Crooked Teeth Treatment | उपचार मुलांच्या वाकड्या दातांवर Pudhari File Photo
आरोग्य

Crooked Teeth Treatment | उपचार मुलांच्या वाकड्या दातांवर

वाकड्या दातांमुळे स्पष्ट उच्चार करणे कठीण

पुढारी वृत्तसेवा

डॉ. निखिल देशमुख, दंतवैद्य

किशोरवयीन वय हा शारीरिक आणि मानसिक वाढीचा महत्त्वाचा काळ असतो. या वयात शरीरात झपाट्याने बदल होतात. यामध्ये दातांची रचना व स्थितीदेखील महत्त्वाची भूमिका बजावते.

काही मुलांचे दात जन्मतःच किंवा वय वाढताना वाकडे-तिकडे वाढतात. अशा वेळी योग्य वेळी उपचार न झाल्यास मुलांच्या आत्मविश्वासावर, बोलण्यावर, खाण्यावर आणि चेहर्‍याच्या सौंदर्यावर परिणाम होऊ शकतो.

दात वाकडे होण्याची कारणे

1. आनुवंशिकता : पालक किंवा कुटुंबातील इतर सदस्यांचे दात वाकडेतिकडे असतील, तर मुलांच्या दातांची ठेवण तशीच असू शकते. जबड्याचा आकार लहान असून दात मोठे असतील, तर ते नीट बसत नाहीत.

2. बालपणीच्या सवयी : अंगठा चोखणे, ओठ चोखणे, जीभ बाहेर काढून ठेवणे, तोंडाने श्वास घेणे या सवयी जबड्याच्या वाढीवर आणि दातांच्या स्थितीवर परिणाम करतात.

3. दुधाचे दात : दुधाचे दात वेळेपूर्वी पडले किंवा काढावे लागले, तर त्या जागेवर कायमचे दात चुकीच्या ठिकाणी येण्याची शक्यता वाढते.

4. दातांची अतिरिक्त वाढ किंवा कमी संख्या : काही वेळा अतिरिक्त दात उगम पावतात, जे इतर दातांची जागा अडवतात. कधी काही दात येत नाहीत. त्यामुळे पोकळी निर्माण होते.

काही वेळा वाकड्या दातांमुळे स्पष्ट उच्चार करणे कठीण होते.

अन्न चावण्याच्या खाण्याच्या क्रियेत अडथळा येतो. परिणामी, पचनावरही याचा परिणाम होतो.

वाकडे दात योग्य प्रकारे ब्रश न झाल्यास तिथे अन्न अडकते. जंतू वाढतात आणि दात सडण्याची शक्यता वाढते.

बरेचदा समाजात वावरताना मुलांना संकोच वाटतो.

उपचाराचे पर्याय

किशोरवयीन मुलांमध्ये वाकडे दात सुधारण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत.

1. मेटल ब्रेसेस : ही पारंपरिक पद्धत असून आजही ती अत्यंत प्रभावी मानली जाते. स्टीलच्या वायर्स व ब्रॅकेटस् वापरून दातांना योग्य स्थितीत आणले जाते.

2. सिरॅमिक ब्रेसेस : हे धातूच्या ब्रेसेससारखेच कार्य करतात; परंतु ते सिरॅमिकपासून बनलेले असल्याने रंगाने दातांसारखेच दिसतात.

3. लिंग्वल ब्रेसेस : हे ब्रेसेस दातांच्या आतील बाजूस बसवले जातात. त्यामुळे दिसत नाहीत.

4. अलायनर्स : ही आधुनिक आणि सौम्य पद्धत आहे. पारदर्शक प्लास्टिकचे साच्यासारखे उपकरण दातांवर बसवले जाते, जे काही आठवड्यांनी बदलावे लागते.

उपचार सुरू करण्याची योग्य वेळ

सर्वसाधारणपणे 10 ते 14 वयोगट हा दात सरळ करण्यासाठी योग्य मानला जातो. या वयात हाडांची वाढ सुरू असते. त्यामुळे ब्रेसेस लवकर आणि प्रभावीपणे कार्य करतात. मुलगा किंवा मुलगी वयात येण्याच्या अगोदर किंवा सुरुवातीच्या काळात दंततज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

उपचार कालावधी

दात सरळ करण्यासाठी लागणारा कालावधी व्यक्तीनिहाय वेगळा असतो. साधारणतः 12 ते 24 महिन्यांचा कालावधी लागतो.

उपचारानंतरची काळजी

- ब्रेसेस काढल्यानंतर दात पुन्हा वाकडे होऊ नयेत, यासाठी रिटेनर नावाचे उपकरण वापरावे लागते.

- दात आणि हिरड्यांची योग्य देखभाल आवश्यक असते.

- दर सहा महिन्यांनी डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT