डॉ. प्राजक्ता गायकवाड
शरीरातील प्रत्येक पेशीला सुरळीत कार्य करण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता असते. मेंदू, हृदय, फुफ्फुसे आणि मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना त्याची गरज अधिक असते. शरीरातील ऊतींना आवश्यक तेवढा प्राणवायू मिळत नसल्याच्या स्थितीला ‘हायपॉक्सिया’ म्हणतात. ही अवस्था लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही उद्भवू शकते. काही वेळा ती अचानक निर्माण होते, तर फुफ्फुस किंवा हृदयाच्या दीर्घकालीन आजारांमुळे हळूहळू विकसित होऊ शकते.
‘हायपॉक्सिया’ आणि ‘हायपॉक्सिमिया’ या दोन संज्ञांमध्ये फरक आहे. रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होण्याला हायपॉक्सिमिया म्हणतात, तर शरीरातील ऊतींना पुरेसा प्राणवायू न मिळणे म्हणजे हायपॉक्सिया. दोन्ही अवस्था अनेकदा परस्परांशी संबंधित असतात.
सुरुवातीची लक्षणे कोणती?
प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्यास शरीर त्याची भरपाई करण्यासाठी श्वासोच्छ्वास आणि हृदयाची गती वाढवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सुरुवातीला धाप लागणे, वेगाने श्वास घेणे, हृदयाची धडधड वाढणे, अस्वस्थ वाटणे, थकवा, डोकेदुखी किंवा एकाग्रता कमी होणे अशी लक्षणे जाणवू शकतात.
स्थिती गंभीर झाल्यास सतत श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, गोंधळल्यासारखे वाटणे, अशक्तपणा, जास्त घाम येणे, छातीत अस्वस्थता तसेच बोलताना दम लागणे अशी लक्षणे दिसू शकतात. ओठ किंवा बोटांची टोके निळसर पडणे हेही शरीराला पुरेसा प्राणवायू मिळत नसल्याचे गंभीर लक्षण असू शकते. अत्यंत गंभीर अवस्थेत व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते किंवा श्वसनक्रिया निकामी होण्याचा धोका निर्माण होतो.
हायपॉक्सिया कशामुळे होतो?
दमा, न्यूमोनिया, तीव्र श्वसनसंसर्ग, दीर्घकालीन फुफ्फुसविकार, फुफ्फुसातील रक्तवाहिनीत गुठळी अडकणे, हृदयविकार तसेच जन्मजात हृदयदोष यामुळे हायपॉक्सिया होऊ शकतो. तीव्र रक्तक्षयामध्येही शरीराच्या ऊतींपर्यंत पुरेसा प्राणवायू पोहोचण्यात अडथळा येऊ शकतो. श्वसनमार्गात अडथळा निर्माण होणे किंवा अतिउंच प्रदेशात अचानक गेल्यामुळेही समस्या उद्भवू शकते. मुलांमध्ये श्वसनमार्गाचे संसर्ग आणि काही जन्मजात विकार ही महत्त्वाची कारणे ठरू शकतात.
प्राणवायूची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. एकाग्रता आणि स्मरणशक्ती कमी होणे, गोंधळ निर्माण होणे किंवा शुद्ध हरपणे अशी स्थिती उद्भवू शकते. हृदयावर ताण वाढल्याने धडधड वाढणे किंवा हृदयाची लय बिघडण्याचाही धोका असतो.
हायपॉक्सियाच्या मूळ कारणावर उपचार अवलंबून असतात. आवश्यकतेनुसार प्राणवायू देणे, श्वसनमार्ग मोकळा करणारी औषधे, संसर्गावरील उपचार किंवा गंभीर स्थितीत श्वसनासाठी यंत्राची मदत लागू शकते.
विश्रांतीच्या अवस्थेतही तीव्र धाप लागणे, ओठ निळसर होणे, छातीत वेदना, अचानक गोंधळ निर्माण होणे, शुद्ध हरपणे किंवा श्वास घेणे अत्यंत कठीण होणे ही आपत्कालीन लक्षणे आहेत. अशा वेळी घरगुती उपचार करण्यात वेळ न घालवता तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.