डॉ. सम्यक पंचोली
खांदा हा शरीरातील सर्वाधिक हालचाल करणार्या सांध्यांपैकी एक आहे. दैनंदिन जीवनातील हात वर उचलणे, वस्तू उचलणे, कपडे घालणे, केस विंचरणे किंवा वाहन चालविणे अशा असंख्य हालचालींसाठी खांद्याचे आरोग्य महत्त्वाचे असते.
खांद्याची रचना अत्यंत गुंतागुंतीची असते. अनेकदा खांद्याच्या वेदनांचा संबंध आपण ‘रोटेटर कफ’ किंवा ‘फ्रोजन शोल्डर’शी जोडतो; पण खांद्याच्या वरच्या भागात होणार्या तीव्र वेदनांमागे ‘अॅक्रोमियोक्लेव्हिक्युलर जॉईंट आर्थरायटिस’ हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. हा सांधा म्हणजे आपल्या कॉलर बोन (क्लेव्हिकल) आणि खांद्याच्या हाडाचा वरचा भाग (अॅक्रोमियन) यांना जोडणारा दुवा होय. या सांध्यातील गादीची (कार्टिलेज) झिज होते, तेव्हा त्याला एसी जॉईंट आर्थ्रायटिस असे म्हटले जाते.
कशामुळे होतो हा त्रास?
एसी जॉईंट आर्थ्रायटिस होण्यास काही कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, वाढत्या वयानुसार सांध्यांमधील नैसर्गिक गादी हळूहळू झिजते. त्यामुळे पन्नाशीनंतरच्या व्यक्तींमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो. दुसरी गोष्ट म्हणजे, जे लोक जिममध्ये अवजड वजन उचलतात, बॉडीबिल्डिंग करतात किंवा ज्यांच्या व्यवसायात खांद्याचा वारंवार वापर होतो, त्यांच्या या सांध्यावर अतिताण पडून झीज लवकर होऊ शकते. याशिवाय तरुणपणी खांद्याला झालेली कोणतीही गंभीर दुखापत किंवा सांधा निखळला असेल, तर त्यामुळे भविष्यात तिथे आर्थ्रायटिस होण्याचा धोका अधिक असतो. काही व्यक्तींमध्ये सांध्यांची रचनाच अशी असते की, त्यांचा हा त्रास होण्याकडे कल अधिक असतो.
लक्षणे कोणती?
एसी जॉईंट आर्थ्रायटिसचे सर्वात मुख्य लक्षण म्हणजे खांद्याच्या अगदी वरच्या टोकाला होणारी वेदना. अनेक रुग्ण सांगतात की, जेव्हा ते हात छातीसमोरून दुसर्या खांद्याकडे नेतात, तेव्हा वेदना तीव्र होतात. तसेच झोपताना त्या खांद्यावर कुशीवर झोपणे कठीण होते. सांध्यामध्ये ‘कट-कट’ असा आवाज येणे, हालचाल करताना कडकपणा जाणवणे किंवा जड वस्तू उचलण्यास असमर्थता असणे हीदेखील याची प्रमुख लक्षणे आहेत.
निदानासाठी डॉक्टर सहसा शारीरिक तपासणी करतात, ज्यामध्ये खांद्याच्या हालचालींची चाचणी घेतली जाते. त्यानंतर एक्स-रे किंवा एमआरआयद्वारे सांध्याच्या झिजेची तीव्रता समजून घेतली जाते. वेदना आणि सूज कमी करण्यासाठी रुग्णांना दाहशामक औषधे सुरुवातीला दिली जाऊ शकतात. इतर सर्व उपाय अपयशी ठरतात, तेव्हा ‘डिस्टल क्लेविक्युलर रिसेक्शन’ नावाची छोटी शस्त्रक्रिया केली जाते. एसी जॉईंट आर्थ्रायटिस हा आजार जीवघेणा नसला, तरी तो आपल्या दैनंदिन कामात मोठा अडथळा ठरू शकतो. वेळेवर निदान आणि योग्य व्यायामाच्या मदतीने आपण यावर मात करू शकतो.
खांद्याचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी नियमित शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यायाम करणे, व्यायाम किंवा खेळ सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप न विसरता करणे, जड वजन योग्य तंत्रानेच उचलणे, खांद्याला दुखापत झाल्यास त्वरित उपचार घेणे आणि वेदना दीर्घकाळ दुर्लक्षित न करणे हे प्रतिबंधासाठी महत्त्वाचे उपाय आहेत.