डॉ. मनोज कुंभार
एखाद्या उंच इमारतीच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर तिच्याकडे पाहताना क्षणभर दडपण जाणवणे किंवा उंच पर्वत पाहून त्याच्या भव्यतेची जाणीव होणे स्वाभाविक आहे; पण गगनचुंबी इमारत, प्रचंड पर्वत किंवा आकाराने अवाढव्य वाहन पाहिल्यानंतर मनात तीव्र भीती निर्माण होत असेल, हृदयाचे ठोके वाढत असतील आणि अशा वस्तू दिसू नयेत म्हणून संबंधित ठिकाणी जाणेच टाळले जात असेल, तर ही साधी भीती नसते. मोठ्या आकाराच्या वस्तूंविषयी वाटणार्या अशा अतार्किक आणि तीव्र भीतीला ‘मेगालोफोबिया’ म्हटले जाते.
फोबिया कोणत्याही वयात जाणवू शकतो. काही विशिष्ट फोबियांची सुरुवात बालपणी होते आणि त्यांची लक्षणे किशोरावस्थेत किंवा तारुण्यात अधिक स्पष्ट होऊ शकतात. मेगालोफोबियामध्ये प्रत्येक व्यक्तीला एकाच वस्तूची भीती वाटेल असे नाही. कुणाला गगनचुंबी इमारती पाहून अस्वस्थ वाटू शकते, तर कुणाला प्रचंड पर्वत किंवा आकाराने अवाढव्य वस्तू पाहिल्यानंतर भीती जाणवू शकते.
या भीतीचा परिणाम केवळ मनावर होत नाही. संबंधित वस्तू समोर आल्यानंतर प्रचंड घबराट आणि बेचैनी निर्माण होणे, हृदयाचे ठोके वेगाने वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे किंवा डोके गरगरणे आणि मळमळणे अशी शारीरिक लक्षणेही दिसू शकतात. भीती अधिक तीव्र झाल्यानंतर व्यक्ती उंच इमारती किंवा पर्वत असलेल्या परिसरात जाणे जाणीवपूर्वक टाळू लागते. अशाप्रकारे फोबिया दैनंदिन जीवनावरही मर्यादा आणू शकतो.
मेगालोफोबिया नेमका कशामुळे होतो, याचे एकच निश्चित कारण सांगता आलेले नाही. ही भीती रोजच्या आयुष्यात अडथळा निर्माण करू लागल्यास तिच्याकडे केवळ ‘मनाचा कमकुवतपणा’ म्हणून पाहणे उपयोगाचे नाही. उपचारांमध्ये ‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी’चा वापर केला जाऊ शकतो. ‘एक्स्पोजर थेरपी’मध्ये नियंत्रित वातावरणात भीती निर्माण करणार्या गोष्टींचा हळूहळू सामना करण्याचा सराव केला जातो. सुरुवातीला छायाचित्र किंवा व्हिडीओच्या माध्यमातून आणि पुढे टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
खोल श्वसन, मन एकाग्र करण्याच्या पद्धती आणि शरीरातील ताण कमी करणारे व्यायाम चिंता नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. भीतीमुळे प्रवास, काम, शिक्षण किंवा नेहमीच्या ठिकाणी जाण्यावर परिणाम होत असेल, तर मानसोपचारतज्ज्ञ किंवा प्रशिक्षित समुपदेशकाची मदत घेणे योग्य ठरते. भीती टाळत राहण्यापेक्षा तिचे स्वरूप समजून घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने तिचा सामना करणे अधिक उपयुक्त ठरू शकते.