डॉ. संजय गायकवाड
अनेकदा मुलांना गणिताची भीती वाटते किंवा विषय कठीण वाटतो. परंतु, काही मुलांसाठी गणितीय संकल्पना समजून घेणे हा अत्यंत क्लेशदायक आणि वैद्यकीयदृष्ट्या आव्हानात्मक अनुभव असतो. या स्थितीला शास्त्रीय भाषेत ‘डिसकॅल्क्युलिया’ म्हणजेच गणितीय अक्षमता असे म्हटले जाते.
हा एक न्यूरोलॉजिकल म्हणजेच मज्जासंस्थेशी संबंधित विकार आहे, ज्याचा परिणाम व्यक्तीच्या मोजमाप, गणितीय प्रक्रिया आणि संख्या समजून घेण्याच्या क्षमतेवर होतो. हा आजार बौद्धिक कमकुवतपणा नसून मेंदूच्या रचनेतील विशिष्ट बदलांमुळे होतो. वैद्यकीय संशोधनानुसार, डिसकॅल्क्युलिया हा प्रामुख्याने जनुकीय आणि अनुवंशिक कारणांमुळे होतो. जर कुटुंबात यापूर्वी कोणाला लर्निंग डिसॅबिलिटी किंवा गणितीय समजण्यात अडचण असेल, तर पुढील पिढीत हा त्रास होण्याचा धोका वाढतो. न्यूरोइन्मेगिंग अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, मानवी मेंदूच्या पॅरापॅरिटल लोबमध्ये संख्यात्मक माहिती प्रक्रिया करण्याचे कार्य चालते. डिसकॅल्क्युलिया असलेल्या व्यक्तींच्या मेंदूच्या या भागात किंवा मज्जातंतूंच्या जोडण्यांमध्ये काही संरचनात्मक फरक असतो, ज्यामुळे त्यांना अंक ओळखणे, दोन संख्यांमधील फरक समजणे आणि गणिताच्या खुणा लक्षात ठेवणे कठीण जाते.
या समस्येची लक्षणे लहान वयातच शाळा सुरू झाल्यावर प्रकर्षाने जाणवू लागतात. संख्या मोजण्यात अडचण येणे आणि मोजताना वारंवार बोटांचा आधार घ्यावा लागणे, साधी बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकाराचे साडेतीन नियम लक्षात न राहणे, घड्याळात वेळ पाहण्यास शिकताना प्रचंड त्रास होणे किंवा डिजिटल घड्याळातील वेळ समजण्यास कठीण जाणे, पैशांचे व्यवहार करताना, सुट्टे पैसे मोजताना किंवा पैशांचे नियोजन करताना गोंधळ उडणे, दिशा समजण्यास अडचण येणे, जसे की डावे आणि उजवे यामध्ये सतत गफलत होणे ही याची सामान्य लक्षणे आहेत.
या विकारावर कोणतेही थेट औषधोपचार नसले, तरी विशेष शिक्षण, उपचारात्मक अध्यापन आणि ऑक्युपेशनल थेरपीच्या माध्यमातून यामध्ये लक्षणीय सुधारणा करता येते. शिक्षणात ऑडिओ-व्हिज्युअल साधनांचा वापर करून मुलांना शिकवले तर त्यांना गणित सुलभ वाटू लागते. वेळेवर योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि सहानुभूतीपूर्ण वातावरण मिळाल्यास डिसकॅल्क्युलियाने ग्रस्त असलेली मुले देखील शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उत्तम प्रगती साधू शकतात.