Skin birthmark science | जन्मखुणा का निर्माण होतात? 
आरोग्य

Skin birthmark science | जन्मखुणा का निर्माण होतात?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संजय गायकवाड

काही मुलांच्या शरीरावर जन्मत:च असलेले डाग म्हणजेच ‘बर्थ मार्क’ हे अनेकदा कुतूहलाचा किंवा चिंतेचा विषय ठरतात. अनेकदा अशा खुणांना अनेकदा पूर्वजन्माच्या स्मृतींशी किंवा धार्मिक कथांशी जोडले जाते. मात्र, वैद्यकीय विज्ञानाच्या द़ृष्टिकोनातून पाहिल्यास या खुणांमागे कोणतीही गूढ कथा नसून, विशिष्ट शारीरिक प्रक्रिया कारणीभूत असतात.

सुमारे 80 टक्के बालके शरीरावर कोणत्या ना कोणत्या खुणेसह जन्माला येतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते या खुणा आईच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे किंवा गरोदरपणातील चुकांमुळे तयार होतात हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. याचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात, ज्यात रक्तवाहिन्यांशी संबंधित आणि रंगद्रव्यांशी संबंधित कारणांचा समावेश होतो.

जेव्हा त्वचेखालील रक्तवाहिन्यांचा विकास योग्य पद्धतीने होत नाही किंवा त्या एका ठिकाणी एकत्रित येतात, तेव्हा लाल किंवा गुलाबी रंगाचे डाग तयार होतात. यामध्ये ‘हेमॅन्जिओमा’ म्हणजे लाल किंवा निळसर उंचवटा आणि ‘मॅक्युलेर स्पॉटस्’ यांचा समावेश होतो. हे डाग अनेकदा कपाळ, पापण्या किंवा मानेच्या मागील बाजूस आढळतात. दुसर्‍या बाजूला त्वचेला रंग देणार्‍या पेशी जेव्हा शरीराच्या एका विशिष्ट भागात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात एकत्र येतात, तेव्हा तिथे काळे, निळे किंवा गडद तपकिरी डाग तयार होतात. यालाच आपण ‘रंगद्रव्यी’ खुणा म्हणतो. काही विशिष्ट डाग जसे की ‘पोर्ट-वाईन स्टेन्स’ हे गडद लाल किंवा द्राक्षांच्या मद्यासारख्या रंगाचे असतात. हे डाग वयानुसार अधिक गडद होत जातात आणि सहसा स्वतःहून नाहीसे होत नाहीत. याउलट पाठ किंवा कंबरेच्या खालच्या भागात असलेले निळसर रंगाचे ‘मँगोलियन स्पॉटस्’ बाळ मोठे होईल तसे साधारणपणे शाळेत जाण्याच्या वयापर्यंत पूर्णपणे नाहीसे होतात.

बहुतांश जन्मजात खुणांचा आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तथापि, जर एखाद्या खुणेचा आकार अत्यंत वेगाने वाढत असेल, तर ती तज्ज्ञांकडून तपासणे गरजेचे असते. डोळ्यांजवळ किंवा नाकावर असलेले मोठे डाग काही वेळा बाळाच्या द़ृष्टीला किंवा श्वास घेण्याच्या प्रक्रियेला अडथळा ठरू शकतात. आरोग्यास घातक नसले तरी चेहर्‍यावर असलेले मोठे डाग भविष्यात मुलाच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात आणि अशा वेळी आधुनिक लेझर उपचार पद्धतीने हे डाग कमी करण्याचा विचार पालकांकडून केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT