HbA1c Test | ‘एचबीएवनसी’ चाचणीचे आकलन करताना... 
आरोग्य

HbA1c Test | ‘एचबीएवनसी’ चाचणीचे आकलन करताना...

पुढारी वृत्तसेवा

डॉ. गौरांगी वैद्य

मागील दोन ते तीन महिन्यांच्या रक्तशर्करेची सरासरी मोजण्यासाठी एचबीएवनसी ही विश्वासार्ह चाचणी मानली जाते. रक्तातील साखर सतत वाढलेली असेल, तर ग्लुकोज हिमोग्लोबिनसोबत जोडले जाते आणि त्यामुळे एचबीएवनसीची पातळी वाढते, हे सत्य असले तरी रक्तातील साखर वाढणे हेच यामागील एकमेव कारण असते असे नाही. अनेकदा इतर काही आरोग्यविषयक घटक किंवा आजार यामुळेही हा अहवाल बदलू शकतो.

शरीरात लोह (आयर्न), व्हिटॅमिन बी-12 किंवा फोलेटची कमतरता असल्यामुळे होणारा अ‍ॅनिमिया अनेकदा एचबीएवनसीची पातळी वाढवू शकतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात असली तरीही काही प्रकारच्या अ‍ॅनिमियामुळे हा अहवाल वाढलेला येऊ शकतो. हिमॉलिटिक अ‍ॅनिमिया, नुकतेच झालेले रक्तदाब बदल किंवा रक्तसंक्रमण (ब्लड ट्रान्सफ्यूजन) यांसारख्या स्थितीमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते. पेशींचे आयुर्मान कमी असल्यास त्यांना ग्लुकोज गोळा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे एचबीएवनसीची पातळी अनपेक्षितपणे कमी येऊ शकते.

क्रॉनिक किडनी डिसीज (मूत्रपिंडाचे आजार) किंवा लिव्हरचे आजार असणार्‍या रुग्णांमध्ये देखील एचबीएवनसीच्या अचूकतेवर परिणाम होतो. या आजारांमुळे रक्तातील साखरेची खरी पातळी आणि अहवालातील आकडे यात तफावत निर्माण होऊ शकते. महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान शरीरात होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे एचबीएवनसीच्या पातळीवर परिणाम होतो. याशिवाय कॉर्टिकोस्टेरॉई डस्सारखी काही विशिष्ट औषधे दीर्घकाळ घेतल्यास रक्तातील साखर आणि पर्यायाने एचबीएवनसी वाढू शकतो. त्यामुळे रक्ततपासणीनंतर निष्कर्षाप्रत पोहोचण्यापूर्वी वैद्यकीय इतिहास, उपाशीपोटी आणि जेवणानंतरची रक्तशर्करेची पातळी तसेच इतर चाचण्यांची तुलना करणे आवश्यक ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT