हृदयरोगामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणे किंवा वाढलेले कोलेस्ट्रॉल हे हृदयरोगाचा संकेत देत असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी लायकोपिन हा घटक महत्त्वाचा असतो आणि हा घटक टोमॅटोमध्ये आढळतो. अलीकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनात हा निष्कर्ष समोर आलेला आहे.
फास्ट फूडच्या अतिरेकाचे परिणाम एव्हाना सर्वत्र दिसू लागले आहेत. त्यामुळेच लोक आपल्या आरोग्याबाबत अलीकडच्या काळात अधिक जागरूक असल्याचे दिसू लागले आहेत. आहारात फास्ट फूडचा समावेश, बैठी जीवनशैली यामुळे हृदयासंबंधीचे आजारही वाढलेले दिसतात. पूर्वी पन्नाशीनंतर होणारे हे आजार आता पंचविशीतच पाहायला मिळू लागले आहेत. हृदयरोगामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणे हे धोक्याची सूचना मानली जाते किंवा वाढलेले कोलेस्ट्रॉल हे हृदयरोगाचा संकेत देत असते. त्यामुळे हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखण्यासाठी आपण नैसर्गिक भाज्यांचा वापर करणे अधिक उपयुक्त ठरते. यामध्ये टोमॅटो हे अधिक लाभदायक असल्याचे समोर आले आहे. तसे पाहिले तर लाल रंग हा आपण धोक्याची निशाणी मानत असतो; पण लाल टोमॅटो आपल्याला आजाराच्या धोक्यांपासून दूर ठेवतो. टोमॅटोमध्ये असे अनेक गुण आहेत जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्यामुळे आपल्या आहारात टोमॅटोचा वापर असणे आवश्यक आहे.
टोमॅटोत मुबलक आढळणारे लायकोपिन हे आतड्यांद्वारे शोषले जाते. ते शरीरातील चरबीमध्ये मिसळण्यास सक्षम असते. यामध्ये ऑक्सिकरण रोधक असतात. ते शरीराच्या पेशींना आणि गुणसुत्रांना हानी पोहोचवणार्या फ्री रॅडिकल्सना रोखतात. फ्री रॅडिकल्स हे शरीरातील रक्तप्रवाह अनियमित करून अडचण निर्माण करतात. ते कर्करोगालासुद्धा कारणीभूत ठरू शकतात. रक्तात कोलेस्ट्रॉल वाढले तर रक्तवाहिन्यांच्या आतील स्तरावर जमा होते आणि रक्तप्रवाह अनियमित होतो. त्यामुळे हृदयरोागाचा किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचे अतिशय महत्त्वाचे काम टोमॅटोमधील घटक करतात.
म्हणूनच टोमॅटो आपल्याला आहारात नियमितपणे समाविष्ट करावेत. यामुळे केवळ हृदयविकारासाठीच लाभ होतो असे नाही, तर टोमॅटोमधील शरीरातील रक्ताचे प्रमाणही वाढते. फ्री रॅडिकल्समुळे सूर्यप्रकाशामुळे होणारा कर्करोग किंवा ओझोनचा स्तर कमी झाल्याने वाढत्या प्रदूषणाचा परिणाम म्हणून फुफ्फुसांचा आजारसुद्धा होऊ शकतो. यापासून बचाव करायचा असेल, हृदयरोगाला दूर ठेवायचे असेल किंवा कोलेस्ट्रॉलपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर भरपूर टोमॅटो खावेत. अर्थातच अॅलर्जी आणि प्रकृतीचा विचार करून!