दिवसेंदिवस मला लघवी करताना खूप आग होते, अशा तक्रारी घेऊन येणार्या स्त्री-पुरुषांची संख्या वाढली आहे. या व्याधीवर चिकित्सा करताना कसेही करून विनासायास, यत्किंचितही आग न होता व्यवस्थित लघवी होईल, असे उपचार करणे गरजेचे असते.
गुरुकुल पारंपरिक उपचारांनुसार मूत्राघात विकाराची नुसती सुरुवात असेल, तर एक चमचा धने ठेचून रात्री किंवा काही तास भिजत ठेवावे. थोड्या वेळाने ठेचलले धने खावेत आणि वर तेच पाणी प्यावे. अधिक लवकर आराम मिळावा म्हणून नारळपाणी किंवा शहाळ्याचे पाणी प्यावे. लघवी मोकळी, व्यवस्थित, आग आणि त्रास न होता व्हावी याकरिता धन्याबरोबच गोखरू आणि चंदन खोड या वनस्पतींचे मोठेच योगदान आहे. अशीच मदत मूत्राघात विकार दूर करण्याकरिता उपळसरी चूर्णाची होते.
मूत्राघात विकारात युरीक अॅसिडचे प्रमाण 6 चे वर असे वाढले असल्यास; गोक्षुरादि गुग्गुळ आणि चंदनादिवटी प्र. 6 गांळ्या, रसायनचूर्ण 1 चमचा, उपळसरीचूर्ण 1/2 चमचा आणि आम्लपित्तवटी 3 गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. ज्यांच्या घरात चंदनाचे उत्तम दर्जाचे खोड आहे, त्यांनी चंदनखोड उगाळून त्याचे गंध चमचा दोन चमचे घ्यावे.
युरीक अॅसिडचे प्रमाण नियंत्रणात असूनही लघवी होत असताना आग होत असल्यास गोखरू, उपळसरी, धने, आवळकाठी अशा अनेकानेक वनस्पतींंचे चूर्ण किंवा काढा घ्यावा. कटाक्षाने मूत्राघात विकारात मीठ, आंबट, खारट, तिखट पदार्थ टाळावेत. ताजे ताक मोठ्या प्रमाणावर घेतल्यास मूत्राघात विकारात त्वरित आराम मिळतो. त्रास होत असणार्या काळात वरच्या भागात गार पाण्यात भिजवलेले फडके ठेवावे.
ग्रंथोक्त उपचारांनुसार चंदनवटी, रसायनचूर्ण, उपळसरीचूर्ण, गोक्षुरक्वाथ, गोक्षुरादिगुग्गुळ, मौक्तिकभस्म, सूर्यक्षार किंवा सोरा पाण्यात मिसळून ते पाणी घ्यावे. आयुर्वेदीय ग्रंथाप्रमाणे जवखार किंवा सातूचा क्षार मूत्राघातावर एक उत्तम उपाय सांगितलेला आहे.
विशेष दक्षता आणि विहार : लघवी विनासायास आणि आग न होता व्हावी याकरिता संबंधित रुणाने थोडे चालणे किंवा घरातल्या घरात फिरणे फार आवश्यक आहे.
पथ्य : या रुग्णांनी कटाक्षाने बिनमिठाचे जेवण, धने ठेचून त्याचे पाणी पिणे, चंदनगंध पोटात घेणे, नारळ किंवा शहाळ्याचे पाणी पिणे या उपायांबरोबच मिरची मसाला विरहीत उकडलेल्या भाज्यांचा युक्तीने वापर करावा. उदा. दुधीभोपळा, पडवळ, दोडका, कोहळा, घोसाळे, चाकवत, राजगिरा, काळ्यामनुका, द्राक्षे, ताडगोळे, पांढरे खरबूज इत्यादी.
कुपथ्य : मिरची मसाला, लोणची पापड, चहा, हॉटेलमधील चमचमीत खाणी, मांसाहार, जागरण, विविध व्यसने इत्यादी त्वरित बंद करावीत.
* या रुग्णांनी पोटातील वायू कमी होईल, याकरिता आवश्यक तेवढे फिरणे आवश्यक आहे; पण अतिरिक्त व्यायाम कटाक्षाने टाळावा.
* याखेरीज मूत्राघाताचा त्रास अधिक होत असल्यास तज्ज्ञांच्या देखरेखीखाली निरूह किंवा मात्रा बस्ती करून घ्यावी. सूर्यक्षार किंवा सोरा मिश्रित पाणी प्यावे.
* मूत्रेंद्रियाच्या वरती गार पाण्याच्या घड्या ठेवणे.
* या व्याधीचा चिकित्साकाळ दोन दिवस ते दोन आठवडे इतका असू शकतो.
* यासंदर्भातील निसर्गोपचारांमध्ये फिरणे, भरपूर पाणी पिणे, सायंकाळी लवकर आणि कमी जेवणे आवश्यक आहे. आहारामध्ये कटाक्षाने उकडलेल्या भाज्या आणि शाकाहार, बिनमिठाचे जेवण, सातूची भाकरी यांचाच समावेश करावा.
संकीर्ण : मूत्राघात विकारात रुग्णाला खूप ‘तत्त्वज्ञान’ अजिबात चालत नाही. त्याची लघवीची आग तिडीक, लघवी कमी होणे, या लक्षणांना 4-6 तासांत आराम मिळावा लागतो. स्त्री पुरुषांच्या मूत्रेंद्रियाच्या टोकाशी त्रास आहे, असे वाटत असल्यास शेंगदाण्याएवढा सोरा किंवा सूर्यक्षार पाण्यात मिसळून ते पाणी लगेच प्यावे. कदाचित तास अर्ध्या तासातही आराम मिळतो.