Pudhari
आरोग्य

Fat Loss Science : वजन कमी होते, तेव्हा शरीरातील चरबी कुठे जाते? संशोधकांचे ‘टक्केवारी’तील उत्तर तुमच्या अपेक्षेपेक्षाही विचित्र

शरीराला अन्नातून पुरेशी ऊर्जा मिळत नाही, तेव्हा साठवून ठेवलेली चरबी जाळून काम भागवू लागतं

पुढारी वृत्तसेवा

where does fat go when you lose weight : आधुनिक जगात वजन वाढणे आणि ते पुन्हा कमी करणे हे सर्वात आव्हानात्मक कामांपैकी एक आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना या समस्येला सामोरे जावे लागते. मात्र वजन कमी झाल्यानंतर शरीरातील चरबीचे नेमकं काय होतं? या प्रश्नावर संशोधन झाले. मात्र संशोधकांनी दिलेले उत्तर हे अपेक्षेपेक्षाही विचित्र आहे. जाणून घेऊया संशोधनात काय आढळलं याविषयी....

शरीर आपल्याकडे साठवून ठेवलेली चरबी इंधन म्हणून वापरते

'द कन्वर्सेशन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या संशोधकांनी यामागचं साधं-सोपं गणित उलगडलं आहे. जेव्हा आपण दिवसभरात अन्नातून जितकी ऊर्जा (कॅलरीज) घेतो, त्यापेक्षा जास्त ऊर्जेची शरीराला गरज भासते, तेव्हा खरी चरबी कमी होण्यास सुरुवात होते. अशा वेळी रोजची कामं करण्यासाठी शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही, त्यामुळे शरीर आपल्याकडे साठवून ठेवलेल्या चरबीचा (फॅट) इंधन म्हणून वापर करायला लागतं आणि हळूहळू वजन कमी होऊ लागतं.

अतिरिक्त चरबीचे होते 'ट्रायग्लिसराइड्स'मध्ये रूपांतर

जेव्हा अन्नातून चरबी म्हणजेच फॅट्स घेतो, तेव्हा ती थेट पचनसंस्थेत जाते. तिथे या चरबीचे बारीक तुकडे होऊन त्यापासून 'फॅटी ॲसिड्स' तयार होतात. यातील काही भाग शरीर लगेच वापरून घेते. यामध्ये नवीन पेशी बनवणे, हार्मोन्सचे संतुलन राखणे आणि शरीरातील नाजूक अवयवांचे रक्षण करणे याचा समावेश होतो; पण यातूनही जी अतिरिक्त चरबी उरते, त्याचे रूपांतर 'ट्रायग्लिसराइड्स'मध्ये होते. ही चरबी शरीर भविष्यात लागणाऱ्या ऊर्जेसाठी एका साठ्यासारखी जपून ठेवते.

शरीरात मुख्यत्वे दोन प्रकारे चरबी साठवली जाते

शरीरात मुख्यत्वे दोन प्रकारे चरबी साठवली जाते. त्वचेच्या अगदी खाली आढळणारी सबक्यूटेनियस फॅट आणि शरीराच्या आत अवयवांभोवती साठणारी व्हिसेरल फॅट. शरीरात जेव्हा कॅलरीची कमतरता निर्माण होते, तेव्हा संप्रेरके (hormonal) आणि चेतासंस्थेतील संकेत चरबीच्या पेशींना साठवलेली चरबी तोडण्यासाठी उत्तेजित करू लागतात. या प्रक्रियेला लायपोलायसिस (lipolysis) असे म्हणतात.

चरबीचे होते ऊर्जेत रूपांतर

जेव्हा शरीराला अतिरिक्त ऊर्जेची गरज असते, तेव्हा हा साठवलेला ट्रायग्लिसराइड्सचा साठा तुटायला लागतो. त्यातून बाहेर पडलेले फॅटी ॲसिड्स थेट आपल्या पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया'कडे जातात. मायटोकॉन्ड्रियाला शरीराचे पॉवर स्टेशन किंवा 'ऊर्जा केंद्र' म्हटले जाते. इथे 'बीटा-ऑक्सिडेशन' नावाची एक नैसर्गिक रासायनिक प्रक्रिया घडते. या प्रक्रियेत फॅटी ॲसिड्सचे लहान-लहान घटकांमध्ये रूपांतर होते, ज्याचा वापर शरीर आपली रोजची कामे करण्यासाठी ऊर्जा म्हणून करते. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शेवटी शरीरात कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होते, जे उच्छवास आणि घामावाटे बाहेर टाकले जाते.

कमी झालेल्या चरबीपैकी सुमारे ८४% चरबीचे कार्बन डायऑक्साइडमध्ये रूपांतर

संशोधकांच्या लेखानुसार, शरीरातून कमी होणारी बहुतेक चरबी घामातून नाही, तर आपण श्वास घेताना फुफ्फुसांवाटे बाहेर पडते. संशोधकांच्या गणनेनुसार, कमी झालेल्या चरबीपैकी सुमारे ८४% चरबीचे कार्बन डायऑक्साइडमध्ये रूपांतर होते आणि श्वास सोडताना ते शरीराबाहेर टाकले जाते, तर सुमारे १६% चरबीचे पाण्यात रूपांतर होते, जे घाम आणि इतर शारीरिक द्रव्यांद्वारे शरीराबाहेर टाकले जाते.

ही टक्केवारी केवळ अंदाजित

संशोधकांनी नमूद केले आहे की, ही टक्केवारी केवळ अंदाजित आहे, कारण चरबी कमी होण्याच्या प्रक्रियेदरम्यान शरीरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक घटकाचे अचूक मोजमाप करणे कठीण आहे.

व्यायामाने फॅट कमी होण्याचा अर्थ काय?

व्यायाम करणे किंवा आहारातील कॅलरीजचे प्रमाण कमी केले जाते तेव्हा शरीराची ऊर्जेची गरज वाढते. अन्नातून मिळणारी ऊर्जा ही गरज भागवण्यासाठी पुरेशी नसेल, तर शरीर आपल्यात साठवून ठेवलेल्या चरबीचा वापर करू लागते. परंतु, याचा अर्थ असा मुळीच नाही की वेगाने श्वास घेतल्याने चरबी कमी होते. श्वास बाहेर सोडणे हा केवळ चरबी जळल्यानंतर निर्माण झालेले घटक शरीराबाहेर टाकण्याचा मार्ग आहे; ती चरबी जळण्याची मूळ प्रक्रिया नाही. आहार आणि शारीरिक हालचालींच्या माध्यमातून 'कॅलरी डेफिसिट' (खर्च होणाऱ्या कॅलरीजपेक्षा कमी कॅलरीज घेणे) राखणे हाच मुख्य घटक आहे, ज्यामुळे शरीर साठवलेल्या ऊर्जेचा वापर करण्यास प्रवृत्त होते, असेही संशोधनांनी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT