आरोग्य

समुपदेशनाची वाढती गरज | पुढारी

Pudhari News

डॉ. रोहन जहागीरदार

शालेय प्रगती, पालकत्व इथपासून वैवाहिक विसंवाद आणि मानसिक आजारांपर्यंतच्या अनेक बाबतीत समुपदेशकाचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. हल्लीच्या काळात वाढत्या ताणतणावांच्या आणि अघोरी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तर अशा समुपदेशकांची गरज दिवसागणिक वाढतच चालली आहे.

आज समाजात समुपदेशन सेवेची गरज कधी नव्हे इतकी वाढली असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: मानसिकदृष्ट्या आजारी किंवा कमकुवत व्यक्तींना समुपदेशनसेवेने फायदा मिळू शकतो. हल्लीच्या काळात पूर्वीपेक्षा मानसिक आरोग्याविषयीची जागरुकता वाढताना दिसत आहे. दुसरीकडे शिक्षण आणि व्यवसायातील तीव्र स्पर्धेमुळे अनेक प्रकारच्या ताणतणावांना सामोरे जावे लागत आहे. जे स्पर्धेला, आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शकतात, संयम राखून स्वत:ला सावरून कठीण प्रसंगांना शांतपणे सामोरे जाण्याचे कौशल्य ज्यांच्यामध्ये असते, त्यांच्या बाबतीत मानसिक आरोग्यविषयक समस्या कमी प्रमाणात उद्भवतात. पण, ज्यांच्यात परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता, धैर्य, आत्मविश्वास कमी असतो, अशांच्या बाबतीत उद्भवणार्‍या समस्या योग्य उपचार, समुपदेशन आणि मार्गदर्शनाअभावी गंभीर रूप धारण करू शकतात. परिणामी, नैराश्य, न्यूनगंड, वैफल्य तसेच भीती, हिंसा, ताण, चिंता, अस्थिरता आणि असुरक्षितता या नकारात्मकभावनांच्या गर्तेत सापडून व्यक्ती आपले मानसिक संतुलन हरवून बसण्याची शक्यताही मोठी असते.

वेळीच आणि विज्ञाननिष्ठ समुपदेशन मिळाले नाही, तर काहीजण मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी म्हणून एखाद्या व्यसनाचा आधार घेतात आणि समस्या आणखी अवघड करून ठेवतात. अशा व्यक्ती स्वत:चा विकास करून घेण्यास असमर्थ तर असतातच शिवाय घरच्यांसाठीही त्या एक समस्या होऊन बसतात. थोडक्यात काय, तर मानसोपचाराची तसेच समुपदेशन केंद्राची उपलब्धता ही काळाची गरज ठरली आहे. समुपदेशनाद्वारे व्यक्तीला तिच्या तत्कालिक समस्येतून बाहेर येण्यास मदत केली जाते; पण भविष्यात पुन्हा समस्या उत्पन्न झाली, तर स्वबळावर त्या समस्येतून बाहेर पडू शकेल इतपत व्यक्तीचा आत्मनिर्भर बनवण्यावरही भर दिला जातो.

समुपदेशन ही एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. आपल्या विचारांना वळण देऊन आपणच आपली समस्या सोडवू शकू, इतका विश्वास समुपदेशक समस्याग्रस्त व्यक्तीला मिळवून देतो. प्रत्येक समस्येसाठी औषधाचीच गरज असते, असे नाही. अभ्यासात मागे पडणार्‍या अनेक मुलांच्या बाबतीत संबंधित मूल आणि पालक यांच्या समुपदेशनाचा उपयोग होऊ शकतो. अभ्यासात मुलाची प्रगती दिसत नाही, त्यावेळी मुलाचा बुद्ध्यांक काढून अभ्यासात प्रगती न होण्याच्या लेखन-वाचन कौशल्यांचा अंदाज, स्मरणशक्ती, आकलनक्षमता, निरीक्षणशक्ती, एकाग्रता इत्यादी कारणांचा शोध घेतल्यास प्रश्न सोडवण्याची दिशा सापडते, तसेच जिद्द, चिकाटी, आळस, नकारात्मक वृत्ती आणि शाळेतील समस्यांबद्दल जाणून घेऊन त्याप्रमाणे मार्गदर्शन केल्यास आणि आवश्यक कौशल्ये शिकविल्यास मुलांमध्ये अनेकदा आश्चर्यकारक प्रगती झालेली दिसते. शालेय प्रगती, पालकत्व इथपासून वैवाहिक विसंवाद आणि मानसिक आजारांपर्यंतच्या अनेक बाबतीत समुपदेशकाचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. हल्लीच्या काळात वाढत्या ताणतणावांच्या आणि अघोरी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तर अशा समुपदेशकांची गरज दिवसागणिक वाढतच चालली आहे. फक्त योग्य वेळी योग्य समुपदेशकाकडे जाणे आणि समुपदेशकाच्या मार्गदर्शनाद्वारे स्वत:च्या समस्येकडे नव्याने पाहायला शिकणे, समस्या हाताळण्याचे मार्ग शिकणे, हे महत्त्वाचे! 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT