डॉ. अनिल मडके
या वर्षभरात तब्बल 7 लाख 37 हजार जण क्षयरोग ग्रस्त झाले. जगभरात क्षयरोगामुळे 2024 याच सालात, 1 कोटीहून अधिक लोक आजारी पडले आणि 12 लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. दुर्दैवाने यातील 25% वाटा भारताचा आहे आणि ही बाब गंभीर आहे. कारण, ‘क्षयरोग’ हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही, तर तो सामाजिक स्वास्थ्याचा आणि आर्थिक स्थैर्याचा प्रश्न आहे.
क्षयरोगाची समस्या जगभरात असली, तरी भारतासह इंडोनेशिया, फिलिपाईन्स, चीन, पाकिस्तान, नायजेरिया आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशांत क्षयरोगाचे प्रमाण अत्यधिक आहे. याचाच अर्थ असा की, क्षयरोग अजूनही आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आहे. क्षयरोगाची आकडेवारी पाहता, इ. स.2015 मध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे 237 जणांना क्षयरोग असल्याचे निदान व्हायचे. इ.स. 2024 मध्ये ही आकडेवारी दर एक लाख लोकसंख्येमागे 187 इतकी खाली आली. क्षयरोगासाठी उपचार घेणार्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली. क्षयरोगावरील उपचाराची यशस्वीता 90% पर्यंत पोहोचली. क्षयरोगासाठी उपचारापर्यंत न पोहोचणार्यांची संख्यासुद्धा बरीच कमी झाली. ही सर्व आकडेवारी प्रभावी असली, तरी सध्या आजूबाजूला असणार्या क्षयरुग्णांची मोठी संख्या काळजी करण्यासारखीच आहे.
24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून यावर्षी म्हणजे 2026 मध्ये साजरा करत असताना भारतासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 2025 या वर्षापर्यंत भारत देश क्षयमुक्त करण्याचे स्वप्न होते आणि हे उद्दिष्ट आपण दुर्दैवाने गाठू शकलो नाही, हे मान्य करावे लागेल; पण हे उद्दिष्ट न गाठण्यामागे अनेक कारणे आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मुळात, क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. नख, केस आणि दात वगळता, कोणत्याही अवयवाला हा आजार होत असला, तरी तो मुख्यत्वेकरून फुफ्फुसांना होतो. क्षयरुग्णांच्या थुंकीतून हे जंतू खोकताना, शिंकताना, मोठ्याने बोलताना तुषारांद्वारे हवेत पसरतात आणि इतरांना क्षयाचा संसर्ग होतो. हा संसर्ग झालेल्या सर्वच व्यक्तींना क्षयरोग होत नाही. केवळ संसर्ग असलेल्या व्यक्तींपैकी दहा टक्के व्यक्तींना क्षयरोग होतो. रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेल्या या व्यक्ती असतात. जसे की, मधुमेह, कुपोषण, एचआयव्हीची बाधा, कर्करोग, धूम्रपान व मद्यपान करणार्या व्यक्ती. याशिवाय पुरेसे सकस अन्न, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आणि राहण्यालायक स्वच्छ वातावरण नसेल किंवा व्यक्ती अधिक दाटीवाटीत राहात असेल तर अशा व्यक्तींना क्षयरोग लवकर होतो. या सर्व बाबींमध्ये क्षयरुग्ण हा सुरुवातीच्या टप्प्यात दुर्लक्षित राहतो. दारिद्य्र आणि अज्ञान यामुळे क्षयरोग लवकर ओळखणे आणि उपचारासाठी रुग्णालयात जाणे या गोष्टी घडत नाहीत.
संध्याकाळी बारीक ताप येणे, रात्री दरदरून घाम येणे, भूक मंदावणे, अशक्तपणा येणे, खोकला येणे, खोकल्यातून कफ/ बेडके किंवा रक्त पडणे, दम लागणे ही क्षयरोगाची लक्षणे अनेकांच्या लक्षात येत नाहीत. याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, औषधोपचार सुरू केल्यानंतर काही दिवसांत ही लक्षणे कमी होतात. पण, क्षयरोग संपूर्ण बरा होण्यासाठी किमान सहा महिने न चुकता सलगपणे उपचार घ्यावा लागतो; पण अनेकजण, लक्षणे कमी होताच औषधोपचार मध्येच बंद करतात. अशा मध्येच उपचार बंद करण्यामुळे औषधाला दाद न देणारा अतिचिवट एम.डी.आर. आणि एक्स.डी.आर. प्रकारचा क्षयरोग - टी.बी. निर्माण होऊ शकतो आणि या प्रकारच्या क्षयरोगासाठी वेगळ्या प्रकारची औषधे घ्यावी लागतात. थुंकीत जंतू असणारे रुग्ण दरवर्षी नवीन पंधरा लोकांना आपला संसर्ग देऊ शकतात.
क्षयरोगावर मात करण्यासाठी केवळ शासकीय प्रयत्न उत्तम असून चालणार नाही, तर प्रत्येक क्षयरुग्णांनी आपला औषधोपचार व्यवस्थित आणि पूर्ण कालावधीसाठी घ्यायला हवा आणि आपला आजार इतरांमध्ये पसरू नये यासाठी काळजी घ्यायला हवी. नुकत्याच साजरा झालेल्या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षीचे एक घोषवाक्य आहे...धशी! थश उरप एपव ढइ : ङशव लू र्लेीपीींळशी, िेुशीशव लू शिेश्रिश. म्हणजेच होय ! देशांचे नेतृत्व आणि लोकांचे समर्थन याद्वारे आपण टीबी संपवू शकतो. हा उपक्रम वर्षभर साजरा केला जाईल.