आजकाल हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. पण अनेकदा हृदयविकाराचा झटका नेहमीच्या लक्षणांशिवाय येतो. यालाच 'सायलेंट हार्ट अटॅक' (Silent Heart Attack) 'असे म्हणतात. सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे, जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो पण त्याची छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास यांसारखी सामान्य लक्षणे दिसत नाहीत. यामुळे अनेकदा व्यक्तीला आपण हृदयविकाराचा झटक्याच्या जवळ आहोत, याची कल्पनाही येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंपैकी हृदयविकाराचा झटका हे एक प्रमुख कारण आहे.
सायलेंट हार्ट अटॅक पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो, आणि यासाठी अनेक कारणे आहेत:
हार्मोनल बदल: रजोनिवृत्तीनंतर (Menopause) महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन (Estrogen) हार्मोनचे प्रमाण कमी होते. हा हार्मोन हृदयाला संरक्षण देतो. त्यामुळे हा हार्मोन कमी झाल्यावर हृदयविकाराचा धोका वाढतो.
असामान्य लक्षणे: पुरुषांमध्ये छातीत दुखणे हे मुख्य लक्षण असते, पण महिलांमध्ये लक्षणे वेगळी असतात. त्यांना जबड्यात, पाठीत, खांद्यात वेदना, जास्त थकवा, मळमळ किंवा छातीत जळजळ होण्याची लक्षणे दिसतात. ही लक्षणे सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते.
तणाव आणि जीवनशैली: आजकाल महिलांवर घर आणि ऑफिस अशा दोन्ही जबाबदाऱ्यांचा ताण असतो. हा तणाव आणि बदललेली जीवनशैली हृदयविकाराला आमंत्रण देते.
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे लगेच लक्षात येत नाहीत, पण काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास हा धोका टाळता येऊ शकतो:
असामान्य थकवा: कोणतेही काम न करता किंवा कमी काम करूनही खूप थकवा जाणवणे.
छातीत किंवा पाठीत वेदना: छातीत किंवा पाठीच्या वरच्या भागात अचानक वेदना होणे किंवा दबाव जाणवणे.
श्वास घेण्यास त्रास: जास्त श्रम न करताही श्वास लागत असेल, तर हे एक गंभीर लक्षण असू शकते.
मळमळ आणि छातीत जळजळ: अनेकदा सायलेंट हार्ट अटॅकमध्ये मळमळ होणे किंवा छातीत जळजळ झाल्यासारखे वाटते.
जबड्यात, गळ्यात किंवा डाव्या हाताच्या खांद्यात वेदना: या भागांमध्ये वेदना जाणवणे हे देखील एक लक्षण असू शकते.
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास हा गंभीर धोका टाळता येतो.