मंजिरी फडके
थंडी वाढताच त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. थंड वार्यामुळे, कमी आर्द्रतेमुळे आणि घरातील हिटरसारख्या उपकरणांमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा झपाट्याने कमी होतो. त्वचेची अशी हानी टाळण्यासाठी त्वचेवर फक्त क्रीम लावण्यापेक्षा शरीराला आतून पोषण देणे अधिक महत्त्वाचे ठरते.
हिवाळ्यात उपलब्ध होणारे पाच देशी पदार्थ त्वचेला चमक देतात, ओलावा टिकवतात आणि थंडीत शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतात. बीट, रताळे आणि गाजर या तीन रंगीत हिवाळी फळभाज्या यादीतील प्रमुख घटक आहेत. या तिन्ही भाज्यांमध्ये भरपूर प्रतिऑक्सिडंट, बीटा कॅरोटीन, जीवनसत्त्व अ आणि त्वचेची दुरुस्ती करणारे इतर घटक मुबलक प्रमाणात आढळतात. रताळ्यामुळे त्वचेतील लवचिकता टिकवणारे तंतू आणि जीवनसत्त्व क मिळते, बीट रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेवर नैसर्गिक लालसरपणा आणते, तर गाजर शरीरातील पेशींचे पुनर्निर्माण वाढवते आणि त्वचा कोरडी होऊ न देण्यास मदत करते.
हिवाळ्यात मिळणारे संत्रे हे जीवनसत्त्व क चा उत्कृष्ट स्रोत आहे. हे जीवनसत्त्व त्वचेची निस्तेजता कमी करून कोलेजन निर्मिती वाढवते व त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत करते. याखेरीज पालकात भरपूर प्रतिऑक्सिडंट, लोह आणि फॉलिक आम्ल असते. यामुळे त्वचेचे आवरण मजबूत होते. पालकातील जीवनसत्त्व ई थंडीत होणार्या ऑक्सिडेटिव्ह ताणापासून त्वचेचे संरक्षण करते. या पाच पदार्थांचा वापर अत्यंत सोपा आहे. गाजर, बीट, पालक आणि संत्रे एकत्र करून सकाळी ताज्या रसाच्या रूपात घेता येतात. हा मिश्ररस शरीराला पटकन प्रतिऑक्सिडंट मिळवून देतो आणि नाश्त्याचा आरोग्यदायी पर्याय ठरतो. रताळे उकडून, सूप बनवून किंवा चाट म्हणून खाता येते. पालकाचे सूप बनवता येते. गाजरप्रेमींना हिवाळ्यातील गाजर हलवा हा नेहमीच आवडता पर्याय असतो. हे देशी हिवाळी पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास त्वचेतील ओलावा टिकून राहतो, रक्ताभिसरण सुधारते आणि थंडीतही त्वचेवर नैसर्गिक तेज दिसून येते. हिवाळ्यात त्वचेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही सोपी आणि सुरक्षित पद्धत परिणामकारक ठरते.