डॉ. महेश बरामदे
वाकडे किंवा एकमेकांवर चढलेले दात सरळ करण्यासाठी पूर्वी धातूच्या तारा आणि ब्रॅकेटस्चा वापर प्रामुख्याने केला जात असे. आता डिजिटल दंतचिकित्सेतील प्रगतीमुळे या परिस्थितीत बदल होत आहे. ‘क्लिअर अलायनर्स’ नावाच्या पारदर्शक साच्यांमुळे निवडक रुग्णांमध्ये दातांची रचना सुधारण्याचे उपचार अधिक सोयीस्कर झाले आहेत.
क्लिअर अलायनर्स म्हणजे काय?
क्लिअर अलायनर्स हे दातांच्या आकारानुसार तयार केलेले पारदर्शक, काढता-घालता येणारे प्लास्टिकचे साचे असतात. हे साचे दातांवर नियंत्रित दाब निर्माण करतात. त्यामुळे दात हळूहळू नियोजित दिशेने सरकतात. उपचारादरम्यान ठरावीक कालावधीनंतर नवीन साचे वापरावे लागतात. सामान्यतः दिवसातून 20 ते 22 तास हे साचे घालण्याचा सल्ला दिला जातो. जेवताना आणि दात स्वच्छ करताना ते काढता येतात.
त्रिमितीय तंत्रज्ञानाचा वापर
डिजिटल दंतचिकित्सेमध्ये ‘इंट्राओरल स्कॅनर’च्या साहाय्याने दातांची त्रिमितीय प्रतिमा तयार केली जाते. यामुळे पारंपरिक पद्धतीने दातांचे ठसे घेण्याची गरज अनेक प्रकरणांमध्ये कमी होते. संगणकीय प्रणालीच्या मदतीने दातांची सध्याची स्थिती, अपेक्षित हालचाल आणि उपचारांचे विविध टप्पे नियोजित करता येतात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्या दातांच्या रचनेनुसार उपचार आराखडा तयार करणे शक्य होते. मात्र, संगणकावर दिसणारा अपेक्षित परिणाम प्रत्यक्षात तंतोतंत साध्य होईलच असे नाही.
दातांच्या स्वच्छतेसाठी फायदेशीर
पारंपरिक ब्रेसेसमध्ये तारांभोवती अन्नकण अडकण्याची शक्यता असते. पारदर्शक साचे काढता येत असल्यामुळे दात घासणे आणि दातांमधील जागा स्वच्छ करणे तुलनेने सोपे होते. मात्र, साचे घालण्यापूर्वी दात स्वच्छ करणे आवश्यक असते. अन्यथा अन्नकण आणि जिवाणू साचून दात किडणे किंवा हिरड्यांचे विकार निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो.
प्रत्येकासाठी हे उपचार योग्य असतात का?
दातांमधील अंतर, किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा वाकडेपणा आणि काही प्रकारच्या चावण्याच्या समस्यांमध्ये क्लिअर अलायनर्स उपयुक्त ठरू शकतात. तथापि, जबड्यांच्या रचनेतील गंभीर विसंगती किंवा गुंतागुंतीच्या दातांच्या हालचालींसाठी पारंपरिक ब्रेसेस अथवा इतर उपचार आवश्यक ठरू शकतात. उपचारांचा कालावधी दातांच्या स्थितीवर आणि रुग्णाच्या नियमित साचे वापरण्यावर अवलंबून असतो.
दात सरळ दिसणे हा या उपचारांचा एक फायदा असला, तरी योग्य चावण्याची क्षमता, दातांचे संतुलन आणि दीर्घकालीन मुखआरोग्य यांनाही महत्त्व आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर दात पुन्हा पूर्वस्थितीकडे सरकू नयेत म्हणून रिटेनर वापरण्याची गरज भासू शकते.