Cholesterol and Heart Disease | कोलेस्टेरॉलचे गुणोत्तर आणि हृदयविकार 
आरोग्य

Cholesterol and Heart Disease | कोलेस्टेरॉलचे गुणोत्तर आणि हृदयविकार

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मनोज कुंभार

रक्त चाचणीचा अहवाल हाती आल्यावर हल्ली बहुतांश व्यक्ती माझे एकूण कोलेस्टेरॉल जास्त आहे की कमी, हे आवर्जून पाहतात आणि त्यावरून आपल्या हृदयाच्या आरोग्याचे अनुमान काढतात; पण हृदयाचे आरोग्य इतके सरळसोपे नसते.

कोलेस्टेरॉलची पातळी सर्वसाधारण मर्यादेत असली, तरी याचा अर्थ रक्तवाहिन्या पूर्णपणे सुरक्षित आहेत, असा होत नाही. काही वेळा, विविध प्रकारच्या कोलेस्टेरॉलमधील परस्पर संबंध हा एकट्या आकड्यापेक्षा हृदयविकाराच्या जोखमीबद्दल अधिक अचूक माहिती देऊ शकतो. याच ठिकाणी ‘कोलेस्टेरॉल गुणोत्तर’ ही संकल्पना महत्त्वाची ठरते. हे गुणोत्तर एकूण कोलेस्टेरॉल आणि उच्च घनतेच्या लायपोप्रोटिन म्हणजेच ‘चांगले’ कोलेस्टेरॉल यांच्यातील समतोल दर्शवते. हृदयविकाराच्या जोखमीचे मूल्यांकन करताना हा एकमेव निकष नसला, तरी तो एक महत्त्वाचा पैलू उलगडून दाखवतो. ज्यांनी आतापर्यंत केवळ एकूण कोलेस्टेरॉलकडेच लक्ष दिले आहे, त्यांच्यासाठी हे गुणोत्तर समजून घेणे हृदयाच्या आरोग्याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्यास साहाय्यभूत ठरते.

अनेकांना आपल्या एकूण कोलेस्टेरॉलची पातळी माहीत असते, परंतु हे गुणोत्तर हृदयाच्या आरोग्याविषयी अधिक सखोल माहिती देऊ शकते, हे फार कमी जणांना ठाऊक असते. वैयक्तिक कोलेस्टेरॉल पातळ्यांनाही महत्त्व असले, तरी विविध प्रकारच्या कोलेस्टेरॉलमधील गुणोत्तरच हृदयविकाराच्या जोखमीचा खरा अंदाज देऊ शकते.

हे गुणोत्तर कसे मोजले जाते?

कोलेस्टेरॉल हा शरीरातील संप्रेरक निर्मितीसाठी आणि निरोगी ऊतींच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरणारा एक प्रकारचा स्निग्ध पदार्थ आहे. मात्र ‘वाईट’ कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा साका जमू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते.

सर्वाधिक प्रचलित पद्धतीनुसार, एकूण कोलेस्टेरॉलच्या पातळीला उच्च घनतेच्या लायपोप्रोटिन (एचडीएल) कोलेस्टेरॉलच्या पातळीने भागून हे गुणोत्तर काढले जाते. रक्तातील कोलेस्टेरॉल पुन्हा यकृताकडे नेऊन त्याचे विघटन व शरीरातून निष्कासन करण्याचे काम एचडीएल कोलेस्टेरॉल करते.

उदाहरणार्थ, एकूण कोलेस्टेरॉल २०० मिग्रॅ/डेसिलिटर आणि एचडीएल ५० मिग्रॅ/डेसिलिटर असल्यास, गुणोत्तर ४:१ इतके येते. साधारणपणे, हे गुणोत्तर जितके कमी तितकी हृदयविकाराची शक्यता कमी, तर गुणोत्तर मोठे असल्यास जोखीम अधिक असते. आदर्श स्थितीत हे गुणोत्तर ५:१ पेक्षा कमी असावे, तर बहुतांश प्रौढांसाठी ३.५ :१ किंवा त्याहून कमी गुणोत्तर सर्वसाधारण मानले जाते. अर्थात, याबरोबरीने वय, रक्तदाब, मधुमेह, धूम्रपानाची सवय, कौटुंबिक आरोग्य-इतिहास यांसारख्या इतर घटकांचाही विचार महत्त्वाचा ठरतो.

सर्वसाधारण आकडा नेहमीच सुरक्षित नसतो

केवळ सर्वसाधारण कोलेस्टेरॉलचा आकडा हृदयाचे आरोग्य निरोगी असल्याचे निदर्शक असतोच असे नाही. एचडीएलची पातळी कमी असलेल्या व्यक्तीचे एकूण कोलेस्टेरॉल स्वीकारार्ह असूनही तिचे गुणोत्तर अधिक असू शकते. याउलट, किंचित अधिक एकूण कोलेस्टेरॉल आणि उच्च एचडीएल असलेल्या रुग्णाचे गुणोत्तर अधिक निरोगी असू शकते, ज्यामुळे हृदयविकाराची जोखीमही कमी असते.

गुणोत्तर सुधारण्यासाठी काय करावे?

कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यासाठी उच्च घनतेच्या लायपोप्रोटिनचे प्रमाण वाढवणे आणि कमी घनतेच्या लायपोप्रोटिनचे प्रमाण कमी करणे आवश्यक असते. यासाठी फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये आणि हितकारी स्निग्ध पदार्थांचा आहारात समावेश करावा. ट्रान्सफॅट व संतृप्त स्निग्ध पदार्थांचे सेवन शक्य तितके मर्यादित ठेवावे. याखेरीज नियमित व्यायाम करावा आणि शरीराचे वजन योग्य प्रमाणात राखावे. धूम्रपान व मद्यसेवन टाळावे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या विकारांवर योग्य नियंत्रण ठेवावे. गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रक औषधे घ्यावीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT