आरोग्य

उंची वाढवायचीय? | पुढारी

Pudhari News

डॉ. प्राजक्‍ता पाटील

आपण उंच असावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. कारण उंचीमुळे एक प्रकारचा आत्मविश्‍वास मिळतो आणि व्यक्‍तिमत्त्व प्रभावी बनते. उंचीही बर्‍याच प्रमाणात अनुवंशिकतेवर अवलंबून असली तरीसुद्धा पुरेसे प्रयत्न केल्यास नक्‍कीच चांगली उंची वाढू शकते. त्यासाठी योग्य आहार, व्यायाम, खेळ यासोबतच काही घरगुती उपाय केल्यास चांगला पारिणाम दिसून येतो. यामुळे 18 वर्षांनंतरसुद्धा काही इंच उंची वाढू शकते.

उंची ही नैसर्गिक देणगी असली तरीसुद्धा ज्या व्यक्‍तींची सरासरी उंची कमी आहे, त्यांना आपण उंच असावे असे मनातून वाटतच असते. उंच असलेल्या व्यक्‍तींना एक प्रकारचा आत्मविश्‍वास नकळतपणे येतो. कमी उंचीच्या व्यक्‍ती खासकरून पुरुषांमध्ये आत्मविश्‍वासाची कमतरता जाणवते. कुठल्याही व्यक्‍तीची उंची ही त्याच्या अनुवांशिकतेवर बर्‍याच प्रमाणात अवलंबून असते. अर्थात फक्‍त यावरच ती अवलंबून असते असे म्हणता येणार नाही. मानवी शरीरामध्ये ह्युमन ग्रोथ हार्मोन (एचजीएच) नावाचे संप्रेरक उंची ठरवत असते. हे हार्मोन पिच्युटरी ग्रंथींपासून तयार होते आणि हाडांची आणि कार्टिलेजची वाढ होण्यास ते अत्यंत महत्त्वाचे असते. 

या व्यतिरिक्‍त उंचीबाबत परिणाम करणारे आणखी काही घटक असतात. जे उंची वाढण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. गरोदरपणात धूम्रपान केल्यास, जन्मानंतर पुरेशी काळजी न घेतल्यास, जन्मतः कमी वजन असल्यास, लहानपणी आरोग्य सुद‍ृढ नसल्यास या गोष्टींचा उंचीवर परिणाम होतो. बरेचदा लोकांना असे वाटते की, एकदा मोठे झाले म्हणजे उंची वाढत नाही; पण 18 व्या वर्षानंतरसुद्धा काही इंच उंची वाढू शकते. अर्थात त्यासाठी जीवनशैलीमध्ये काही आरोग्यपूर्ण सवयींचा समावेश करणे गरजेचे असते. उंची कशाप्रकारे वाढवता येईल, यासाठी काही उपयुक्‍त ठरणारे उपाय जाणून घेऊ. 

अश्‍वगंधा ः आयुर्वेदानुसार अश्‍वगंधा ही वनस्पती उंची वाढण्यासाठी उपयोगाची ठरते. अश्‍वगंधामध्ये अनेक प्रकारचे क्षार असतात. ते हाडे रूंद होण्यासाठी आणि त्यांची घनता वाढण्यासाठी उपयोगाचे ठरतात. यामुळे उंची वाढण्यास मदत होते. काष्टवैद्याच्या दुकानामध्ये अश्‍वगंधा सहजपणे मिळते. 

घेण्याची पद्धत ः दोन चमचे अश्‍वगंधा पावडर कोमट गायीच्या दुधात मिसळून त्यामध्ये साखर घालावी, व्यवस्थित हलवून हे दूध प्यावे. झोपण्यापूर्वी सलग 45 दिवस हे दूध घेतल्यास उंची वाढल्याचे लक्षात येईल. चांगले परिणाम दिसण्यासाठी फास्टफूड खाणे पूर्णपणे टाळावे. 

दूध ः दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आवश्यक क्षार असतात. जे हाडांच्या वाढीसाठी उपयुक्‍त ठरतात. कॅल्शियम हे हाडांच्या वाढीसाठी खूप आवश्यक असते. तसेच 'अ' जीवनसत्त्व आणि प्रथिने हे दुधातील घटकसुद्धा शरीराच्या एकूणच वाढीसाठी खूप आवश्यक असतात. काही इंच उंची वाढवायची असल्यास दिवसांतून दोन ते तीन ग्लास दूध प्यावे. तसेच चीज, योगार्ट, क्रिम यासारखी डेअरी उत्पादनेसुद्धा नियमित खावीत. उंची वाढण्यासाठी त्यांचाही उपयोग होतो. 

योगा ः नैसर्गिकरीत्या उंची वाढविण्यासाठी योगासनांसारखा चांगला उपाय नाही. योगामधील काही व्यायाम शरीराची वाढ होण्यासाठी आणि हार्मोन्स स्त्रवण्यासाठी उपयोगाचे ठरतात. तसेच योगामुळे ताण दूर होण्यास मदत होते, तसेच पाठीच्या स्नायूंवर ताण येतो आणि त्यामुळे उंची अधिकाधिक वाढण्यास मदत होते. योगासनातील उंची वाढण्यासाठी सर्वोत्तम ठरणारा प्रकार म्हणजे सूर्य नमस्कार. यामध्ये बारा वेगवेगळी आसने असून ती विशिष्ट क्रमामध्ये गुंफलेली आहेत. त्याचा उंची वाढण्यास अत्यंत उपयोग होतो. 

स्ट्रेचिंग ः कुठल्याही वयात उंची वाढण्यासाठी स्ट्रेचिंग परिणामकारक ठरते. पायाच्या पंजांवर उभे राहून शरीर स्ट्रेच करावे. काही मिनिटे दिवसांतून तीन-चार वेळी नियमितपणे ही कृती केल्यास चांगला फरक दिसून येतो. तसेच स्ट्रेचिंगमध्ये कारस्ट्रेच, सुपर स्ट्रेच, कोब्रा स्ट्रेच, बाऊडाऊन आणि बेसिक लेग स्ट्रेचिंग इत्यादी प्रकार केल्यास त्याचाही चांगला फायदा होतो. यामुळे मोठे झाल्यानंतरसुद्धा एक दोन इंच उंची वाढू शकते. शिवाय बांधाही चांगला राहण्यास मदत होते. 

व्यायाम आणि खेळ ः व्यायाम आणि खेळ हे ग्रोथ हार्मोन पुरेशा प्रमाणात तयार होण्यास अत्यंत उपयोगाचे ठरतात. यामुळे उंची वाढण्यास मदत होते. उत्तम उंची हवी असल्यास नियमित व्यायाम आवश्यक आहे. तसेच खेळामध्येसुद्धा सहभागी होणे गरजेचे असते. दोरीच्या उड्या मारणे हा एक त्यासाठी उत्तम पर्याय आहे. मोकळ्या हवेत किमान 30 मिनिटे तरी दोरीच्या उड्या माराव्यात. याचा खूप चांगला परिणाम होतो. 

तसेच लोखंडी बारला लटकणे हा सुद्धा चांगला उपाय आहे. यामुळे पाठीचा कणा ताणला जातो आणि उंची वाढण्यास मदत होते. लटकलेल्या स्थितीत दहा सेकंद थांबावे. ही क्रिया दिवसातून किमान सहावेळा करावी. यासोबतच टेनिस, बास्केटबॉल यासारख्या खेळांमध्ये उड्या मारण्याची क्रिया अनेकदा होते. त्याचा उपयोग उंची वाढण्यास होतो. तसेच वजन योग्य राहण्यासही मदत होते. याबरोबरच सायकलिंग, स्विमिंग यासारख्या गोष्टी नियमितपणे केल्यास त्याचा नक्‍कीच उंची वाढण्यासाठी आणि उत्तम शरीरयष्टी बनण्यासाठी उपयोग होतो. 

पुरेशी झोप घ्यावी ः विश्रांतीच्या वेळी अर्थात झोपेमध्ये शरीराची वाढ होते आणि पेशी पुन्हा नव्याने तयार होतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ह्यूमन ग्रोथ हार्मोन जे उंची वाढण्यासाठी जबाबदार असते, ते गाढ झोपेत असतानाच नैसर्गिकरीत्या तायर होते. गाढ झोपेत असताना मेंदू रिलॅक्स असतो आणि तो अधिक ग्रोथ हार्मोन्स तयार करतो. या उलट थकलेला मेंदू कमी प्रमाणात ग्रोथ हार्मोन्स तयार करतो. नियमानुसार वाढीच्या वयात व्यक्‍तीला 8 ते 11 तासांची योग्य झोप प्रत्येक रात्री आवश्यक असते. त्यामुळे चांगली उंची वाढण्यास खूप मदत होते. 

संतुलित आहार ः योग्य प्रमाणात पोषक घटक न मिळाल्यामुळे व्यक्‍तीची जास्ती जास्त उंची वाढू शकत नाही, असे अभ्यासातून लक्षात आले आहे. त्यामुळे योग्य पोषक घटक मिळण्यासाठी संतुलित आहार अत्यावश्यक असतो. झिंक, मँगेनिज, 'क' जीवनसत्त्व, प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक नैसर्गिकरीत्या उंची वाढण्यासाठी अत्यंत गरजेचे असतात. त्यामुळे दैनंदिन आहारात पालेभाज्या, रंगीत भाज्या, फळे, बिया, कडधान्ये, डेअरी उत्पादने इत्यादी प्रकारांचा समावेश असायलाच हवा. 

सूर्य प्रकाश ः 'ड' जीवनसत्त्वाचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश होय. उंची वाढण्यासाठी हा मूलभूत घटक आहे. शरीरात पुरेशा प्रमाणात 'ड' जीवनसत्त्व नसल्यास हाडे कमकुवत बनतात आणि उंचीही कमी राहते. 'ड' जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी रोज वीस ते तीस मिनिटे सूर्य प्रकाशात थांबावे. अर्थात सकाळी लवकर यासाठी बाहेर पडावे. जेणेकरून 'ड' जीवनसत्त्व मिळेल आणि दुपारच्या वेळी तीव्र उन्हात सूर्याच्या अतिनिल किरणांपासून संरक्षणही मिळेल. तसेच सूर्य प्रकाशाबरोबरच 'ड' जीवनसत्त्वासाठी दूध, चीज, अंडी, ऑलिव्ह, मासे इत्यादी पदार्थ आहारात समाविष्ट करावे. 

उठण्या-बसण्याची योग्य पद्धत ः उठणे, बसणे, चालणे यांची स्थिती योग्य असणे हे उंची वाढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. डोके, मान आणि पाठ बसताना, चालताना सरळ स्थितीतच असावी. यामुळे कणा ताणला जातो, स्नायू शिथिल होतात आणि उंची वाढण्यास मदत होते. याउलट वाकून बसल्यास किंवा उभे राहिल्यास पाठीचा कणाही वाकतो आणि त्याचा परिणाम नैसर्गिक उंची न वाढण्यावर होतो. म्हणूनच खुर्चीत बसताना खांदे सरळ ठेवावे आणि हनुवटी वर ठेवावावी. तसेच उभे राहताना आणि चालतानासुद्धा शरीर ताठ ठेवावे. 

पुरेसे पाणी प्यावे ः संपूर्ण दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि पचनक्षमता वाढते. तसेच यामुळे चयापचयाचा वेगही वाढतो. त्याचा थेट परिणाम उंचीवर होतो. एकूणच आरोग्यासाठी दिवसांतून कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यावे. पाण्यासोबतच ज्या फळांमध्ये भरपूर पाणी आहे आणि काकडीसारख्या भाज्यादेखील नियमितपणे खाव्यात. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT