत्तम मानले जात असले तरी, जेव्हा आपण फळांचा रस पितो तेव्हा त्यातील फायबर पूर्णपणे निघून गेलेले असते. रसामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढते आणि तितक्याच वेगाने ती खाली येते. यामुळे काही वेळातच पुन्हा तीव्र भूक लागते आणि गोड खाण्याची ओढ निर्माण होते. व्हाईट ब्रेड हा रिफाईंड कार्बोहायड्रेटस्पासून बनलेला असतो. यामुळे पोट भरल्याची जाणीव करून देणारे सॅटायटी हार्मोन्स सक्रिय होऊ शकत नाहीत. म्हणूनच ब्रेड खाल्ल्यानंतर अवघ्या काही वेळातच पुन्हा भूक जाणवू लागते.

बाजारात मिळणारे ‘फ्लेवर्ड योगर्ट’ हे प्रथिनांच्या बाबतीत कमकुवत आणि साखरेच्या बाबतीत वरचढ असतात. यातील साखरेचे जास्त प्रमाण ‘इन्सुलिन स्पाईक्स’ निर्माण करत असल्यामुळे अन्नाची ओढ आणि भूक वाढते. त्याऐवजी साधे दही खाणे हा केव्हाही उत्तम पर्याय ठरतो. सकाळच्या न्याहारीसाठी वापरले जाणारे बहुतेक ‘ब्रेकफास्ट सीरिअल्स’ हे ‘अल्ट्रा प्रोसेस्ड’ असतात. यामध्ये फायबरचे प्रमाण नगण्य असते. सकाळी उठल्यानंतर लगेच असे पदार्थ खाल्ल्याने इन्सुलिन वेगाने वाढते, ज्यामुळे दिवसाची सुरुवात भूक आणि थकव्याने होऊ शकते.

भूक नियंत्रित ठेवण्यासाठी अख्खी धान्ये आणि संपूर्ण फळे खाण्यावर भर द्यावा. प्रथिनांचे पुरेसे सेवन आणि प्रक्रिया केलेल्या अन्नापासून दूर राहिल्यास केवळ भूक संतुलित राहत नाही, तर वजन आणि ऊर्जेची पातळी देखील सुधारते. आरोग्याशी संबंधित अधिक माहितीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही हिताचे ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT