अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्वचेवरील कर्करोगी गाठी काढून टाकण्यासाठी मोस शस्त्रक्रिया करून घेतली आहे. कपाळावर केली गेलेली ही शस्त्रक्रिया जोपर्यंत एकही कर्करोगी पेशी उरत नाही तोवर केली जाते.
या शस्त्रक्रियेचे नाव तिचे जनक डॉ. फ्रेडरिक ई. मोस यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, मेलेनोमा आणि इतर दुर्मीळ प्रकारच्या त्वचेच्या कर्करोगासाठी ही पद्धत वापरली जाते. याला सूक्ष्मदर्शकीय शस्त्रक्रिया असेही म्हटले जाते. यात त्वचेचे थर काढून त्यांची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते. सर्व कर्करोगी पेशी पूर्णपणे नष्ट झाल्याची खात्री झाल्यावरच प्रक्रिया थांबते. या मार्गाने शक्य तितके निरोगी ऊतक वाचवले जाते.
या पद्धतीमुळे रुग्णावर अतिरिक्त उपचारांची गरज कमी पडते. ही पद्धत जोखमीच्या त्वचेच्या कर्करोगासाठी सर्वाधिक उपयुक्त मानली जाते. कारण, या उपचाराचा सक्सेस रेट जवळपास 99 टक्के आहे. या शस्त्रक्रियेची शिफारस विशिष्ट स्थितींमध्ये केली जाते.
* पुनःपुन्हा परत येणारा किंवा आधीच्या उपचारानंतर पुन्हा उद्भवलेला कर्करोग.
* मोठ्या आकाराचा, वेगाने वाढणारा किंवा अस्पष्ट कडा असलेला कर्करोग.
* डोळ्यांच्या भोवती, कान, नाक, तोंड, हात, पाय किंवा जननेंद्रियांसारख्या ठिकाणी झालेला कर्करोग, जिथे निरोगी ऊतक जपणे अत्यावश्यक असते.
ही साधारणपणे बाह्यरुग्ण शस्त्रक्रिया असते आणि चार तासांच्या आत पूर्ण होते.
लोकल अॅनेस्थेशिया औषध देऊन त्वचा सुन्न केल्यानंतर शल्यविशारद दिसणारा कर्करोग आणि त्याच्या आजूबाजूचा पातळ थर काढतात. यानंतर हे ऊतक प्रयोगशाळेत नेऊन सूक्ष्मदर्शकाखाली तपासले जाते. शल्यविशारद काढलेल्या जागेचा नकाशा तयार करतात. त्यामुळे कर्करोगी पेशी दिसल्या, तर नक्की कुठल्या भागात पुढील थर काढायचा, हे ठरते.
मेलेनोमा या प्रकारातील पेशी उघड्या डोळ्यांनी दिसण्यापेक्षा जास्त आत पसरलेल्या असू शकतात. त्या तशाच राहिल्या, तर कर्करोग खोलवर जाऊन लसिकाग्रंथीपर्यंत पोहोचू शकतो. तपासणीत अधिक प्रमाणात कर्करोग आढळला, तर पुन्हा थर काढून तपासणी केली जाते. जोवर कोणतीही कर्करोगग्रस्त पेशी आढळत नाही तोवर ही प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेनंतर जखम भरून काढण्यासाठी टाके, त्वचेचे प्रत्यारोपण किंवा जखम नैसर्गिकरीत्या भरू देणे असे पर्याय असतात.
या पद्धतीचा एक मोठा फायदा म्हणजे तत्काळ परिणाम दिसतात.
बहुतेक रुग्णांना काही दिवस सौम्य वेदना होतात; मात्र टाके किंवा व्रण पूर्ण बरे होण्यासाठी 12 ते 18 महिने लागू शकतात.