आरोग्य

जीभ आहे आरोग्याचा आरसा | पुढारी

Pudhari News

डॉ. मनोज कुंभार

डॉक्टरकडे कोणत्याही आजारावर औषध घ्यायला गेल्यास डॉक्टर एक गोष्ट आवर्जून करतात ती म्हणजे रुग्णाची जीभ बघतात. रुग्णाला जीभ बाहेर काढून दाखवायला लावतात. अगदी ताप, सर्दी किंवा पोट बिघडणे या सर्वांमध्ये डॉक्टर तपासताना रुग्णाला जीभ बाहेर काढून दाखवायला सांगतात. अर्थातच त्यामागे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे जीभ हा आपल्या आरोग्याचा आरसा असते.  

तब्येत बरी नाही म्हणून जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आवर्जून आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. जीभ पाहून ते आपल्या आरोग्याविषयी काही अंदाज बांधत असतात. कारण जीभ आरोग्याविषयी अनेक गोष्टी, गुपितं डॉक्टरांना सांगत असते. आपल्या आरोग्याचा आणि जिभेचा थेट संबंध असतो. शरीराची अवस्था जीभच सांगते. आहारविहार, अपुरी झोप, आजारपण, जीवाणू आणि इतर अन्य कारणांमुळे जिभेचा रंग बदलतो. जिभेवर जर पिवळ्या रंगाचा थर असेल तर तोंडात जीवाणूंची संख्या जास्त आहे. जीवाणूंची संख्या वाढल्यास ताप आणि श्‍वासाला दुर्गंधी येण्याची समस्या निर्माण होते. जीभ खूप जास्त लाल असणे ही अ‍ॅनिमियाचे सुरुवातीचे लक्षण आहे. शरीरात बी 12 जीवनसत्त्वाची कमतरता असल्यासही जीभ लाल होऊ शकते. एखाद्या गोष्टीचा संसर्ग, इजा किंवा ताप आला असेल तरीही जिभेचा रंग गडद दिसतो. 

निरोगी व्यक्‍तीची जीभ हे नेहमी थोडी खरबरीत असते; पण काहीवेळा जीभ चिकटही होते. डॉक्टरांच्या मते जीभ चिकट असणे, राहणे ही नक्‍कीच चांगली गोष्ट नाही. तोंड येणे किंवा तोंडात लाल फोड येतात तसेच ते जिभेवरही येऊ शकतात. अतितिखट किंवा अतिगोड खाल्ल्यास तोंड येणे ही समस्या होऊ शकते. जीभ दाताने चावली गेली तरीही तोंडात फोड येऊ शकतात. दाताने जीभ चावली गेल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळेही असे होऊ शकते. जीभेवर पांढर्‍या रंगाचे चट्टे दिसणे हे शरीरात काही प्रकारचा संसर्ग किंवा प्रतिकारक्षमता कमी असल्याचे निदर्शक आहे. 

थोडक्यात, व्यक्‍ती निरोगी असेल तर जिभेकडून त्याविषयीही खात्री डॉक्टरला पटते. त्यामुळेच आजारपणामध्ये जिभेवर काही थर साचतो आणि तोंडाला चव नसणे आदी लक्षणे आपल्याला दिसू शकतात. खरबरीत गुलाबी जीभ ही उत्तम आरोग्याचे निदर्शक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT