Fish Oil Benefits | फिश ऑईलचे सेवन करताना... 
आरोग्य

Fish Oil Benefits | फिश ऑईलचे सेवन करताना...

पुढारी वृत्तसेवा

डॉ. राहुल चावला

हृदयाचे आरोग्य सुधारणे, सांधेदुखीपासून आराम मिळवणे आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी सध्या ‘फिश ऑईल’ (माशांचे तेल) घेण्याचे प्रमाण वाढले आहे. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडने समृद्ध असलेले हे तेल गुणकारी मानले जात असले, तरी उच्च रक्तदाबाची (बीपी) औषधे घेणार्‍या रुग्णांसाठी काही महत्त्वाचे धोकेही यात दडलेले आहेत.

एखादा रुग्ण आधीच उच्च रक्तदाबासाठी औषधे घेत असेल आणि त्यासोबत फिश ऑईलचे सेवन करत असेल, तर त्याचा रक्तदाब आवश्यकतेपेक्षा जास्त कमी होऊ शकतो. फिश ऑईलमध्ये नैसर्गिकरीत्या रक्तदाब 2 ते 4 एमएमएचजीपर्यंत कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे औषधांच्या जोडीला हे सप्लिमेंट घेतल्यास चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

सर्वात महत्त्वाचा धोका म्हणजे रक्त पातळ होणे. जे रुग्ण वॉर्फरिन किंवा अ‍ॅस्परीनसारखी रक्त पातळ करण्याची औषधे घेतात, त्यांच्यामध्ये फिश ऑईलमुळे अंतर्गत रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो. फिश ऑईलमधील ओमेगा-3 मुळे शरीरातील ट्रायग्लिसराइडस् कमी होण्यास मदत होते. शरीरातील जळजळ किंवा सूज कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. हृदयासाठी हे तेल पोषक मानले जाते; परंतु ते रक्तदाबाच्या औषधाला पर्याय ठरू शकत नाही.

ज्यांना माशांची अ‍ॅलर्जी आहे, ज्यांच्या शरीरात रक्ताच्या गाठी होण्यास आधीच समस्या आहे, विना सल्ला रक्त पातळ करण्याची औषधे घेणारे लोक यांनी फिश ऑईल घेताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे: एएचए आणि एफडीएसारख्या संघटनांच्या मते, फिश ऑईल सप्लिमेंटमुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतोच, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. केवळ ‘हार्ट फेल्युअर’सारख्या विशिष्ट परिस्थितीतच याची शिफारस केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT