आरोग्य

IVF म्हणजे काय रे भाऊ?

Pudhari News

डॉ. प्रवीण हेंद्रे

 प्रथम आपण गर्भ तयार कसा होतो ते पाहू.

 स्त्री जननेंद्रियाचे दोन भाग असतात. एक बाह्य जननेंद्रिय व आंत्र जननेंद्रिय. बाह्य जननेंद्रियाचे मुख बाहेरून उघडे असते, ज्याद्वारे समागम होतो व ही जननमार्ग नलिका आंत्र जननेंद्रियापर्यंत पोहोचते.

 आंत्र जननेंद्रियाचे मुख्य तीन भाग असतात. एक गर्भाशय, दुसरे दोन्ही बाजूस असलेल्या दोन गर्भनलिका व त्याच्या जवळच असणारे डावे व उजवे स्त्री बीजांड (Ovary) हे होत.

पुरुषाच्या बाह्य इंद्रियातील शिश्‍नाद्वारे समागमावेळेस धातू (वीर्य) ज्यामध्ये शुक्राणू असतात, ते या शिश्‍नरूपी पिचकारीद्वारे गर्भाशयाच्या मुखापर्यंत पोहोचवले जातात. हे शुक्राणू एक मिलीमध्ये दोन कोटी असतात व त्यांना स्वत:ची हालचाल करण्यासाठी शेपटी असते. जे शुक्राणू चपळ असतात, ते आपल्या शेपटाच्या सहाय्याने या जननमार्गातील गर्भाशयाच्या मुखामधून गर्भाशयापर्यंत पोहोचतात. गर्भाशयाला एक उजवी व एक डावी अशा दोन गर्भनलिका असतात. या गर्भनलिकेचे कार्य म्हणजे शुक्राणूंना स्त्री बीजापर्यंत पोहोचविणे तसेच तयार झालेला गर्भ गर्भनलिकेच्या बाजूच्या टोकापासून गर्भाशयाच्या पोकळीच्या टोकापर्यंत पोहोचविणे आहे.

गर्भाशयात पोहोचलेले शुक्राणू आता गर्भनलिकेमध्ये प्रवेश करतात व अशाप्रकारे ते गर्भनलिकेच्या स्त्री बीजांडाच्या टोकाच्या बाजूस येतात. प्रत्येक स्त्री दर महिन्याला एका बीजांडातून सरासरी एकच स्त्री बीज (अंडे) तयार करते व  गर्भनलिकेच्या टोकाला असलेल्या बोटासारख्या (Fimbria) च्या सहाय्याने ते गर्भनलिकमध्ये ओढून घेतले जाते. तर स्त्रीबीजाचे शुक्राणूद्वारे फलन या गर्भनलिकेच्या टोकाला होते. शुक्राणूला स्वयंभूपणे हालचाल करण्यासाठी शेपटी असते. परंतु, स्त्री बीज व एकदा स्त्री बीजामध्ये शुक्राणूचा शिरकाव झाला की, हेच भ्रूण संपूर्ण गोलाकार असते व त्यावर एक अभेद्य म्हणजचे एका शुक्राणूचा शिरकाव झाला की दुसर्‍या शुक्राणूला शिरण्यास मज्जाव करणारे कवच (Zonapellucida) हे आणखीनच कठीण व अभेद्य झालेले असते.  तर अशा गोलाकार भ्रूूणास गर्भनलिकेच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत नेण्यासाठी गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीजाच्या लयबद्ध हालचालीचा उपयोग होतो व त्यासाठी गर्भनलिका निरोगी असणे अपरिहार्य असते. तयार गर्भ गर्भाशयात पोहोचू शकला नाही व गर्भनलिकेमध्येच रूजला, तर अशी प्रेग्नंसी एक्टोपिक (Ectopic) होऊन ती फुटू शकते व स्त्रीच्या जीवास धोका होण्याचा संभव असतो.

अशाप्रकारे तयार झालेला गर्भ  गर्भ नलिकेद्वारे गर्भाशयात पोहोचतो व तेथील Endometrium  मध्ये रुजतो. तो रुजल्यानंतर साधारण 8 ते 8-1/2 महिने त्याचे संगोपन तिथेच होते व नंतर बाळंतपणाच्या कळा सुरू होऊन बाळ जन्मास येते. तर ही थोडक्यात अपत्य प्राप्तीची प्रक्रिया असते. थोडक्यात स्त्री बीज (अंडे) व शुक्राणूंचे मीलन हे गर्भनलिकेमध्ये होते व हा गर्भ गर्भाशयामध्ये रुजतो. 

जर आपण गर्भधारणा न होण्यामागील कारणे पाहिली, तर त्यात पुरुषांच्या शुक्राणूंचे दोष आढळतात. काही दोष हे अपरिवर्तनीय असल्याने सहजपणे अपत्यप्राप्ती होत नाही. चपळता, संख्या व त्याची गुणवत्तेमध्ये शुक्राणूमध्ये दोष असल्यास शुक्राणू स्त्री बीजाचे Zonapellucida कवच फोडू शकत नसेल किंवा शुक्राणू वहन करणार्‍या गर्भनलिकाच जर बंद  असतील, तर ही प्रक्रिया घडू शकत नाही. म्हणूनच अशा दाम्पत्यांना IVF अर्थात शरीराबाहेर भ्रूण तयार करून त्याचे गर्भाशयात प्रत्यारोपण करणे ही क्रिया करावी लागते. ज्या स्त्रीमध्ये स्वतःची अंडी तयार करण्याची क्षमता आहे व ज्यांच्या गर्भाशयात गर्भ रुजण्यासाठी अनुकूल परिस्थिती असते, अशा स्त्रियांना स्वतःचे मूल IVF तंत्रज्ञानाने होऊ शकते. तर कृत्रिम गर्भधारणा कशी करतात हे आपण ढोबळमानाने पाहू.

मूल हवे असलेल्या स्त्रीमध्ये स्त्री बीज निर्मितीची क्षमता आहे का हे रक्त तपासणीअंती (Blood Test) समजते. मग त्या स्त्रीस अत्युच्च दर्जाची स्त्री संप्रेरके व विविधप्रकारची औषधे वापरून एकाचवेळी अनेक स्त्री बीजे (Follicles) तयार केली जातात. गर्भधारणेस योग्य अशी स्त्री बीजे 18 ते 20 एमएमची झाली की HCG नावाचे इंजेक्शन दिले जाते व या इंजेक्शननंतर बरोबर 34 तासांनी स्त्रीला भूल देऊन तिच्या पोटामधील स्त्री बीजांचे एका टेस्ट ट्युबमध्ये संकलन केले जाते. त्यानंतर स्त्री बीजाच्या भोवतीच्या इतर पेशी काढून टाकल्या जातात व त्याच वेळेस नवर्‍याचे शुक्राणू चांगले धुवून त्याना ताजेतवाने केले जाते. हे शुक्राणू स्त्री बीजामध्ये शिरकाव करण्यासाठी सक्षम केले जातात. ही प्रक्रिया मुख्यत्वे दोन प्रकारची असते एक म्हणजे IVF यात पोटातून बाहेर काढलेल्या स्त्री बीजांवर फक्त शुक्राणू योग्य मात्रेमध्ये पसरले जातात व शुक्राणू स्वतःच्या ताकदीनेच या स्त्री बीजाचे फलन करतात; पण या प्रकारच्या उपचारात गर्भ तयार होण्याची शक्यता कमी असते. म्हणून त्याच्यापुढचे तंत्रज्ञान म्हणजे प्रत्यक्ष स्त्री बीजाला पकडून त्यात सूक्ष्म इंजेक्शनद्वारे शुक्राणू सोडून फलन करणे होय. याला ICSI असे म्हणतात. ICSI मध्ये स्त्री बीजामध्ये प्रत्यक्ष इंजेक्शनचे सहाय्याने शुक्राणूचे इंजेक्शन देतात. म्हणजेच IVF किंवा ICSI च्या तंत्राने फलित झालेली स्त्री बीजे भ्रूण Zygote तीन ते पाच दिवस IVF laboratory मध्ये ठेवले जातात. थोडक्यात निर्जंतुकीकरण केलेल्या वातावरणामध्ये 37 अंशाच्या तापमानाला उबवले जातात व तिसर्‍या किंवा पाचव्या दिवशी त्यातील उत्कृष्ट असे तीन ते चार गर्भ गर्भाशयात एका नलिकेद्वारे प्रत्यार्पित केले जातात. आज उच्च प्रतीची स्त्रीबीजे तयार करणे त्यापासून चांगल्या शुक्राणूंद्वारे चांगले गर्भ तयार करणे वैद्यकीय क्षेत्रास जमले आहे. परंतु, हा गर्भ गर्भाशयात रूजणे हे केवळ आपल्या नशिबावरच अवलंबून असते कारण त्यावर आज तरी रामबाण  अशी उपाययोजना वैद्यकीय क्षेत्राला अवगत झाली नाही. या झाल्या प्राथमिक क्रिया यानंतर PESA / TESA / MESA / OD / ED या पद्धती कशा करतात, हे पुढील लेखात पाहू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT