डॉ. मनोज शिंगाडे
मधुमेहाचा परिणाम शरीरातील अनेक अवयवांवर होत असतो. हृदय, मूत्रपिंड आणि डोळ्यांच्या आरोग्याबाबत मधुमेहींना सातत्याने सावध केले जाते. मात्र, पायांच्या आरोग्याकडे अनेकदा पुरेसे लक्ष दिले जात नाही. प्रत्यक्षात दीर्घकाळ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले राहिल्यास पायांमधील मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते.
मधुमेहामुळे निर्माण होणार्या ‘पेरिफेरल न्यूरोपॅथी’मध्ये पायांमधील मज्जातंतूंचे नुकसान होते. सुरुवातीला पायांना मुंग्या येणे, जळजळ होणे, टोचल्यासारखे वाटणे किंवा बधिरपणा जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही रुग्णांना रात्रीच्या वेळी अधिक त्रास होतो. संवेदना कमी झाल्यामुळे पायाला जखम झाली, गरम वस्तूचा चटका बसला किंवा पादत्राणांमुळे त्वचेला इजा झाली, तरी ती लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
जखमा भरून येण्यास विलंब
सामान्यतः किरकोळ जखमा काही दिवसांत भरून येण्यास सुरुवात होते. मात्र, मधुमेहींमध्ये रक्ताभिसरण कमी असल्यास किंवा मज्जातंतूंचे नुकसान झाले असल्यास जखम भरून येण्यास विलंब होऊ शकतो. पायावरील फोड, कापलेली जागा किंवा त्वचेवरील व्रण वाढत असल्यास तातडीने तपासणी आवश्यक आहे. जखमेमध्ये पू तयार होणे, दुर्गंधी येणे किंवा आसपासची त्वचा लाल होणे ही संसर्गाची लक्षणे असू शकतात. गंभीर अवस्थेत संसर्ग खोलवर पसरून हाडांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.
त्वचेचा रंग आणि तापमान बदलणे
पायाचा रंग अचानक फिकट, निळसर किंवा काळपट होणे, एका पायाचे तापमान दुसर्यापेक्षा कमी जाणवणे किंवा त्वचा असामान्य थंड पडणे ही रक्तपुरवठ्यातील अडथळ्याची लक्षणे असू शकतात. दुसरीकडे पाय लालसर होणे, गरम जाणवणे आणि सूज येणे यामागे संसर्ग किंवा दाह असू शकतो. अचानक रंग बदलणे, तीव्र वेदना किंवा पाय थंड पडणे अशा परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
पायाला सूज येणे किंवा आकार बदलणे
मधुमेहामुळे मज्जातंतूंचे गंभीर नुकसान झालेल्या काही रुग्णांमध्ये ‘शार्को फूट’ नावाची समस्या निर्माण होऊ शकते. यामध्ये पायातील हाडे आणि सांध्यांची रचना कमकुवत होऊन त्यांचा आकार बदलू शकतो. पाय अचानक सुजणे, असामान्य गरम जाणवणे किंवा पूर्वी व्यवस्थित बसणारी पादत्राणे घट्ट होणे ही त्याची लक्षणे असू शकतात. विशेष म्हणजे काही रुग्णांना वेदना फारशा जाणवत नाहीत. वेळेवर उपचार न झाल्यास पायामध्ये कायमस्वरूपी विकृती निर्माण होऊ शकते.
त्वचेला भेगा आणि नखांमध्ये बदल
मधुमेहींमध्ये त्वचा कोरडी पडणे, टाचांना भेगा जाणे, नखे जाड होणे किंवा बोटांमध्ये बुरशीजन्य संसर्ग होणे अशा समस्या आढळू शकतात. त्वचेला पडलेल्या भेगांमधून जिवाणू शरीरात प्रवेश करू शकतात. पायांवरील घट्ट झालेली त्वचा किंवा घट्टे स्वतः कापण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे जखम होण्याची शक्यता असते.
पायांची काळजी कशी घ्यावी?
मधुमेहींनी दररोज पायांच्या तळव्यांची, टाचांची, बोटांमधील जागेची आणि नखांच्या आसपासच्या त्वचेची तपासणी करावी. पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन व्यवस्थित कोरडे करावेत. विशेषतः बोटांमधील जागा ओलसर राहणार नाही याची काळजी घ्यावी. कोरड्या त्वचेवर योग्य मॉइश्चरायझर वापरता येते; मात्र बोटांमध्ये तेल लावणे टाळावे. अनवाणी चालू नये. पायांना व्यवस्थित बसणारी, घर्षण न करणारी पादत्राणे वापरावीत.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, नियमित शारीरिक हालचाल करणे आणि धूम्रपान टाळणे यामुळे गुंतागुंतीचा धोका कमी करण्यास मदत होते. मधुमेहींनी किमान वर्षातून एकदा पायांमधील संवेदना आणि रक्ताभिसरणाची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. अधिक धोका असलेल्या रुग्णांना वारंवार तपासणीची गरज असू शकते. पायांवरील छोटी जखम, संवेदनांमधील बदल किंवा अचानक आलेली सूज याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास गंभीर संसर्ग, पायांमध्ये निर्माण होणारी विकृती कमी करता येते.