डॉ. विवेक बांदे
कुटुंबातील एखाद्या सदस्याला कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्याचा धोका इतर सदस्यांनाही असू शकतो का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. विशेषतः वडील किंवा सख्ख्या भावाला प्रोस्टेट कर्करोग झाला असल्यास कुटुंबातील इतर पुरुषांनीही याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.
प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. कुटुंबात वडील किंवा भावाला हा कर्करोग झालेला असल्यास संबंधित पुरुषाला इतरांच्या तुलनेत अधिक धोका असू शकतो. मात्र, कुटुंबात या आजाराचा वैद्यकीय इतिहास आहे म्हणजे आपल्यालाही कर्करोग होणारच, असे नाही. कुटुंबातील एकापेक्षा अधिक जवळच्या नातेवाइकांना प्रोस्टेट कर्करोग झाला असल्यास किंवा एखाद्या नातेवाइकाला कमी वयातच या आजाराचे निदान झाले असल्यास धोका अधिक वाढू शकतो. यामागे काही अनुवंशिक घटक कारणीभूत असू शकतात. BRCA1 आणि BRCA2 यांसारख्या जनुकांमध्ये होणारे बदल कुटुंबातून पुढील पिढीकडे जाऊ शकतात. अशा जनुकीय बदलांमुळे प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते.
प्रोस्टेट कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे आजाराचे निदान उशिरा होण्याची शक्यता असते. आजार वाढू लागल्यास वारंवार लघवीला जाणे, लघवी करताना अडथळा जाणवणे, लघवीचा प्रवाह कमी होणे किंवा लघवीतून रक्त येणे अशी लक्षणे दिसू शकतात. आजार प्रगत अवस्थेत गेल्यास हाडांमध्ये सतत वेदना जाणवू शकतात. मात्र, ही लक्षणे केवळ कर्करोगामुळेच दिसतात असे नाही. प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणे यांसारख्या कर्करोगाव्यतिरिक्त इतर समस्यांमुळेही अशी लक्षणे जाणवू शकतात. त्यामुळे कोणतेही लक्षण दिसल्यास स्वतःहून निष्कर्ष न काढता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
कुटुंबात प्रोस्टेट कर्करोगाचा वैद्यकीय इतिहास असलेल्या पुरुषांनी लक्षणे दिसण्याची वाट न पाहता डॉक्टरांशी तपासणीबाबत चर्चा करावी. यासाठी प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन (PSA) ही रक्तचाचणी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. व्यक्तीचे वय आणि इतर जोखमीचे घटक लक्षात घेऊन डॉक्टर डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन किंवा आवश्यकतेनुसार पुढील तपासण्याही सुचवू शकतात. तपासणीचा निर्णय घेताना वय, कौटुंबिक इतिहास, एकूण आरोग्यस्थिती तसेच तपासणीचे फायदे आणि मर्यादा विचारात घेणे गरजेचे आहे. प्रोस्टेट कर्करोग पूर्णपणे टाळण्याची कोणतीही अशी पद्धत उपलब्ध नाही. मात्र, वजन नियंत्रित राखणे, नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे यामुळे एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.
एकंदरीत, कुटुंबात प्रोस्टेट कर्करोगाचा वैद्यकीय इतिहास
असणे ही घाबरण्याची बाब नसून अधिक सतर्क राहण्याची बाब आहे. कुटुंबातील आजारांचा वैद्यकीय इतिहास जाणून घेणे, वेळोवेळी डॉक्टरांशी चर्चा करणे आणि योग्यवेळी आवश्यक तपासण्या करून घेणे यामुळे प्रोस्टेटच्या आरोग्याबाबत योग्य निर्णय घेता येतात.