डॉ. मनोज कुंभार
अनेक महिने विश्रांती घेतल्यानंतर, लागलीच तीव्र व्यायाम सुरू केल्यास दुखापत होण्याची दाट शक्यता असते. विशेषतः, फक्त वीकेंडलाच व्यायाम करणार्यांना पायाचे स्नायू आखडणे किंवा पिंडर्यांमध्ये वेदना होणे यांसारख्या समस्या जाणवतात.
थोडा वेळ आराम, गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे किंवा सौम्य औषधांनी पायांच्या वेदनांच्या समस्यांमध्ये आराम मिळतो; पण रॅबडोमायोलिसिस किंवा रॅबडोसाठी हे उपाय पुरेसे नसतात. कारण, हा एक गंभीर आणि जीवघेणा प्रकार असून, याविषयीची माहिती बहुतांश व्यायामप्रेमींना नसते. पूर्वी फक्त अतिव्यायाम करणार्या खेळाडूंमध्ये, सैन्यातील जवानांमध्ये किंवा फिटनेसचा अतिरेक करणार्यांमध्ये रॅबडोची समस्या जाणवत असे; पण अलीकडील काळात अतिजड वजन उचलणे, अतिधावणे किंवा स्पिनिंग यांसारख्या व्यायाम प्रकारांची लोकप्रियता वाढत चालली असून, त्यातूनच रॅबडोंच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.
रॅबडोमायोलिसिस हा एक प्राणघातक आजार आहे. यामध्ये शरीरावर जास्त ताण आल्याने स्नायूंचा पूर्णपणे विद्राव होतो, म्हणजे स्नायू तुटून त्यातील घातक घटक रक्तात मिसळतात. सामान्य व्यायामात काही प्रमाणात स्नायूंवर ताण येणे स्वाभाविक असते. किंबहुना, त्यामुळे स्नायू मजबूत होतात. पण, जेव्हा व्यायामाचा ताण क्षमतेच्या पलीकडे जातो, तेव्हा स्नायूंचे तुकडे होऊ लागतात आणि रॅबडो तयार होतो. बहुतेक वेळा हे नव्याने व्यायाम सुरू करणार्या अतिउत्साही व्यक्तींमध्ये होते.
रॅबडोमायोलिसिस ओळखण्याची मुख्य लक्षणे म्हणजे
व्यायामानंतर 1 ते 3 दिवसांत युरीनचा रंग बदलतो. साधारणतः गडद तपकिरी युरीन दिसू लागल्यास तो इशारा समजावा.
एखाद्या विशिष्ट स्नायूमध्ये अत्यंत वेदना जाणवू लागतात.
एका ठरावीक स्नायूगटात कमकुवतपणा जाणवतो.
व्यायाम केलेल्या भागात फुगवटा निर्माण होतो.
स्नायू आखडल्यासारख्या वेदना होतात.
युरीनचा रंग बदलणे रक्तामुळे नव्हे तर मायोग्लोबिन नावाच्या विषारी प्रथिनामुळे होते. हे प्रथिन स्नायूंच्या क्षतीमुळे रक्तात मिसळते आणि मूत्रपिंडावर घातक परिणाम करते. यामुळे निर्माण होणारी सर्वात गंभीर गुंतागुंत म्हणजे मूत्रपिंड निकामी होणे. आतापर्यंतच्या अभ्यासानुसार सुमारे 15% रुग्णांमध्ये असा प्रकार घडताना दिसून आला आहे.
कधी कधी कंपार्टमेंट सिंड्रोम नावाचा आजारही होतो. यामध्ये सुजलेले स्नायू इतका दाब निर्माण करतात की रक्तप्रवाह अडतो आणि स्नायू क्षतिग्रस्त होऊन तुटण्याची शक्यता निर्माण होते. या अवस्थेमध्ये शस्त्रक्रिया आवश्यक ठरते. दरवर्षी अमेरिकेत सुमारे 25,000 रॅबडोचे रुग्ण नोंदवले जातात. यामध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका 5 ते 30 टक्केपर्यंत असतो. रॅबडो होण्यामागे फक्त तीव्र व्यायाम कारणीभूत नसतो. अन्यही कारणे असतात. यामध्ये मद्याचे अति सेवन, औषधांचे दुष्परिणाम, अंमली पदार्थांचे सेवन, स्नायूंशी संबंधित आनुवंशिक विकार, शारीरिक आघात किंवा अपघात आदींचा अंतर्भाव होतो.
सामान्य व्यायामानंतर शरीर दुखणे स्वाभाविक आहे. पण, जर फक्त एखाद्या स्नायूमध्ये अधिक वेदना होत असतील किंवा युरीनचा रंग बदलला असेल, तर डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. स्नायू विशेष वेदनादायक असेल, लघवीचा रंग बदललेला असेल, फुगवटा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उपचारामध्ये सामान्यतः प्रचंड प्रमाणात द्रवपदार्थ (जलोपचार) दिला जातो, जेणेकरून मूत्रपिंडातून विषारी द्रव्ये बाहेर पडतील. वेळेवर उपचार मिळाल्यास रॅबडो गंभीर रूप धारण करत नाही. त्यामुळे लक्षणे दिसू लागताच शरीराला पूर्ण विश्रांती द्या, योग्य आहार घ्या आणि विश्रांतीनंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू पुन्हा व्यायाम सुरू करा. कोणताही नवा व्यायाम प्रकार हळूहळू आणि तीव्रता वाढवत सुरू करा.
व्यायामाच्या आधी, दरम्यान आणि नंतर भरपूर पाणी प्या. उष्ण, दमट हवामानात व्यायाम टाळा. व्यायामाआधी क्रिएटिनयुक्तकिंवा ऊर्जावर्धक पेयांचे अति सेवन करू नका. आपल्या शरीराची मर्यादा ओळखा, इतरांसोबत स्पर्धा करू नका.