Laryngeal Paralysis | स्वरयंत्राचा अर्धांगवायू  Pudhari File Photo
आरोग्य

Laryngeal Paralysis | स्वरयंत्राचा अर्धांगवायू

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संतोष काळे

काही काळासाठी आवाज बसणे, ही तशी सर्वसामान्य समस्या. मुळात ‘समस्या’ म्हणण्यासारखी ती बरेचदा त्रासदायकही नसते. काही वेळा घशामध्ये वेदना जाणवतात. परंतु, तुमचा आवाज आठवड्यांनंतर, महिन्यांनंतरही पूर्ववत झाला नसेल, तर निश्चितच ती चिंतेची बाब मानावी आणि तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. कारण, हा व्होकल कॉर्ड पॅरालिसिस असू शकतो.

स्वरयंत्राला लकवा आल्यास आवाज निर्माण करणार्‍या स्नायूंवरचे नियंत्रण हरवते. आपले स्वरयंत्र ज्यांना आपण व्होकल कॉर्डस किंवा स्वरपटल म्हणतो, ते केवळ बोलण्यासाठीच नव्हे, तर श्वसन आणि गिळण्याच्या प्रक्रियेतदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

अलीकडेच हॉलीवूड अभिनेत्री किंबर्ली विल्यम्स-पॅसली यांनी या आजाराशी दोन वर्षे चाललेला संघर्ष उघड केला. 2022 च्या शेवटी त्यांच्या आवाजात अचानक बदल झाला आणि त्यांना फक्तकुजबुज करता येईल एवढ्या स्वरातच बोलता येत होते. आता शस्त्रक्रियेमुळे त्यांचा आवाज पूर्ववत झाला आहे. पण, ही अवस्था त्यांच्या डाव्या स्वरपटलाच्या अर्धवट लकव्यामुळे निर्माण झाली होती.

व्होकल कॉर्ड लकव्याची लक्षणे

हा विकार एका किंवा दोन्ही स्वरपटलांवर परिणाम करू शकतो.

एकपक्षीय लकवा असल्यास एका स्वरपटलावर परिणाम होतो. यामुळे बोलण्यात अडचण येते, तसेच कधी कधी गिळण्यासही त्रास होतो.

द्विपक्षीय लकवा असल्यास दोन्ही स्वरपटल अकार्यक्षम होतात आणि त्यामुळे श्वास घेणेही कठीण होऊ शकते.

लक्षणे व्यक्तिपरत्वे बदलतात; पण यामध्ये मुख्यतः खालील गोष्टींचा समावेश असतो :

आवाजात बदल : खरखरीतपणा, कर्कश किंवा हवेच्या झुळकीसारखा आवाज येणे किंवा आवाजात लयीचा अभाव असणे.

श्वास घेताना आवाज येणे : कधी कधी फुरफुरी किंवा घरघर

मोठ्याने बोलण्यास असमर्थता : बोलताना थकवा आणि दम लागणे, अन्न किंवा पाणी गिळताना खोकला किंवा श्वास अडकणे, खोकला देऊन घशातील स्राव काढण्यात अडचण.

ही लक्षणे दिवसभरात बदलू शकतात. सकाळी आवाज स्पष्ट वाटतो; पण दिवसभरात तो दुर्बल होतो.

व्होकल कॉर्डचा लकवा का होतो?

हा लकवा प्रामुख्याने रीकरंट ल्यारेन्जियल नर्व्ह या मज्जातंतूमध्ये दबाव किंवा दुखापत झाल्यामुळे होतो. ही नस गळ्यातून छातीपर्यंत जाते आणि पुन्हा वर परत येते. त्यामुळे तिच्यावर इतर शारीरिक स्थितींचा सहज परिणाम होतो.

थायरॉईड ग्रंथीवरील शस्त्रक्रिया करताना ही नस दुखावली जाऊ शकते. कर्करोगजन्य किंवा साध्या गाठीही या नसेवर दबाव टाकू शकतात. पार्किन्सन, मल्टिपल स्क्लेरोसिस सारख्या विकारांमुळेही नस बाधित होते.

मेंदूला होणारा रक्तपुरवठा बाधित होऊन आवाज नियंत्रित करणार्‍या भागावर परिणाम झाला असेल तरी हा लकवा येण्याची शक्यता असते. मान अथवा छातीवरील दुखापत झाल्यास किंवा अपघातामुळे नसेला थेट इजा होऊ शकते. पोस्टवायरल वॅगल न्यूरोपॅथी म्हणजे सामान्य सर्दी-खोकल्यानंतरही काही वेळा आवाज पूर्ववत होत नाही. कारण, त्या दरम्यान नसा बाधित होतात.

काय करता येईल?

वैद्यकीय उपचारांमध्ये पहिल्या टप्प्यात व्हॉईस थेरपी दिली जाते. यामध्ये काही व्यायाम आणि विशिष्ट क्रिया शिकवल्या जातात, ज्या आवाजात सुधारणा करतात आणि आजूबाजूच्या स्नायूंवरचा ताण कमी करतात.

थेरपीने फरक न पडल्यास स्वरपटलात विशेष पदार्थाचे इंजेक्शन दिले जाते. यामुळे कमजोर झालेल्या स्वरपटलास मजबुती मिळते.

वरील उपाय अपुरे पडतात, तेव्हा शस्त्रक्रिया करून लकवाग्रस्त स्वरपटल योग्य स्थितीत आणले जाते. सर्दी-खोकल्यानंतरच्या आवाजातील बदल काही आठवड्यांत सुधारतात. त्यामुळे प्रथम काही आठवडे विश्रांती देणे योग्य असते.

पण, जर आवाजाचा बदल तीव्र असेल किंवा अनेक आठवडे काहीही सुधारणा होत नसेल, अचानक आवाज हरवला असेल आणि स्पष्ट कारणही नसेल, तर तत्काळ कंठरोग तज्ज्ञाशी संपर्क साधा. लक्षणे ओळखून योग्य वेळी उपचार घेतल्यास, आवाज पुन्हा पूर्ववत करता येतो. आवाज हा फक्तसंवादाचं माध्यम नाही, तो व्यक्तिमत्त्वाचाही भाग आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर पावले उचलणे, हेच शहाणपण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT