Heart Health Awareness | तुमच्या डोळ्यासमोर कोणी कोसळल्यास काय कराल?  Pudhari File Photo
आरोग्य

Heart Health Awareness | तुमच्या डोळ्यासमोर कोणी कोसळल्यास काय कराल? जाणून घ्या

कार्डिअ‍ॅक अरेस्ट समजून घेताना...

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संजय गायकवाड

हल्ली दर काही दिवसांनी तिशी-पस्तिशीतील तरुण-तरुणींचे तडकाफडकी मृत्यू झाल्याच्या बातम्या कानी येताहेत. अलीकडेच पुण्यामध्ये 37 वर्षीय तरुणाचा जिममध्ये व्यायाम करताना घेतलेल्या ब्रेकदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. फिटनेसबाबत जागरूक असणार्‍या व्यक्तींबाबत असे जेव्हा घडते तेव्हा संपूर्ण समाजात भीती पसरते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे 17.9 दशलक्ष लोकांचे मृत्यू हृदयविकारामुळे होतात आणि त्यापैकी निम्मे म्हणजेच जवळपास नऊ दशलक्ष मृत्यू अचानक आलेल्या कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे होतात. कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही अशी वैद्यकीय आपत्कालीन अवस्था आहे की, जी कोणत्याही क्षणी, अगदी अचानक येऊ शकते आणि त्यात हृदयाचे ठोके थांबतात. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसे आणि इतर महत्त्वाच्या अवयवांपर्यंत रक्तपुरवठा थांबतो. कार्डिअ‍ॅक अरेस्ट झाल्यास तत्काळ वैद्यकीय मदत मिळाली नाही, तर तो प्राणघातक ठरतो. आरोग्यसेवा आणि उपचारांमध्ये प्रगती असूनही कार्डिअ‍ॅक अरेस्ट आजही मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. अशा स्थितीत योग्य पद्धतीने आणि त्वरित प्रतिसाद दिल्यास एखाद्याचा जीव वाचू शकतो.

कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे हृदयाचे ठोके अचानक थांबणे. त्यामुळे रक्तप्रवाह थांबतो आणि शरीरातील इतर अवयव विशेषतः मेंदू यांना ऑक्सिजनचा आणि पोषणाचा पुरवठा बंद होतो. ही अवस्था पूर्वसूचना न देता कोणालाही अगदी आरोग्यदायी व्यक्तीलाही होऊ शकते. त्यामुळे याची जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. बरेचदा लोक हृदयविकाराचा झटका म्हणजेच कार्डिअ‍ॅक अरेस्ट समजतात; पण या दोघांमध्ये फरक आहे. हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होणे. त्यामुळे हृदयाच्या विशिष्ट भागाला ऑक्सिजन मिळत नाही आणि तो भाग नष्ट होऊ लागतो. हृदयविकाराचा झटका गंभीर असतो आणि वेळेत उपचार न मिळाल्यास प्राणघातक ठरू शकतो; पण कार्डिअ‍ॅक अरेस्ट हृदयाच्या विद्युत प्रणालीतील बिघाडामुळे होतो. यावेळी हृदय धडधडणे थांबवते आणि त्यामुळे रक्त पंपिंगची प्रक्रिया पूर्णपणे बंद होते. हृदयविकाराचा झटका कार्डिअ‍ॅक अरेस्टला कारणीभूत ठरू शकतो; पण या दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्थिती आहेत.

कार्डिअ‍ॅक अरेस्ट सहसा कोणतीही पूर्व लक्षणे न देता होतो; पण काही वेळा काही संकेत आधी दिसू शकतात. यामध्ये अचानक बेशुद्ध होणे, हृदयात वेगाने ठोके जाणवणे, चक्कर येणे, डोकं हलकं वाटणे, थकवा, श्वास घेता न येणे किंवा जोरात धाप लागल्यासारखे वाटणे अशी लक्षणे आढळतात. काही लोकांना कार्डिअ‍ॅक अरेस्ट होण्याआधी छातीत वेदना, मळमळ, उलटी किंवा दम लागण्याची तक्रार जाणवते. ही लक्षणे दिसताच त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ कृती करणे अत्यंत गरजेचे आहे.

तुमच्यासमोर कोणी अचानक कोसळले, त्याला श्वास घेता येत नसेल, प्रतिसाद देत नसेल, तर एकही क्षण वाया न घालवता त्वरित कृती करावी लागते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला जोरात हाक मारून जागं करण्याचा प्रयत्न करा. तो व्यक्ती काही प्रतिसाद देत नसेल, तर तत्काळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्रमांकावर संपर्क साधा. लक्षात ठेवा की, मदतीशिवाय जाणारा प्रत्येक मिनीट रुग्ण बचावण्याची शक्यता सुमारे दहा टक्क्यांनी कमी करतो. आपण कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन म्हणजेच सीपीआरचे प्रशिक्षण घेतले असेल, तर संपूर्ण प्रक्रिया करा अन्यथा हँडस् ओन्ली सीपीआरही प्रभावी ठरते. रुग्णाच्या छातीच्या मधोमध एक हात ठेवा. त्यावर दुसरा हात ठेवून दोन्ही हातांची बोटे गुंफून छातीवर जोरात आणि जलद दाब द्या. दर मिनिटाला सुमारे शंभर ते एकशेवीस वेळा छातीत किमान दोन इंच खोल दाब देणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी दाबल्यानंतर छातीला पूर्ण आराम देणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया आपत्कालीन मदत येईपर्यंत अथवा रुग्णाला श्वासोच्छवास सुरू होईपर्यंत थांबवू नये.

जवळ ऑटोमॅटिक डिफिब्रिलेटर (एईडी) असेल, तर त्याचा वापर त्वरित करावा. हे यंत्र वापरण्यास सोपे असते आणि त्यामध्ये सूचनाही दिलेल्या असतात. सीपीआर सुरू करताना अनेकांना भीती वाटते की, आपण चुकीचे काही करू; पण काहीही न करण्यापेक्षा प्रयत्न करणे अधिक योग्य असते. गरज असल्यास फोनवर आपत्कालीन सेवा आपल्याला सीपीआरसाठी मार्गदर्शन करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT