डॉ. मनोज कुंभार
अनेक रुग्णांचा असा समज असतो की, थायरॉईड चाचणीसाठी उपाशी राहण्याची गरज नाही आणि ते दिवसातून केव्हाही रक्त देतात. परंतु, डॉक्टरांच्या मते, थायरॉईडची चाचणी नेहमी सकाळी आणि पूर्णपणे रिकाम्या पोटी (निराहार) करणे अत्यंत आवश्यक आहे.
आपण जे काही खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या संप्रेरकांच्या (हार्मोन्स) पातळीवर होत असतो. त्यामुळे अचूक अहवालासाठी सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता-पिता सर्वप्रथम रक्ताचा नमुना देणे योग्य ठरते. थायरॉईडचा त्रास असलेल्या अनेक रुग्णांना रोज सकाळी रिकाम्या पोटी थायरॉईडची गोळी घेण्याची सवय असते. अनेकदा रुग्ण रक्ताचा नमुना देण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपली गोळी घेतात, ही सर्वात मोठी चूक आहे. चाचणीच्या दिवशी सकाळी गोळी घेतल्यास रक्तातील संप्रेरकांची पातळी तात्पुरती वाढते, ज्यामुळे अहवाल अचूक येत नाही. म्हणूनच, चाचणीच्या दिवशी सकाळी गोळी न घेता आधी रक्ताचा नमुना द्यावा आणि त्यानंतरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळी घ्यावी.
अनेक जण केसांच्या आरोग्यासाठी, नखांसाठी किंवा त्वचेसाठी ‘बायोटिन’ (व्हिटॅमिन बी ७) किंवा इतर मल्टीव्हिटॅमिन सप्लीमेंटस् घेत असतात. बायोटिन हे थायरॉईड चाचणीच्या रासायनिक प्रक्रियेत अडथळा निर्माण करू शकते, ज्यामुळे ‘टीएसएच’ पातळी चुकीची दाखवली जाण्याची शक्यता असते. जर तुम्ही अशा कोणत्याही प्रकारच्या गोळ्या, सप्लीमेंटस् किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल, तर त्याची कल्पना तपासणीपूर्वी डॉक्टरांना आणि लॅब तंत्रज्ञांना देणे अत्यंत गरजेचे आहे. चाचणीच्या किमान २ ते ३ दिवस आधी बायोटिनच्या गोळ्या बंद करण्याचा सल्ला दिला जातो.
महिलांच्या शरीरात मासिक पाळीच्या दरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समध्ये मोठे चढ-उतार होत असतात. या संप्रेरकांचा थेट प्रभाव थायरॉईडच्या संप्रेरकांवर देखील पडतो. म्हणूनच, महिलांनी थायरॉईडची तपासणी करताना आपल्या मासिक पाळीच्या चक्राचा (मेन्स्ट्रूअल सायकल) विचार करणे आवश्यक आहे. पाळीच्या दिवसांत चाचणी करायची असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. मानवी शरीरातील थायरॉईड संप्रेरकांचे प्रमाण २४ तासांत वेगवेगळ्या वेळी बदलत राहते. विशेषतः टीएसएचची पातळी रात्री आणि पहाटेच्या वेळी सर्वाधिक असते आणि दुपारच्या वेळी ती खालावते. जर तुम्ही पहिली चाचणी सकाळी ८ वाजता केली असेल आणि पुढच्या महिन्यातील फॉलो-अप चाचणी दुपारी १२ वाजता केली, तर दोन्ही रिपोर्टस्मध्ये मोठा फरक दिसू शकतो. त्यामुळे शरीरातील थायरॉईडची खरी स्थिती समजण्यासाठी प्रत्येक वेळी एकाच निश्चित वेळेत (शक्यतो सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान) चाचणी करावी. थायरॉईड हा पूर्णपणे नियंत्रणात राहणारा आजार आहे, फक्त त्यासाठी अचूक निदान आणि योग्य औषधोपचार आवश्यक आहेत.