डॉ. हेमंत जोशी, डॉ. अर्चना जोशी
आपल्या सर्वांचा एकच सर्वात गंभीर प्रश्न आहे. तो म्हणजे बारीक मुले आणि त्यांचे जाड पालक. याला काही अपवाद आहेत. पण हा प्रश्न सध्यातरी कुणालाच अजून सुटलेला नाही. म्हणूनच ही गोष्ट वाचावी.
६ वा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अभ्यास नुकताच २९ जूनला प्रसिद्ध झाला. तो खालील गंभीर गोष्टी सांगतो.
५५ टक्के लोक चुकीच्या आहाराने आजारी आहेत.
दर दुसरी मराठी बाई तिच्या उंचीच्या तुलनेत खूप जाड आहे.
भारतातील २ वर्षांखालील दर १० पैकी ९ मुले ही तुलनेने बारीक आहेत. यांचा मेंदू लहान, उंची कमी, वजन कमी, बौद्धिक, शैक्षणिक क्षमता कमी, पुढे कार्यक्षमता कमी त्यामुळे आयुष्य कमी होते. हे सर्व कुपोषित होतात. त्यामुळेच ते अल्पायुषी ठरतात. हे बदलणाऱ्या काही गोष्टी आहेत.
देशात गेल्या ७५ वर्षांत आपल्या आहाराबद्दल अनेक अभ्यास केले गेले. त्या अभ्यासांचा एक सर्व्हे झाला. तो असे सांगतो की, भारतातील सर्वाधिक लोकांना फॉलिक ॲसिड, बी १२, ड जीवनसत्त्व, आदी जीवनसत्त्वे रोजच्या खाण्यात गरजेपेक्षा कमी पडतात. सर्वाधिक लोकांना चुना म्हणजे कॅल्शियम, लोह आदी खनिजे रोजच्या आहारात पाहिजे तेवढी मिळतच नाहीत.
मुलांना त्यांचे पालक देणारे दूध, पेज, पातळ डाळ-भात यातून अन्न कमी तर पाणीच जास्त मिळते. याने मुले उपाशी, बारीक होत आहेत. तर नकळत बसून जास्त खाणारे लोक जाड होत आहेत. काही मुले विनाकारण जंकफूड खाऊन गरजेपेक्षा जाड होत आहेत. यालाच कुपोषण म्हणतात. चुकीचा आहार म्हणजे कुपोषण. ‘असे खा’ हे कोणी न सांगितल्याने सर्वाधिक लोक कुपोषित बनत आहेत.
त्यासाठी खालील काही नियम पाळायला हवेत. आपला व बाळाचा आहार हा चौरस हवा. तो असा हवा. जसे की, भूक लागली तरच खावे. निम्मी भूक भागेल एवढेच खावे. पोटभर खाणारे जाड होतात हे लक्षात घ्या. जे खाऊ त्याचे ४ भाग करा.
2 भाग [म्हणजे निम्मे ताट] भाजी कोशिंबीर, फळे खा. आपण भाजी, कोशिंबिरी, चटण्या, फळे कमी खातो. हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. भाजी कोशिंबीर, फळे या गोष्टी चोथा, जीवनसत्त्वे व खनिजे देतात. हे जगायला गरजेचे असते. चोथ्यामुळे आपल्याला शौचाला होते. भाजी, कोशिंबीर, फळे आपण कमी खातो म्हणून चोथा कमी पडतो. याने २ तोटे होतात. एक- खूप लोकांना, मुलांना व मोठ्यांना शौचास होत नाही. दोन- जीवनसत्त्वे व खनिजे कमी पडल्यामुळे कमजोरी येते. यासाठी भाजी, कोशिंबीर, फळे भरपूर खावीत. यातून भरपूर जीवनसत्त्वे व खनिजे मिळवा.
उरलेल्या एका भागात डाळ किंवा मांस खा. हे शरीर घडवणारी प्रथिने देतात. तर शेवटच्या एका भागात भात किंवा पोळी खावी. भात पोळी जीवनावश्यक नाही. वजन कमी करायचे असेल तर भात, पोळी, साखर, मधला नाश्ता सोडा. त्याऐवजी भाजी, कोशिंबीर, फळे खावीत. पोळी जास्त खाऊन आपण जाड होतो.
१ वाटी दही किंवा दूध. यातून बी १२ जीवनसत्त्व मिळते. हे बहुतेकांत कमी असते. दूध, दही यातून लॅक्टो-बॅसिलस नावाचे उपयुक्त जीवाणू मिळतात. बी १२ जीवनसत्त्व हे दह्यात दुधापेक्षा जास्त असते. जितके दही, आंबट तितके बी १२ जास्त. दुधापेक्षा दही जास्त चांगले. रोज प्रत्येकाने ३०० मिली दूध, दही घ्यावे.
जेवल्यावर विड्याचे पान खा. यातून चुना मिळतो. चुन्यातून कॅल्शियम मिळते. कॅल्शियम बहुतेकांना रोज कमी मिळते, असा अभ्यासात निष्कर्ष आहे.
हे कॅल्शियम अंगात शिरायला अंगात ‘ड’ जीवनसत्त्व असावे लागते. हे बहुतेक सर्व लोकात कमीच आहे. हे कमी असले तर आपण अल्पायुषी होतो. ‘ड’ जीवनसत्त्व आपला सूर्य आपल्याला रोज फुकट देतो. आपल्या अंगावर सूर्यप्रकाश पडल्यावर आपल्या चामड्याखाली ‘ड’ जीवनसत्त्व बनते. सकाळच्या उन्हात ‘ड’ जीवनसत्त्व तुलनेने खूप कमी मिळते. म्हणून शक्य तेवढे दुपारच्या उन्हात तासभर रोज जा. फिरा, काम करा, खेळा. अर्ध्या अंगावर तरी ऊन पडायला हवे. म्हणून अर्धी चड्डी व अर्ध्या बाहीचा सदरा हा पोशाख पुरुषांसाठी सर्वोत्तम होय. महिलांनी त्यांना साजेल असा, अर्ध्या अंगावर तरी ऊन पडेल असा पोशाख करावा.
लोह बहुतेकांना रोज कमी मिळते, असा निष्कर्ष आहे. म्हणून अन्न लोखंडी कढईत शिजवावे. याने लोह मिळेल.
८-१० तास घाम गाळा. कष्ट करा, खेळा, नाचा, योगासने, सूर्यनमस्कार करा. हे स्नायूंचे अन्न आहे. हे केल्याची रोज नोंद मात्र नक्की करा. त्यासाठी दैनंदिनी लिहा.
डॉक्टर टॉनिक लिहून देतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे असतात. आपल्या औषधातील दर तिसरा रुपया टॉनिकमध्ये जातो. आपली दिनचर्या बदलली तर आपल्याला टॉनिक लागणार नाही. आपल्यातली कमजोरी कमी होईल. आपण निरोगी होत दीर्घायुषी होऊ.
आपण जे खातो ते सर्व मिक्सरमधून काढून, दात नसलेल्या छोट्या बाळाला द्यावे. त्यांना वाकड्या चमच्यातून सांडणार नाही असे अन्न द्यावे. ते थोडे घट्ट असावे. यापेक्षा पाण्यासारखे पातळ अन्न देऊ नये. पातळ अन्नाने त्यांची उपासमार होते. ते खुरटतात. मग मेंदू लहान, उंची कमी, वजन कमी, आयुष्य कमी असे ते होतात. ही हानी नंतर भरून निघतच नाही. म्हणूनच जीवनपद्धत बदला.