वाढतं वजन हा अनेकांच्या चिंतेचा विषय असतो. ते कमी तर करायचं असतं पण खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवणं अनेकांना शक्य होत नाही. डायटिंंग शिवाय वेट लॉस करता येतो असं कोणी सांगितलं तर चटकन विश्वास ठेवणं कठीण आहे पण हे शक्य आहे.
डायट केलं म्हणजेच वजन कमी होतं असं नाही, तर योग्य जीवनशैली आचरली तरी वजन कमी करता येऊ शकतं. त्यासाठी नक्की काय करावं लागेल?
सगळ्यात आधी शरीराला नियमित व्यायामाची सवय लावा. त्यात सातत्य राखणं गरजेचं आहे. व्यायाम केल्याने तुमच्या मांसपेशीवर जोर पडतो आणि त्यामुळे उत्साह वाढतो. आठवड्यातले 150 मिनिट व्यायाम करणं गरजेचं आहे. नंतर हा वेळ हळूहळू वाढवा. व्यायाम करण्याआधी वार्मअप जरूर करा. त्याचा शरीराला फायदा होतो. सकाळी उठल्यावर आधी एक ग्लास कोमट पाणी पिण्यानेही वजन कमी करायला मदत होते. त्यात लिंबाचा रस आणि मध घातलं, तर आणखीनच फायदा होतो. ज्यांना लिंबू चालत नसेल त्यांनी नुसता मध घालावा. त्यामुळे पोट साफ राहायला आणि अंगातील चरबी कमी व्हायला मदत होते; पण हे उपाय दीर्घकाळ करायला हवेत.
वजन कमी करताना कमी खाणं हा उपाय अजिबात करू नका. उलट थोडं थोडं आणि दर दोन-तीन तासांनी खा. हे खाण्याचे पदार्थ मात्र बाहेरचे तयार पदार्थ नसावेत. कारण, वजन कमी करताना बेकरी उत्पादने, चॉकलेट, केक, वेफर्स आईस्क्रिम यासारख्या काही पदार्थांना फाटा द्यावाच लागेल. बाकी तेलकट आणि तुपकट पदार्थही थोडे कमी खावेत. घरगुती पदार्थांत मात्र पराठे, थालीपीठ, घावन, डोसे, इडली, भडंग असे पदार्थ खायला काहीच हरकत नाही. खाकरे, चुरमुरे, दाणे, डाळ अशा पदार्थांनी चव वाढवायला हरकत नाही. भात खायलाही हरकत नाही; पण तो दुपारच्या जेवणात घ्यावा. रात्रीचं जेवण शक्यतो सातच्या आत आणि हलकं घ्यावं. ताक, सूप, कोशिंबिरी यांचा वापर चांगला करावा. बाहेर खाण्याची सवय असेल, तर ती थोडी मोडायला हवी किंवा त्यातले हेल्दी ऑप्शन निवडायला हवेत. मिठाई कमी करायला हवी. यातले काही पदार्थ खायची इच्छा झालीच, तर ते सकाळच्या वेळी खावेत म्हणजे ते पचायला मदत होते.
भरपूर पाणी पिणं हादेखील स्वस्थ राहण्याचा एक सोपा मार्ग आहे. शिवाय तो वजन कमी करायलाही मदत करतो. दिवसभरात कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. जेवण झाल्यावर कमीत कमी एका तासाने पाणी पिल्याने वजन कमी करायला मदत होते.
वजन कमी करायला सलाड खूप उपयोगी पडतात. त्यातून चरबी वाढवणारे पदार्थ शरीरात जात नाहीत शिवाय शरीराची भुकेची गरज भागते. त्यात गाजर, काकडी असे सहज मिळणारे पदार्थ, तर घ्याच; पण बरोबर फळांचाही मुक्त हस्ताने वापर करा. रोज सकाळी एक फळ खाऊन नंतर नाश्ता केला, तर त्याचा वजन कमी करायला खूपच फायदा होतो, असं दिसून आलं आहे.
रात्री जेवल्यावर लगेच झोपणं ही आणखी एक चुकीची सवय मोडायला हवी. रात्रीचे जेवण झाल्यावर थोडी हालचाल झाली पाहिजे. जेवण आणि झोपेची वेळ यात कमीत कमी एक तासाचं अंतर हवं. जास्त कॅलरी असलेलं जेवण घेतल्यानंतर तर शरीराची थोडीफार हालचाल झालीच पाहिजे.
काहीवेळा एखादा पदार्थ आवडला की, तो जास्त खाल्ला जातो. त्यावेळी हे भान राहत नाही; पण या ओव्हर इटिंगमुळे तुमचं वजन वाढत राहतं. जेवढी भूक असेल त्यापेक्षा थोडं कमी जेवा. समजा तुमची भूक दोन पोळ्यांची असेल, तर दीड पोळी झाली की थांबा. टीव्ही किंवा कॉम्प्युटरसमोर बसून कधीही खाऊ नका. त्यामुळे तुम्ही किती खात आहात याचा अंदाज येत नाही. याशिवाय सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नका. सकाळी नाश्ता केल्याने वजन काबूत राहतं. कारण, शरीराला योग्य पोषण मिळाल्याने त्याची पुन्हा पुन्हा अन्न मागण्याची इच्छा कमी होते.
अशा काही छोट्या गोष्टींचं पालन केलं, तर वजन कमी व्हायला आणि काबूत राखायला मदत होते. त्यासाठी खूप व्यायाम किंवा हार्ड डाएट करायची गरज नाही. फक्त नियमित काही गोष्टींचं पालन करा. त्यासाठी एक डायरी करून त्याची नोंद करून ठेवा आणि आपण बरोबर ट्रॅकवर आहोत ना, याची तपासणी करत राहा. याचा फायदा काही महिन्यांत तुम्हाला नक्कीच होईल.