डॉ. महेश बरामदे
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मधून प्रेक्षकांना हसवणार्या अर्चना पूरन सिंह सध्या एका गंभीर आणि दुर्मीळ आजाराने त्रस्त आहेत. शूटिंगदरम्यान त्यांचा हात मोडला होता आणि त्यानंतर त्यांना ‘कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम’ म्हणजेच ‘सीआरपीएस’ या आजाराने ग्रासले आहे. त्यांचे चिरंजीव आयुष्मान सेठी यांनी सोशल मीडियावर ही माहिती देताना सांगितले की, आता अर्चना यांचा हात कधीही पहिल्यासारखा होऊ शकणार नाही. हा आजार नक्की काय आहे आणि त्याची लक्षणे कशी असतात, हे समजून घेणे आवश्यक आहे.
कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम ही मज्जासंस्थेशी (नर्वस सिस्टम) संबंधित अशी स्थिती आहे, ज्यामध्ये मेंदू वेदनांची जाणीव सामान्यपेक्षा कित्येक पटीने तीव्र स्वरूपात करतो. साधारणपणे हात किंवा पायाला झालेली एखादी दुखापत, शस्त्रक्रिया किंवा ट्रॉमानंतर ही समस्या उद्भवते. यामध्ये विशेष बाब अशी की, मूळ दुखापत बरी झाली, तरी वेदना कमी होत नाहीत. उलट त्या दुखापतीच्या तीव्रतेपेक्षाही कैक पटीने जास्त वेदना रुग्णाला सतत जाणवत राहतात.
सीआरपीएस हा सेंट्रल किंवा पेरिफेरल नर्व्हस सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे होतो. तुमची सेंट्रल नर्व्हस सिस्टीम (ज्यामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचा समावेश होतो) शरीराच्या विविध भागांना संदेश पाठवत असते. जेव्हा या यंत्रणेत बिघाड होतो, तेव्हा नसा आणि मेंदू यांच्यातील वेदना नियंत्रित करण्याची प्रक्रिया असंतुलित होते.
प्रभावित भागात सतत जळजळ, टोचल्यासारखे वाटणे किंवा तीव्र वेदना होणे, प्रभावित अंगामध्ये सूज येणे किंवा त्या भागाचा रंग बदलणे, त्या भागात अतिप्रमाणात घाम येणे किंवा तो भाग कधी खूप थंड, तर कधी खूप गरम वाटणे, स्नायूंमध्ये प्रचंड कमकुवतपणा येणे ही याची लक्षणे आहेत. वेदनेच्या भीतीमुळे रुग्ण त्या अवयवाचा वापर करणे कमी करतो; पण यामुळे समस्या अधिक गुंतागुंतीची होते.
सीआरपीएस या आजाराचा उपचार केवळ औषधांपुरता मर्यादित नाही. यासाठी वेदना व्यवस्थापन (पेन मॅनेजमेंट), फिजिओथेरपी, मनोवैज्ञानिक आधार आणि न्यूरोलॉजिकल देखरेख अशा एकत्रित उपचारांची गरज असते. योग्य वेळी आजाराचे निदान झाल्यास वेदना बर्याच अंशी नियंत्रित केल्या जाऊ शकतात, ज्यामुळे रुग्णाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, एखाद्या दुखापतीनंतर वेदना असामान्यपणे दीर्घकाळ टिकून राहिल्या किंवा वाढत गेल्या, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. सुरुवातीच्या टप्प्यात तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास या आजाराचा प्रभाव कमी करून रुग्णाला चांगले जीवन जगण्यास मदत करता येते.